Lebanon Pager Blast: इस्रायल आणि शेजारी असलेल्या लेबनॉन यांच्यातील सुप्त युद्ध आता इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होत आहे. मंगळवारी लेबनॉनमध्ये (दि. १७ सप्टेंबर) ठिकठिकाणी झालेल्या पेजर स्फोटांमध्ये हेजबोला या दहशतवादी संघटनेचे २,७५० सदस्य जखमी झाले आहेत. तर आठ लोक मारले गेले. संदेशवहनासाठी वापरले जाणारे छोटेसे पेजर इतक्या लोकांच्या मृत्यूसाठी कसे कारणीभूत ठरू शकते? कोणताही मोठा हल्ला न करता, केवळ एका इलेक्ट्रॉनिक उपकरणाद्वारे इतक्या लोकांवर हल्ला करण्याची ही पद्धत कशी काय राबवली गेली? पेजरचा उदय कधी झाला? आणि भारतात पेजरचा वापर कधी झाला होता? याबद्दल जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पेजर म्हणजे काय आणि ते कशासाठी वापरले गेले?

पेजर हे एक छोटेसे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. ज्याला बीपर असेही म्हटले जाते. पेजरच्या छोट्याश्या स्क्रिनवर छोटे संदेश आणि एखाधा क्रमांक पाठविणे किंवा मिळवणे, यासाठी याचा वापर होतो. रेडिओ फ्रिक्वेन्सीद्वारे पेजरवरून मेसेज पाठविणे आणि मिळवणे शक्य होते. हे मेसेज एखादा क्रमांक किंवा अल्फान्यूमेरिक (लिखित) स्वरुपात असतात. पेजरवर असलेल्या स्किनवर मेसेज दिसून येतो.

हे वाचा >> विश्लेषण: लेबनॉन पेजर-स्फोट मालिकेमागे कोणाचा हात? हेझबोलाला धडा शिकवण्यासाठी इस्रायलची क्लृप्ती?

पेजवर मेसेज आल्यानंतर व्हायब्रेशन, टोन किंवा बीप वाजते. त्यामुळे त्याला बीपर म्हटले जायचे. एखाद्या कलबलाट असलेल्या ठिकाणी किंवा ज्याठिकाणी शांतता बाळगणे अनिवार्य आहे, जसे की रुग्णालय वैगरे ठिकाणी पेजरचा प्रामुख्याने वापर केला जातो.

भारतात पेजर कधी वापरले गेले?

भारतात १९९० च्या दशकात आणि २००० सालापर्यंत पेजरचा वापर झाला होता. भारतात त्यावेळी अनेक व्यावसायिक, प्रोफेशनल्स जलद संपर्क साधण्यासाठी पेजरचा वापर करत होते. मोबाइल येण्यापूर्वी भारतात लँडलाईन फोन संपर्कासाठी वापरले जात. मात्र एखादा व्यक्ती बाहेर असल्यानंतर त्याच्याशी संपर्क साधणे कठीण होते. अशावेळी पेजर आल्यामुळे भारतात त्याला चांगलीच पसंती मिळाली. अनेक लोक कमरेच्या पट्ट्याला पेजर लावलेली त्याकाळी दिसत होती. भारताव्यतिरिक्त इतर देशांत कुरीयर सुविधा पुरविणारे, डॉक्टर्स, नर्सेस आणि आप्तकालीन सेवा देणारे लोक पेजरचा वापर करत. काही ठिकाणी सेल्युलर नेटवर्कला पर्याय म्हणून पेजरचा वापर केला जात होता.

पेजरचे किती प्रकार होते?

न्युमेरीक पेजरमध्ये फक्त नंबर दिसतात. हा पेजर समोरच्या व्यक्तीने अमुकतमुक क्रमाकांवर फोन करावा, यासाठी वापरला जात होता. हा पेजरचा अतिशय बेसिक आणि सर्वाधिक वापरला जाणारा प्रकार आहे. तर दुसऱ्या प्रकारातील पेजर अल्फान्युमेरीक पद्धतीचे असतात. ज्यामध्ये अक्षर आणि क्रमांक दोन्हींचा समावेश असतो. या पेजरमध्ये दीर्घ मेसेज टाईप करणे शक्य होते.

हे ही वाचा >> Lebanon Pager Blast : मोसादचा कट, इस्रायली तंत्रज्ञान की पेजर कंपनीशी साटंलोटं? कोणी व कसा केला लेबनॉमध्ये हिजबुल्लाहवर हल्ला?

लेबनानमध्ये पेजरद्वारे स्फोट कसे झाले?

असोशिएटेड प्रेसने हेझबोलाच्या एका अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया दिली असून हे स्फोट कसे झाले? याचे कारण स्पष्ट केले आहे. पेजरमध्ये स्फोटके आधीपासूनच असावीत, असा संशय हेझबोलाच्या अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे. हेझबोलाने या हल्ल्यामागे इस्रायलचा हात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. हेझबोलाचे दहशतवादी वापरत असलेल्या पेजरमध्ये लिथियम बॅटरीचा वापर केला जात होता. या बॅटरीचाही स्फोट झाला असण्याची शक्यता हेझबोलाने व्यक्त केली आहे.

लिथियम बॅटरी जर प्रमाणापेक्षा अधिक गरम झाली तर त्यातून धूर निघतो, बॅटरी वितळण्याची आणि त्यामुळे आग निर्माण होण्याची शक्यता निर्माण होते. अशाप्रकारच्या बॅटरी मोबाइल फोन, लॅपटॉप आणि इलेक्ट्रॉनिक वाहनात वापरल्या जातात. ५९० डिग्री सेल्सियसपर्यंत बॅटरी तापल्यास त्यात आग लागते.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is pager how can they explode know facts kvg