जनसामान्यांसाठी सरकार विविध योजनांची अंमलबजावणी करत असते. या योजनांचा फायदा सामान्य जनतेला रोजच्या आयुष्यात होतो. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या मूलभूत गरजा भागविण्यासाठी सरकार विविध योजना आणते. अशा योजनांमधून सरकार सामान्य लोकांना सोई-सुविधा उपलब्ध करून देत असते. आज आपण जाणून घेऊ सरकारच्या अशाच एका योजनेविषयी. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) असे या योजनेचे नाव आहे. या योजनेमार्फत गरजूंना आरोग्यविषयक सोई-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. आज आपण या योजनेचे महत्त्व आणि नोंदणी कशी करायची याबद्दल जाणून घेऊ.
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही एक आरोग्य विमा योजना आहे. महत्त्वाचे म्हणजे ही जगातील सर्वांत मोठी आरोग्य योजना आहे. या योजनेमार्फत गरजूंना वैद्यकीय तपासणी, डॉक्टरांचा सल्ला आणि उपचार घेता येतो. गरीब लोकांना उत्तम दर्जाची दवाखान्याची सोय उपलब्ध व्हावी, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे गरिबांना आरोग्याशी संबंधित कोणत्याही आर्थिक संकटाचा सामना करावा लागू नये, अशा रीतीने या योजनेची रचना करण्यात आली आहे.
या योजनेची वैशिष्ट्ये
१. प्रत्येक कुटुंबासाठी प्रतिवर्ष पाच लाख खर्चाची तरतूद या योजनेत करण्यात आली आहे.
२. नागरिक सार्वजनिक अथवा खासगी दवाखान्यात उपचार घेऊ शकतात.
३. दवाखान्यात दाखल होण्यापूर्वीचा तीन दिवसांचा खर्च आणि दाखल झाल्यानंतर १५ दिवसांचा खर्च या योजनेमार्फत केला जातो.
४. औषधे आणि वैद्यकीय वस्तू
५. राहण्याची आणि जेवणाची सोय
६. बारा कोटींपेक्षा जास्त गरीब कुटुंबे या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
७. कुटुंबाचा आकार, वय अथवा लिंग यांवर कोणतेही बंधन नाही.
८. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये समाविष्ट होण्यापूर्वी कोणत्याही वैद्यकीय स्थितीमुळे त्रस्त असलेली पात्र व्यक्ती नोंदणी केल्याच्या दिवसापासूनच या योजनेंतर्गत त्या सर्व वैद्यकीय उपचारांचा लाभ घेऊ शकेल.
प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी नोंदणी कशी करू शकता?
१. pmjay.gov.in वरून PMJAY पोर्टलवर जा
२. नोंदणी करण्यासाठी मेनूमधून PMJAY Gov निवडा
३. तुमची माहिती भरा.
४. तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय करून घ्या.
५. तुमची वैयक्तिक माहिती भरा.
६. कागदपत्रे अपलोड करा
७. पुन्हा एकदा फॉर्म बरोबर असल्याची खात्री करा आणि पुष्टी (Confirm) करा.
हेही वाचा: NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?
ज्या नागरिकांचे वय ७० पेक्षा जास्त आहे, असे ज्येष्ठ नागरिक आयुष्मान अॅपवरून थेट नोंदणी करू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २९ ऑक्टोबरला आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने (AB PM-JAY) अंतर्गत आयुष्मान वय वंदना हेल्थ कार्ड लाँच केले आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत ज्येष्ठ नागरिकांना नोंदणी करण्यासाठी फक्त आधार कार्ड असणे आवश्यक आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा निधी पूर्णपणे सरकारकडून दिला जातो.