तुम्ही तुमच्या आजुबाजूच्या लोकांना जमीन खरेदी-विक्री करताना पाहिलं असेल. यावेळी शेतजमीन विकत घेताना आमची फसवणूक झाली. जमिनीचा मूळ मालक वेगळाच होता, पण प्रत्यक्षात जमीन कसणारी व्यक्ती दुसरीच निघाली, या व अशा अनेक तक्रारी वेळोवेळी कानावर येतात. त्यामुळे जमीन खरेदी करताना आपली फसवणूक होऊ नये, यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं असतं. तुम्हाला जमीन विकायची किंवा विकत घ्यायची असेल तर या जमिनीची नोंदणी कशी केली जाते हे तुम्हाला माहिती आहे का? चला तर मग जाणून घेऊयात.
जमिनीची नोंदणी करण्यापूर्वी या गोष्टी नक्की तपासा –
- अनेक वेळा आपण जमीन किंवा प्लॉट खरेदी करतो आणि नंतर घाईमुळे काहीही तपासत नाही. अशा परिस्थितीत ती जमीन विकत घेऊनही ती मिळवण्यासाठी आयुष्यभर न्यायालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात.अशी समस्या टाळण्यासाठी येथे नमूद केलेल्या गोष्टी तपासून पाहा कारण रिअल इस्टेटच्या बाबतीत सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे.
- कोणत्याही जमिनीची नोंदणी करण्यापूर्वी ती विकणाऱ्या व्यक्तीची संपूर्ण माहिती घ्यावी. यानंतर किती वेळा जमीन विकली आणि किती वेळा खरेदी केली, याचीही पडताळणी व्हायला हवी. जर तुम्ही शेतीसाठी कोणतीही जमीन खरेदी करत असाल, तर तुम्ही त्याचा सर्व्हे नंबर किंवा तपशील घ्या आणि राज्य सरकारशी संबंधित वेब पोर्टलला भेट देऊन त्याचा डेटा तपासा.
- जर तुम्ही प्लॉटसाठी कोणतीही शेतजमीन खरेदी करत असाल, तर त्या जमिनीला प्लॉट किंवा घर बांधण्याची परवानगी मिळाली आहे का. जर तुम्ही औद्योगिक क्षेत्रासाठी जमीन खरेदी करत असाल तर त्यासाठी परवानगी दिली आहे की नाही किंवा मिळू शकते की नाही हे तपासून पाहा.
प्लॉट किंवा घराची रजिस्ट्री कशी होते?
- सर्वात आधी मालमत्ता किंवा जमिनीचे बाजार मूल्य निश्चित केले जाते. यानंतर स्टॅम्प पेपरची खरेदी केली जाते. मुद्रांक शुल्क जमिनीच्या मालकासाठी मालकीचा पुरावा म्हणून काम करते.
- जमिनीच्या खरेदी-विक्रीसाठी सध्याच्या मालकाची आणि जमीन खरेदी केलेल्या व्यक्तीची सर्व माहिती नोंदविली जाते आणि नोंदणी क्रमांकाद्वारे नोंदणी केली जाते.
- रजिस्ट्रीमध्ये दोन साक्षीदारांचीही गरज असते. यावेळी साक्षीदारांचे फोटो आणि सही लागते.
- रजिस्ट्री झाल्यानंतर रजिस्ट्रर कार्यालयातून एक स्लिप मिळते. ही स्लिप खूप महत्वाची असून नेहमी जपून ठेवा. स्लिप मिळणे याचा अर्थ रजिस्ट्री पूर्ण होणे.
या सगळ्यानंतर संबंधित खरेदी केलेल्या जमिनीचे मालकी हक्क खरेदीदाराला मिळतात..