What is the Concept of Slow Shopping? : हल्ली शॉपिंग करायला जाण्यासाठी भल्यामोठ्या बॅगा उचलून मार्केटपर्यंत जाण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या एका क्लिकवर तुम्हाला हवं तर तुमच्या दारापर्यंत आणू शकता. म्हणूनच की काय नको असलेल्या अनेक वस्तूही तुमच्या घरात धूळ खात राहतात अन् पैशांचा नको तेवढा अपव्यय होत राहतो. यामुळे तुमचं अर्थनियोजन बिघडतं. जेव्हा मासिक पगाराचा हिशोब लावायला बसतो तेव्हा या अनावश्यक गोष्टींच्या बिलांकडे पाहून पश्चाताप करण्यापलिकडे तुमच्याकडे काहीच उरत नाही. ही अशी परिस्थिती टाळण्यासाठी एक नवी संकल्पना अर्थतज्ज्ञांनी मांडली आहे. ती म्हणजे स्लो शॉपिंग. आता तुम्ही म्हणाल स्लो शॉपिंग म्हणजे हळू हळू खरेदी करायची? तर हो. पण तीही व्यवस्थित नियोजन करून.
स्लो शॉपिंग हा आर्थिक ट्रेंड
स्लो शॉपिंग हा एक आर्थिक ट्रेंड आहे. यामुळे खर्च आणि खरेदी करताना विचारपूर्वक निर्णय घेतला जातो. तुम्ही का खऱेदी करत आहात आणि या खरेदीवर किती खर्च करणार आहात, यावर हा ट्रेंड लक्ष केंद्रित करतो, अशी माहिती हफपोस्टला ग्राहक विस्त आणि बजेट तज्ज्ञ अँड्रिया वोरोच यांनी दिली. इच्छा निर्माण होताच एखादी वस्तू विकत घेण्याचा मोह झाल्यास तो मोह आवरता आला पाहिजे. स्लो शॉपिंगमुळे तु्म्ही खरेदीचा निर्णय घेण्याआधी विचार करता. एखादी वस्तू आवडली म्हणून तत्काळ न घेता त्या वस्तूची किंमत, वस्तूची तुमच्या आयुष्यातील गरज या दोन पातळ्यांवर विचार करून वस्तू खरेदी करण्याच्या प्रक्रियेला स्लो शॉपिंग म्हटलं जातं.
समजा एखादी वस्तू तुम्हाला प्रचंड आवडली आहे. तर ती तत्काळ खरेदी न करता त्या वस्तूची तुमच्या आयुष्यातील गरज आधी ओळखा. त्या वस्तूला दुसरा कोणता पर्याय उपलब्ध आहे का पाहा. ती वस्तू तुमच्या आयुष्यात महत्त्वाची असेल तर त्या वस्तूची किंमत जाणून घेतली जाते. किंमत तुमच्या आवाक्याबाहेरची असेल तर त्या बजेटनुसार तुम्हाला तरतूद करावी लागते. मगच ती वस्तू खरेदी केली जाते, ही संपूर्ण प्रक्रिया म्हणजे स्लो शॉपिंग. या प्रक्रियेत अनेकदा ती वस्तू खरेदी न करण्याचाही निर्णय घेतला जातो. त्यामुळे अर्थबचत होते. तसंच, स्लो शॉपिंगमुळे तीच वस्तू तुम्हाला इतर ठिकाणी किंवा काही दिवसांनी मूळ किंमतीपेक्षा अधिक स्वस्तात मिळण्याची शक्यता असते.
हेही वाचा >> Toxic Dating Trends म्हणजे काय? झोम्बिईंग ते किटनफिशिंग, हे टॉक्सिक डेटिंग ट्रेंड्स तुम्हाला माहीत आहे का?
खरेदीची वेळ पाहा
ऑनलाईन किंवा ऑफलाईन शॉपिंगचीही काही वेळ असते. त्या वेळेत तुम्ही शॉपिंग केली तर ती फायदेशीर ठरते. ऑफलाईन शॉपिंग करताना नेहमी ऑफसिझन खरेदी करण्याचा सल्ला दिला जातो. तर कधीकधी सिझनमध्येच अनेक ऑफर्समध्ये एखादी वस्तू मूळ किमतीपेक्षा कमी किमतीत मिळते. तसंच, ऑनलाईन शॉपिंगसाठीहीअॅमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या कंपन्या दर दोन महिन्याला काहीतरी ऑफर देत असतात. अशावेळी खरेदी केल्यासही बचत होऊ शकते.
थोडक्यात सांगायचं झालं तर, पाहा, थांबा, विचार करा, मूल्यांकन करा मगच खरेदी करा. म्हणजे, एखादी वस्तू आवडली तर ती लगेच खरेदी करू नका. ती वस्तू तुमच्या आयुष्यात नसल्याने काय फरक पडतोय याची कारणं जाणून घ्या. ती वस्तू अत्यावश्यक असेल तर त्याची किंमत जाणून घ्या. एकाच दुकानात किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर त्या वस्तूचं मूल्यांकन करण्यापेक्षा इतर ठिकाणीही करा. मगच खरेदी करा.