What is SpaceX Dragon capsule which Brings Sunita Williams : अंतराळवीर सुनीता विल्यम्स या नऊ महिने अंतराळात घालवल्यानंतर सुरक्षितपणे पृथ्वीवर परतल्या आहेत. भारतीय वेळेनुसार पहाटे ३.३० च्या सुमारास त्यांचे स्पेस कॅप्सूल फ्लोरिडाच्या समुद्रात उतरले. सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर हे केवळ आठ दिवसांच्या अंतराळ मोहिमेवर आंतरराष्ट्रीय आंतराळ स्थानकात (International Space Station) गेले होते. आंतराळ स्थानकात दोघेही आठ दिवस संशोधन करून परतणार होते. मात्र, त्यांच्या बोईंग स्टारलायनर या स्पेसक्राफ्टमधील तांत्रिक बिघाडामुळे त्यांना २८६ दिवस तिथेच घालवावे लागले.
सुनीता विल्यम्स व विल्मोर यांना परत आणण्यासाठी अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने स्पेसएक्स या खासगी आंतराळ संशोधन कंपनीच्या मदतीने मोहीम आखली होती. स्पेसएक्सच्या अवकाशयानाने क्रू-९ ड्रॅगन या अवकाशयानाने १४ मार्च रोजी दोघांना परत आणण्यासाठी पृथ्वीवरून उड्डाण केलं आणि आज पहाटे ते यान दोन्ही अंतराळवीरांना घेऊन परतलं.
नासाने विल्यम्स व विल्मोर यांना परत आणण्यासाठी स्पेसएक्सचं ड्रॅगन क्रू कॅप्सूलची निवड केली होती. स्पेसएक्स ड्रॅगन कॅप्स्यूल हे एक अत्याधुनिक अंतराळ यान आहे, जे उद्योगपती एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीने विकसित केलं आहे. सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून पृथ्वीवर परत आणण्यासाठी या यानाचा वापर करण्यात आला.
ड्रॅगन कॅप्सूलची ४९ यशस्वी उड्डाणं
ड्रॅगन कॅप्स्यूल हे यान कार्गो ड्रॅगन आणि क्रू ड्रॅगन अशा दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. सुनीता विल्यम्स यांच्या परतीच्या मोहिमेसाठी क्रू ड्रॅगन या यानाचा वापर करण्यात आला. जे खास अंतराळवीरांना घेऊन जाण्यासाठी डिझाइन करण्यात आलं आहे. हे कॅप्सूल बनवल्यापासून आतापर्यंत ४९ वेळा लाँच (उड्डाण) करण्यात आलं आहे. यापैकी ४४ वेळा या कॅप्सूलने अंतराळ सफर केली आहे. बऱ्याचदा आंतरराष्ट्रीय आंतराळ स्थानकाला भेट दिली आहे. या कॅप्सूलमध्ये सात अंतराळवीर बसून प्रवास करू शकतात.
पूर्णपणे ऑटोनॉमस अंतराळयान
ड्रॅगन कॅप्सूल पूर्णपणे स्वायत्तपणे (ऑटोनॉमसली) काम करू शकतं. काही अवकाशयानं अंतराळ केंद्रातून हाताळली जातात. ते आयएसएसची आपोआप जोडलं जातं आणि पृथ्वीवर परत आणता येतं. आवश्यकता असल्यास या कॅप्सूलमध्ये बसलेले अंतराळवीर देखील हे चालवू, हाताळू शकतात.