Stand-up Comedy Basics कुणाल कामराने एकनाथ शिंदेंवर विडंबनात्मक गाणं रचलं आणि त्याच्यावर कारवाई झाली. त्यानंतर त्याने माफी मागणार नाही म्हटलं. त्या पाठोपाठ स्वाती सचदेवा या स्टँड अप कॉमेडियनने आई सह असलेल्या नात्याबाबत आणि व्हायब्रेटरबाबत भाष्य केलं त्यामुळे तिच्यावरही टीका झाली. काही दिवसांपूर्वी स्टँड अप कॉमेडियन प्रणित मोरेलाही मारहाण झाल्याची बातमी आपण वाचली असेल. पण तुम्हाला स्टँड अप कॉमेडी म्हणजे काय ते माहीत आहे का? आपण जाणून घेऊ याबाबत.
स्टँड अप कॉमेडी म्हणजे नेमकं काय?
स्टँड अप कॉमेडी म्हणजे असा एक प्रयोग जो प्रेक्षकांसमोर एक कॉमेडियन सादर करतो. मंचावर कलाकार उभा असतो आणि तो प्रेक्षकांना त्याचे अनुभव, किस्से, जोक हे सांगून हसवत असतो. कधी नकलाही करतो, कधी वास्तवावर परखड पण विनोदी अंगाने भाष्यही करतो, कधी आपल्या सूक्ष्म निरीक्षणातून प्रेक्षकांना हसवतो. प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हे स्टँड अप कॉमेडियनचं काम असतं. स्टँड अप कॉमेडियनमध्ये एका ओळीच्या जोकपासून ते अगदी किस्से, गोष्टी, प्रॉप्स, संगीत, शब्द भ्रम कला या सगळ्यांचा समावेश होतो.
स्टँड अप कॉमेडीचा इतिहास काय आहे?
स्टँड अप कॉमेडी हा प्रकार १८ व्या शतकात अमेरिकेत जन्माला आला. तिथून तो भारतात आला आहे. चार्ल्स फर्रार ब्राऊन नावाचे एक अमेरिकेतले विनोदी लेखन करणारे लेखक होते. त्यांना नॉम डे प्लम या नावानेही ओळखलं जायचं. ते त्यांचे अनुभव उभं राहून लोकांना सांगायचे आणि लोक हसत असत. स्टँड अप कॉमेडीचा जन्म इथून झाला. चार्ल्स ब्राऊन यांना अमेरिकेचे पहिले स्टँड अप कॉमेडियन मानलं जातं. स्टेजवर स्टँड अप कॉमेडी सादर करणारी एक महिला होती. १९११ मध्ये नेली पेरियर नावाच्या महिलेने स्टँड अप कॉमेडी करण्यासाठी स्टेज म्हणजेच मंचाचा वापर केला होता. उपस्थित प्रेक्षकांशी थेट संवाद साधणं आणि त्यातून विनोद निर्मिती करत जाणं याला स्टँड अप कॉमेडी म्हणतात.
महाराष्ट्रात स्टँड अप कॉमेडी कुणी आणली?
महाराष्ट्रात स्टँड अप कॉमेडी हा प्रकार कुणी आणला ? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहीत आहे का? या प्रश्नाचं उत्तर आहे पु.ल. देशपांडे. मंचावर एक डेस्क, त्यावर एका बाजूला भरुन ठेवलेलं तांब्या भांडं, समोर एक माईक. अशा साधनांमध्ये पुलं. उभं राहून त्यांच्या विनोदी कथा सांगत. त्या कार्यक्रमाला कथाकथन असं म्हटलं जाई. व. पु. काळे, शंकर पाटील, द.मा. मिरासदार यांनीही अशा प्रकारचे स्टँड अप कार्यक्रम केले. त्याला त्यावेळी त्यावेळी स्टँड अप म्हटलं जात नव्हतं तर कथाकथन म्हटलं जाई. नाट्यगृहांमध्ये नाटकांचे प्रयोग असतात त्याप्रमाणे हे कथाकथनाचे प्रयोग होत असत. साधारण २००० सालापर्यंत हे कथाकथनाचे प्रयोग सुरु होते. त्यानंतर मध्यंतरीच्या काळात हे प्रयोग बंद झाले. साधारण दहा एक वर्षांपूर्वी मराठीत भाडिपा म्हणजेच भारतीय डिजिटल पार्टीच्या सारंग साठ्ये आणि इतर मंडळींनी हा प्रयोग सुरु केला.
जॉनी लिव्हरचा गाजलेला काळ
हिंदीत जॉनी लिव्हरने विविध ऑर्केस्ट्रा, शोज, स्टेज शो यामधून स्टँड अप कॉमेडी हा प्रकार रुजवला आणि मोठा केला. त्याची परंपरा पुढे राजू श्रीवास्तव, नवीन प्रभाकर, सुनील पाल यांसारख्या कलाकारांनी सुरु ठेवली. कपिल शर्मासारखा कलाकार हा स्टँड अप कॉमेडीच फाईंड आहे हे विसरता येणार नाही.
स्टँड अप कॉमेडी कुठल्या भाषांमध्ये होते?
स्टँड अप कॉमेडी हिंदी, मराठी, इंग्रजी या भाषांमध्ये मोठ्या प्रमाणावर होते. द कॉमेडी शो, हास्य सम्राट यांसारख्या कार्यक्रमांनीही स्टँड अपचा प्रकार रुजवून मोठा केला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
स्टँड अप कॉमेडीचे तीन प्रकार प्रचलित
स्टँड अप कॉमेडीचे दोन प्रकार प्रचलित आहेत. पहिला प्रकार म्हणजे कॉमेडियन त्याचे अनुभव, त्याची निरीक्षणं यातून प्रेक्षकांना हसवतो. त्यांचं मनोरंजन करतो. दुसरा प्रकार आहे क्राऊड वर्क. क्राऊड वर्क हा प्रकार गेल्या दोन ते तीन वर्षांत चांगलाच प्रसिद्ध झाला आहे.
क्राऊड वर्क म्हणजे काय?
क्राऊड वर्क म्हणजे कॉमेडीयन प्रेक्षकांशी संवाद साधतो. प्रेक्षकांना काही प्रश्न विचारतो आणि त्यांच्या उत्तरांतून टायमिंग साधत विनोद निर्मिती करतो. प्रणित मोरेने केलेले अनेक क्राऊड वर्क युट्यूबवर व्हायरल होतात. जवळपास सगळेच कॉमेडियन या प्रकारात कॉमेडी करायला उत्सुक असतात कारण क्राऊड वर्कमधला विनोद उत्स्फूर्त असतो. कॉमेडियन मुनव्वर फारुखीनेही केलेले क्राऊड वर्क चर्चेचा विषय ठरले होते.
डार्क कॉमेडी किंवा रोस्टिंग
डार्क कॉमेडी किंवा रोस्टिंग हा स्टँड अपमधला तिसरा प्रकार आहे. या प्रकारात अनेकदा शिवराळ भाषाही वापरली जाते आणि त्यातून विनोद निर्मिती केली जाते. यामुळे अनेक कॉमेडियन अडचणींतही आले आहेत. रणवीर अलाहबादिया आणि समय रैना यांच्या शो वरुन झालेला वाद अजूनही धुमसतो आहे. त्याआधी एआयबी नावाच्या शोनेही अशाच पद्धतीने सगळ्या मर्यादा ओलांडल्या होत्या. यामध्ये एकमेकांवर अगदी पातळी सोडून, हिणकस शेरेबाजी करुन, शिव्या देत विनोद निर्मिती केली जाते त्यामुळे या प्रकाराला डार्क किंवा रोस्टिंग असं म्हटलं जातं.
विनोद निर्मिती ही टायमिंगमधून होते हे महाराष्ट्रातल्या अनेक कलाकारांनी दाखवून दिलं आहे. दरम्यान स्टँडअप कॉमेडी आणि ते करणारे कॉमेडियन यांचं सध्या पेव फुटलं आहे. नवं काय निर्माण करणार? असा प्रश्न अनेकांना पडतो, तस्सव्वुर में कंगाली का दौर चल रहा है अशी आजची स्थिती आहे त्यामुळे अनेक कॉमेडियन डार्क कॉमेडी किंवा रोस्टिंग याचाच आधार घेताना दिसत आहेत.