तुम्ही कुठेतरी फिरायला जाता किंवा कामानिमित्त दुसऱ्या शहरात जाता तेव्हा राहण्यासाठी आपण अनेकदा हॉटेल बुक करतो. प्रत्येक जण आपल्या बजेटनुसार हॉटेल बुक करतो. यावेळी ऑनलाईन हॉटेल बुक करताना प्रत्येक हॉटेलच्या सुविधा आणि रिव्ह्युजबरोबर थ्री, फोर व फाइव्ह स्टारसारख्या रेटिंगदेखील पाहायला मिळतात. याशिवाय अनेक हॉटेल्सच्या नावांपुढे रेटिंगचे स्टार दिलेले असतात. या रेटिंगनुसार प्रत्येक हॉटेलमध्ये राहण्याचा खर्च असतो आणि त्यानुसार तिथे सुविधा दिल्या जातात. हॉटेलला जितके कमी स्टार तितक्या सुविधादेखील तेथे कमी मिळतात. पण, तुम्ही कधी विचार केला आहे की, हॉटेलचे हे रेटिंग कोण ठरवते आणि ते कसे ठरवले जाते? नाही ना? चला तर मग जाणून घेऊ…
कोणत्या हॉटेलमध्ये काय सुविधा मिळतात?
१) वन स्टार : वन स्टार हॉटेल्समध्ये राहण्याची अगदी साधी व्यवस्था असते. तसेच तिथे राहण्याचा खर्चही खूप कमी असतो. अशी हॉटेल्स अनेकांना सहज परवडतात. त्यातील सुविधांबद्दल बोलायचे झाल्यास; स्वच्छ खोल्या, स्वच्छ बेडशीट, टॉयलेटची व्यवस्था, गरम व थंड पाण्याची व्यवस्था इत्यादींचा समावेश आहे. पण, या हॉटेल्समधील खोल्या खूप छोट्या असतात.
२) टू स्टार : वन स्टार हॉटेल्सपेक्षा टू स्टार हॉटेल्समधील सुविधा थोड्या चांगल्या असतात. अशा हॉटेल्समधील खोलीचा आकार थोडा मोठा असू शकतो. अशा हॉटेल्समध्ये एक रात्र राहण्यासाठी तुम्हाला १५०० रुपयांपर्यंत खर्च येतो.
३) थ्री स्टार : थ्री स्टार हॉटेल्समधील खोलीचा आकार थोडा मोठा असतो. त्यातील बहुतांश खोल्यांमध्ये एसी बसवण्यात आलेले असतात; शिवाय ग्राहकांना वायफायची सुविधाही देण्यात आलेली असते. त्यातील दरवाजांना फिटेड लॉक लावलेले असते आणि पार्किंगची सुविधाही हॉटेलकडून उपलब्ध करून दिली जाते. या हॉटेल्समध्ये राहण्यासाठी तुम्हाला २००० रुपयांपर्यंत पैसे मोजावे लागू शकतात.
४) फोर स्टार : फोर स्टार हॉटेल्समध्ये सुइट रूम आणि बाथरूममध्ये बाथ टबसारख्या सुविधा मिळतात. याशिवाय वायफाय, मिनी बार, फ्रिज आदी सुविधा देण्यात आलेल्या असतात. अशा हॉटेल्समध्ये राहण्याचा खर्च थोडा जास्त असतो.
५) फाइव्ह स्टार : फाइव्ह स्टार हॉटेल्समध्ये हॉस्पिटॅलिटीकडे विशेष लक्ष दिले जाते. त्यामध्ये पाहुण्यांचा आरामदायी मुक्काम आणि लक्झरी सुविधा यांची विशेष काळजी घेतली जाते. तेथे आलेल्यांना अनेक मल्टी क्लास सुविधा दिल्या जातात. २४ तास कॉफीची सुविधा उपलब्ध असते. या हॉटेलमधील खोलीचा आकार खूप मोठा असतो. त्याशिवाय अशा हॉटेलमध्ये जिम, स्विमिंग पूल अशा अनेक लक्झरी सुविधाही मिळतात.
हॉटेल्सना रेटिंग कोण देते?
पर्यटन मंत्रालयाच्या अंतर्गत एक समिती आहे. या समितीला हॉटेल अँड रेस्टॉरंट अप्रूव्हल अँड क्लासिफेक्शन कमिटी, असे म्हणतात; जी हॉटेल्सना रेटिंग देण्याचे काम करते. या समितीच्याही दोन विंग असतात. त्यापैकी एक विंग 1 ते 3 स्टार रेटिंग आणि दुसरी विंग फोर व फाइव्ह स्टार रेटिंग हॉटेल्सच्या पडताळणीचे काम बघते. मात्र, आजकाल सर्वच हॉटेल्स आपापल्या परीने स्टार रेटिंग देत व्यवसाय करू लागली आहेत.
हॉटेल्सचे रेटिंग कसे ठरवले जाते?
कोणत्या हॉटेलला किती रेटिंग द्यायचे हे एका पॅरामीटरवर ठरवले जाते. रेटिंगसाठी एखाद्या हॉटेलने अर्ज केल्यानंतर एक टीम येऊन हॉटेलला भेट देते आणि हॉटेलची स्वच्छता, तेथील सुविधा, खोलीचा आकार, ॲक्सेसरीज इत्यादी पाहते आणि गाइडलाइन्सनुसार इतर सर्व पॅरामीटर्सवर या सुविधांची चाचणी घेते. त्यानंतरच हॉटेलचे रेटिंग देण्याचे काम केले जाते.