Gross Salary Meaning: नोकरदार वर्गासाठी महिन्याच्या पहिल्या तारखेला (काहींच्या बाबतीत ही तारीख पहिल्या आठवड्यात किंवा पहिल्या १० दिवसांत असू शकते) बँकेच्या खात्यात जमा होणारा पगार म्हणजे प्रचंड जिव्हाळ्याचा विषय असतो. याच पगारावर सामान्य नोकरदार वर्गापासून लाखोंचं ‘पॅकेज’ असणाऱ्या पदाधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांचं महिन्याचं गणित अवलंबून असतं. पण आपला नेमका पगार किती आणि आपल्याला प्रत्यक्षात मिळतो किती, याबाबत अनेकदा संभ्रम निर्माण होतो. आपल्या पॅकेजपेक्षा प्रत्यक्षात महिन्याला असणारा आपला पगार कमी का असतो? हे वरचे पैसे कुठे जातात?
सॅलरी स्लीप अर्थात पगाराच्या स्लीपमध्ये बऱ्याच प्रकारच्या गोष्टींचा समावेश करण्यात आलेला असतो. याच स्लीपमध्ये आपला कंपनीकडून सांगण्यात आलेला पगार व आपल्याला प्रत्यक्षात मिळणारा पगार अशा दोन्ही गोष्टींचा उल्लेख असतो. पण त्याचबरोबर इतरही अनेक बाबी नमूद करण्यात आलेल्या असतात. या बाबी म्हणजेच आपला CTC अर्थात कंपनीकडून देण्यात येणारा पगार आणि NET अर्थात प्रत्यक्षात आपल्या खात्यात जमा होणारा पगार यातला फरक असतात!
CTC म्हणजे काय?
CTC चं पूर्णरूप अर्थात लाँगफॉर्म आहे Cost To Company. सोप्या शब्दांत सांगायचं तर एखाद्या कर्मचाऱ्याला नोकरीवर ठेवण्यासाठी त्याच्यावर कंपनी दर महिन्याला आणि वार्षिकही एकूण किती पैसे खर्च करते, त्याचा आकडा! मग यामध्ये तुम्हाला प्रत्यक्षात मिळणारा पगार, त्यावरचे कर, इतर डिडक्शन्स अर्थात थोडक्यात पगारातली घट वगैरे बाबी मिळून हा CTC ठरतो.
…मग NET सॅलरी म्हणजे काय?
तर नेट सॅलरी म्हणजे तुमच्या बँक खात्यात सर्व डिडक्शन झाल्यानंतर प्रत्यक्षात जमा होणारी रक्कम म्हणजे तुमची NET सॅलरी अर्थात तुमचा निव्वळ पगार! यात तुमचे सगळे डिडक्शन मिळवले की तुमचा सीटीसी येतो.
‘पगारा’त कोणकोणत्या बाबींचा समावेश?
पगारात कोणकोणत्या बाबींचा समावेश असावा किंवा नसावा किंवा नेट सॅलरीमध्ये कोणत्या गोष्टी याव्यात किंवा न याव्यात याबाबत प्रत्येक कंपनीत सारखेच ठोकताळे नसू शकतात. पण सामान्यपणे जी पद्धत अवलंबली जाते. त्यानुसार तुमच्या पगारात वेगवेगळ्या प्रकारच्या अलाऊंसेस अर्थात भत्त्यांचा समावेश केलेला असतो. त्यात तुमची बेसिक सॅलरी, निवास भत्ता आणि इतर भत्त्यांचा समावेश असतो. हे घटक तुमच्या पगाराचे निश्चित घटक असतात. यात फारसे बदल होत नाहीत.
व्हेरिएबल्स…
याव्यतिरिक्त व्हेरिएबल्स हा घटक तुमच्या किंवा कंपनीच्या कामगिरीवर अवलंबून असतो. सोप्या शब्दांत तुम्ही व कंपनीनं चांगली कामगिरी केली, कंपनीची भरभराट झाली तर त्या तुलनेत कर्मचाऱ्यांना दिला जाणारा हिस्सा म्हणजे व्हेरिएबल. (ही पद्धत सर्वच कंपन्यांमध्ये असेलच, असं नाही).
PM Awas Yojana 2.0: ‘या’ तीन चुका केल्यास सरकार परत घेईल अनुदान
निवृत्तीचं नियोजन!
पगाराचा आणखी एक महत्त्वाचा हिस्सा म्हणजे तुमच्या निवृत्तीचं नियोजन. अर्थात, यात प्रॉव्हिडंट फंड (तुमच्या पगाराच्या १२ टक्के), ग्रॅच्युइटी (ठराविक वर्षं कंपनीत काम केल्यानंतर मिळणारी रक्कम) अशा बाबींचा समावेश असतो. या बाबी तुमच्या एकूण पगारातून वजा करून मग तुम्हाला निव्वळ पगार मिळतो. याव्यतिरिक्त काही कंपन्यामध्ये टीडीएस, इएसआय, एनपीएस, स्वेच्छा निवृत्ती निधी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा कर्मचाऱ्यांना पुरवल्या जातात. तसं असल्यास यांचाही उल्लेख तुमच्या सॅलरी स्लीपमध्ये केला जातो.
TDS: टीडीएस अर्थात Tax Deducted at Source हा कर तुमच्या करपात्र उत्पन्नावर तुमच्या पगारातून वजा केला जातो. ही रक्कम तुमच्या ग्रॉस सॅलरीचा भाग असते, पण बँकेत जमा होणाऱ्या पगारातून वजा केली जाते. याव्यतिरिक्त तुमच्या उत्पन्न मर्यादेनुसार प्रोफेशनल टॅक्स अर्थात व्यावसायिक करही आकारला जातो.
प्रॉव्हिडंट फंड (पीएफ): निवृती निर्वाह निधी म्हणून दर महिन्याला ही रक्कम तुमच्या पगारातून वजा करून तुमच्या पीएफ अकाऊंटवर जमा केली जाते. पीएफच्या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला ती तपासताही येते. यामध्ये कर्मचाऱ्याच्या पगाराच्या १२ टक्के रक्कम त्याच्या पगारातून व १३.६१ टक्के रक्कम सरकारकडून भरली जाते.
आपल्या हाती येणारा पगार समजून घ्यायचा असेल तर त्यासाठी पगाराची स्लीप समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. त्यानंतरच आपण प्राप्तिकर भरण्याच्या स्लॅबमध्ये येतो की नाही? कोणत्या स्लॅबमध्ये येतो? आपल्या गुंतवणुकीवर करामध्ये किती सूट आपल्याला मिळू शकते? या गोष्टींचा अंदाज आपल्याला घेता येऊ शकतो.