मोदी सरकारने आपल्या दुसऱ्या कार्यकाळाच्या शेवटच्या अधिवेशनात यूपीए १ आणि यूपीए २ च्या काळातील अर्थव्यवस्थेची श्वेतपत्रिका काढली. त्याला प्रत्युत्तर देत असताना काँग्रेसनेही मोदी सरकारच्या दशकभरातील कामगिरीची कृष्णपत्रिका (काळी पत्रिका) काढली. या कृष्ण पत्रिकेत मोदी सरकारचे विविध आघाड्यावरील अपयश अधोरेखित करण्यात आले. मोदी सरकारकडून ८ फेब्रुवारी रोजी लोकसभेत काँग्रेस विरोधातली श्वेतपत्रिका सादर केली जाणार होती, त्याआधीच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी पत्रकार परिषद घेऊन कृष्णपत्रिका प्रसिद्ध केली.
यामुळे श्वेतपत्रिका आणि कृष्णपत्रिका यांच्यात नेमका काय फरक असतो, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. सरकार, शासकीय यंत्रणा किंवा संघटन किंवा एखाद्या संस्थेच्या कामाचे अवलोकन करण्यासाठी अशा पत्रिका काढल्या जातात. या दोन्ही पत्रिकांचा अर्थ आणि वैशिष्टे वेगवेगळी आहेत.
विश्लेषण : मोदी सरकारने लोकसभेत सादर केलेल्या श्वेतपत्रिकेत नेमकं काय आहे? वाचा सविस्तर…
कृष्णपत्रिका म्हणजे काय?
कृष्णपत्रिका एखाद्या विशिष्ट विषयावर, समस्येवर किंवा धोरणावर असहमती दर्षविणारे गंभीर असा प्रतिवाद करणारे असते. कृष्णपत्रिकेत वादग्रस्त विषयांचे गंभीर विश्लेषण केले जाते. त्यासाठी पुरावे सादर केले जातात आणि पर्यायी दृष्टीकोनाद्वारे प्रचलित धोरणे आणि दृष्टीकोनांना आव्हान दिले जाते.
कृष्णपत्रिकेची वैशिष्टे :
गंभीर विश्लेषण : विद्यमान धोरण, पद्धत आणि विचारांचे गंभीर विश्लेषण आणि मूल्यमापन करणे.
विरोधाची भूमिका : प्रचलित विचारसरणी आणि संबंधित संस्थेचा / सरकाचा दृष्टीकोन यांचा विरोध करणे किंवा त्यावरील मतभेद व्यक्त करणे.
विवादाचे विषय : वादग्रस्त विषयांवर भाष्य करणे, त्या विषयांवर पर्यायी समाधान सुचविणे.
पुराव्यावर आधारित प्रतिवाद : ज्या विषयांचा विरोध करायचा आहे, त्या विरोधाचे पुरावे, सांख्यिकी (डेटा) आणि तार्किक युक्तिवाद करणे.
बदल होण्यासाठी भूमिका घेणे : धोरणांमध्ये बदल करणे, परिवर्तन घडवणे किंवा पर्यायी दृष्टीकोन सुचवित असताना वर्तमान कमतरता किंवा अन्याय दूर होईल, अशी पद्धत सुचविणे.
श्वेतपत्रिका : केवळ राजकीय हिशेब चुकते करणारे हत्यार; कारभारात सुधारणा शून्य
श्वेतपत्रिका म्हणजे काय?
श्वेतपत्रिका हा एकप्रकारचा दस्तऐवज असून यात एखाद्या विशिष्ट समस्येविषयी सविस्तर माहिती सादर केली जाते. जसे की, त्या समस्येचे स्वरूप, त्याची व्याप्ती आणि त्यावरील उपाययोजनांसंबंधित माहिती. निर्णय घेण्यामागच्या प्रक्रियेची माहिती देणे, उपाय सुचविणे आणि कृतीसाठी शिफारसी देणे, हे श्वेतपत्रिकेचे उद्दिष्ट असते. एखाद्या धोरणाला आकार देण्यासाठी, संस्था किंवा तज्ज्ञांद्वारे श्वेतपत्रिका काढली जाते.
“या अर्थाने सरकारने संसदेत सादर केलेल्या दस्तऐवजाला श्वेतपत्रिका म्हणता येणार नाही. कारण यात दोन सरकारच्या काळातील अर्थव्यवस्थेची तुलना करण्यात आली आहे. ही श्वेतपत्रिका २०१४ मध्ये अर्थव्यवस्थेचा सर्वसमावेशक आढावा घेण्यासाठी काढली असती, तर याला श्वेतपत्रिका म्हणता आले असते”, असे द इंडियन एक्सप्रेसने केंद्राच्या श्वेतपत्रिकेवर भाष्य करताना म्हटले आहे.
सामान्य जनतेला सरकारची धोरणे, उपक्रम आणि त्यांचा अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या प्रभावाविषयी माहिती देण्यासाठी श्वेतपत्रिका हे महत्त्वपूर्ण साधन म्हणून काम करते. आर्थिक सुधारणा आणि त्याचे विविध क्षेत्रावर होणारे परिणाम याचे तपशीलवार मूल्यांकन करण्यासाठी श्वेतपत्रिका महत्त्वाची ठरते.
श्वेतपत्रिकेची वैशिष्टे :
सर्वसमावेशक माहिती : विशिष्ट विषय, समस्या आणि धोरणावर तपशीलवार आणि सर्वसमावेशक अशी माहिती यात दिली जाते.
वस्तुनिष्ठ दृष्टीकोन : तटस्थ आणि वस्तुनिष्ठ दृष्टीकोन ठेवून कोणत्याही पूर्वाग्रहाशिवाय माहिती आणि विश्लेषण सादर करणे.
धोरण शिफारस : सखोल विश्लेषण आणि संशोधनावर आधारित असे धोरणातील बदल, उपक्रम किंवा सुधारणांसाठीचे प्रस्ताव किंवा शिफारशींचा समावेश असणे.