The Emmy Awards : न्यूयॉर्कमध्ये नुकताच ५१ वा इंटरनॅशनल एमी अवॉर्ड सोहळा पार पडला. यावेळी निर्माती एकता कपूरला प्रतिष्ठित इंटरनॅशनल डायरेक्टरेट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर वीर दासला त्याचा नेटफ्लिक्स स्पेशल शो ‘वीर दास: लँडिंग’साठी बेस्ट कॉमेडी पुरस्कार मिळाला. पुरस्कार मिळाल्यानंतर वीर दास आणि एकता कपूर यांनी सोशल मीडियावर एमी अॅवॉर्डसह फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. विशेष म्हणजे एमी अवॉर्ड मिळवणारी एकता ही पहिली भारतीय महिला चित्रपट निर्माती ठरली आहे, तर वीर हा कॉमेडी क्षेत्रात हा अवार्ड मिळवणारा पहिला भारतीय ठरला आहे.
तुम्हाला या एमी अवॉर्डविषयी काही महत्वाच्या गोष्टी माहिती आहेत का? इंटरनॅशनल एमी अवॉर्ड हा प्राइमटाइम एमी अवॉर्डपेक्षा वेगळा असतो. एमी अवॉर्ड नेमका काय आहे? कुणाला दिला जातो? आणि एमी अवॉर्डचे प्रकार कोणते आहेत? आज आपण या विषयी सविस्तर जाणून घेऊ या.
एमी अवॉर्ड नेमका काय आहे? कुणाला दिला जातो?
एमी अवॉर्ड हा टेलिव्हिजन आणि मीडियामध्ये काम करणाऱ्या लोकांना दिला जाणारा सर्वात प्रसिद्ध पुरस्कार आहे. हा पुरस्कार चित्रपटांना दिला जात नाही. तर, टेलिव्हिजन आणि माध्यम क्षेत्रासाठी दिला जातो.
एमी अवॉर्ड केव्हा सुरू झाला?
एमी अवॉर्डची संकल्पना १९४८ ला जगासमोर आली. त्यानुसार २५ जानेवारी १९४९ रोजी पहिला एमी अवॉर्ड सोहळा पार पडला. यावेळी एकूण सहा पुरस्कार देण्यात आले होते.
एमी अवॉर्डचे प्रकार कोणते?
इंटरनॅशनल एमी अवॉर्ड आणि प्राइमटाइम एमी अवॉर्ड हे जरी दोन वेगवेगळे प्रकार असले तरी एमी अवॉर्ड काही विशिष्ट श्रेणींमध्ये सुद्धा दिले जातात. डे टाईम, क्रिडा, बातम्या, लघुपट, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी, प्रादेशिक, इत्यादी.
प्राइमटाइम एमी अवॉर्ड हा अमेरिकेत बनवलेल्या आणि प्राइम टाइमला प्रसारित केलेल्या टेलिव्हिजन कार्यक्रमासाठी असतो तर इंटरनॅशनल एमी अवॉर्ड हा आंतरराष्ट्रीय कार्यक्रमासाठी असतो.डे टाईम एमी अवॉर्ड अमेरिकन कार्यक्रमाला दिला जातो जो दिवसा दाखवला जातो. प्रादेशिक एमी अवॉर्ड हा राज्यातंर्गत कार्यक्रम, स्थानिक बातम्या इत्यादी गोष्टींना धरुन दिला जातो.
हेही वाचा : वर्षातून फक्त एकाच आठवड्यासाठी उघडते हे मंदिर! वर्षभर पेटत असतो दिवा; माहीत आहे का या रहस्यमय मंदिराविषयी….
एमी अवॉर्ड कोण देतात?
एमी अवॉर्ड हा थ्री सिस्टर संस्थेकडून दिला जातो. यात तीन संस्था असतात. पहिली टेलिव्हिजन अॅकेडमी जी प्राइमटाइम एमी अवॉर्ड सोहळा बघते. दुसरी नॅशनल अॅकेडमी ऑफ टेलिव्हिजन आर्ट अँड सायन्सेस जी डे टाईम, क्रिडा, न्यूज, आणि लघुपट संबंधित अवॉर्ड सोहळा बघते आणि तिसरी इंटरनॅशनल अॅकेडमी ऑफ टेलिव्हिजन आर्ट्स अँड सायन्सेस जी इंटरनॅशनरल एमी अवार्ड सोहळ्याची जबाबदारी सांभाळते.
प्रत्येक संस्था त्यांच्या टेलिव्हिजनमधील सदस्यांकडून मतदान करवून घेतात आणि पुरस्कार कोणाला द्यायचा, हे ठरवतात.
‘एमी’ या नावाचा अर्थ काय?
एमीचा वेगळा असा अर्थ नाही. एमी हा शब्द फक्त अवॉर्डशी संबंधित आहे. एमी अवॉर्डच्या वेबसाइटनुसार सुरुवातीला याचे नाव इम्मी (Immy) होते जे टेलिव्हिजनच्या टेक्निकल डेव्हलपमेंटमधील इमेज ऑर्थिकॉन कॅमेरा ट्यूबचे टोपणनाव होते. त्यानंतर स्त्रिलिंग या अर्थाने याचे नाव ‘एमी’बदलण्यात आले.