भारतात सध्या लोकांना तीव्र उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. वाढत्या तापमानामुळे लोक हैराण झाले आहेत. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने एप्रिल ते जूनदरम्यान भारतात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसांत थोडेसे तापमान वाढल्यानंतर जर आपली ही अवस्था आहे, तर जगातील सर्वांत उष्ण ठिकाणी लोकांची अवस्था काय असेल? पृथ्वीवरील सर्वांत उष्ण ठिकाण कोणते आहे तुम्हाला माहीत आहे का? जगातील सर्वांत उष्ण ठिकाणी राहणे खरेच शक्य आहे का? या प्रश्नांची उत्तरे आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
हेही वाचा – Dry Ice खाल्याने ५ जणांना झाली रक्ताची उलटी; ड्राय आईस काय असतो? बर्फापेक्षा वेगळं काय असतं?
कॅलिफोर्नियाच्या डेथ व्हॅलीमधील फर्नेस क्रीक हे जगातील सर्वांत उष्ण ठिकाण आहे. १९१३ मध्ये जेव्हा या ठिकाणी जमिनीपासून १.५ मीटर उंचीवर ठेवलेल्या थर्मामीटरमध्ये हवेचे तापमान ५६.७ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले; जे अजूनही कायम आहे. जागतिक हवामान संघटनेनेदेखील या माहितीला दुजोरा दिला आहे.
बीबीसीच्या सायन्स फोकस वेबसाइटनुसार, फर्नेस क्रीक येथे १० जुलै १९१३ येथे तापमान ५६.७ अंश सेल्सिअस होते. ते फक्त हवेचे तापमान होते, जमिनीचे तापमान त्याहूनही जास्त होते. १५ जुलै १९७२ रोजी डेथ व्हॅलीच्या जमिनीचे तापमान ९३.९ अंश सेल्सिअस इतके नोंदवले होते.
हेही वाचा – बार्बी पिंक रंगाची क्रेझ जगभरात कशी पसरली? जाणून घ्या गुलाबी रंगाचा इतिहास
आता साहजिकच तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, इथे कोणी व्यक्ती राहू शकते की नाही? ‘बिझनेस इनसाइडर’च्या २०२३ च्या अहवालानुसार, डेथ व्हॅलीमध्ये सुमारे ६०० लोक राहतात. उन्हाळ्यात या लोकांना ओव्हनमध्ये चालत आहोत, असे वाटते. उन्हाळ्यात येथील तापमान ५२-५३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. असे असूनही लोक कामासाठी बाहेर पडतात आणि एकमेकांना भेटतात. मुले शाळेत जातात अन् खेळतातही.
या ठिकाणी प्रतिकूल परिस्थिती असूनही येथे रोडरनर (Roadrunners- एक प्रकारचा पक्षी), चकवाला (Chuckwalla- पालीचा एक प्रकार), वाळवंटातील पपफिश (Pupfish माशाची दुर्मीळ प्रजाती) व कांगारू रॅट (Kangaroo Rat- उंदराची एक प्रजाती) यांसारखे काही वन्यजीवदेखील आढळतात.