What is the meaning of ‘Chhatrapati’ : छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानले जातात. रयतेचा राजा म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज हे कर्तृत्ववान युगपुरुष होते. स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. अष्टपैलू व्यक्तिमत्व, दूरदृष्टी, असीम धैर्य, पराक्रम, धाडस बहुविध गुणांनी परिपूर्ण असलेले महाराज रयतेवर जिवापाड प्रेम करायचे. आज या सामर्थ्यशाली योद्धा, युगप्रवर्तक जाणता राजाचे संपूर्ण जीवन आणि कार्य आपल्याला प्रेरक आहे.
छत्रपती शिवाजी महाराज की जय, असा जयघोष आपण नेहमी करतो; पण तुम्ही कधी विचार केलाय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावासमोर लावला जाणारा ‘छत्रपती’ या शब्दाचा अर्थ काय आहे? आज आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत.

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ६ जून १६७४ रोजी किल्ले रायगडावर झाला होता. हा दिवस मराठ्यांच्या इतिहासातील सुवर्ण अक्षरांनी कोरलेला दिवस होता. आज आपण ‘शिवराज्याभिषेक दिन’ म्हणून साजरा करतो. याच दिवशी महाराजांनी ‘छत्रपती’ ही सन्मानजनक पदवी धारण केली आणि स्वत:चे वेगळे राज्य निर्माण करून मराठा साम्राज्याची स्थापना केली.

‘छत्रपती’ शब्दाचा अर्थ काय?

‘छत्रपती’ ही एक सन्मानजनक व आदरयुक्त पदवी आहे, जी मराठा राजघराण्यात वापरली जाते. मराठी विश्वकोशानुसार, छत्रपती हा शब्द संस्कृत भाषेतील छत्र (छत्री) आणि पति (शासक) यांचा संयुक्त शब्द आहे. ‘संरक्षण करणारा शासक’ असा ‘छत्रपती’ या शब्दाचा अर्थ होतो.

मराठा राजघराण्यात वापरल्या जाणाऱ्या इतर पदव्या

मराठा राजघराण्यांनी त्यांच्या साम्राज्याच्या वंशाचा सन्मान करण्यासाठी अनेक पदव्या वापरल्या आहेत. ‘छत्रपती’ या सन्मानजनक पदवीबरोबर महाराज, राजे, पेशवे, क्षत्रिय कुलवंत इत्यादी पदवीसुद्धा वापरल्या आहेत.

छत्रपती शिवरायांना ‘महाराज’ म्हणण्यापूर्वी नेमकं काय म्हटलं जायचं?

इतिहासकार आणि संत साहित्याचे अभ्यासक सदानंद मोरे यांनी लोकसत्ताच्या एका वृत्तात छत्रपती शिवरायांना ‘महाराज’ म्हणण्यापूर्वी नेमकं काय म्हटलं जायचं? याविषयी सांगितले होते.
सदानंद मोरे सांगतात, “शिवाजी महाराज जेव्हा महाराष्ट्रात राज्य करू लागले तेव्हा त्यांचे मावळे, त्यांचे सरदार, त्यांच्या प्रशासनातले लोक, सैन्यातले सैनिक त्यांना काय म्हणत होते? हे सगळे त्यांना साहेब म्हणत होते. साहेब हा शब्द सत्तावाचक, अधिकारवाचक आहे. साहेब हा शब्द पर्शियन भाषेमुळे आपल्या भाषेत आला आणि रुढ झाला. पर्शियन बोलणाऱ्यांचं राज्य गेलं, मराठी बोलणाऱ्यांचं राज्य आलं ते देखील गेलं. त्यानंतर इंग्रज आले, म्हणजेच इंग्रजी बोलणाऱ्याचं राज्य आलं. तरीही साहेब हा शब्द कायम राहिला. आपण पुढे इंग्रजांसाठी साहेब शब्द वापरला. हा शब्द मुळात इंग्रजांसाठी नव्हता. शिवाजी महाराजांना हे वाटू लागलं की आपल्याला आपल्या भाषेतले शब्द हवेत. सत्तावाचक शब्द असले पाहिजेत हे त्यांना वाटू लागलं, त्यामुळे त्यांनी सुरुवात केली साहेब या शब्दापासून. त्याला पर्यायी शब्द आणला महाराज. त्यामुळे असं ठरलं की, छत्रपती शिवरायांना साहेब शब्दाऐवजी महाराज म्हणायचं. महाराज शब्दाचा उपयोग करायचा हे ठरलं. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज हे नाव त्या उपाधीसह रुढ झालं.”

Story img Loader