काय फालतू बडबड सुरू आहे, काय फालतूगिरी आहे, फालतू राजकारण बंद करा, ही वाक्य तुम्ही आत्तापर्यंत अनेकदा अनेकांच्या तोंडून ऐकली असतीलचं. राग, चिड व्यक्त करण्यासाठी किंवा न आवडलेल्या गोष्टींना आपण काहीवेळा फालतू म्हणून संबोधतो. अनेकदा मंत्र्यांच्या तोंडूनही फालतू शब्दाचा वापर झाल्याचे ऐकायला मिळते. एखाद्याने अगदीच वाईट विनोद केला तरीही आपल्या तोंडून पटकन काय फालतू विनोद होता असे येते. फालतू शब्द एखाद्याच्या स्वभावाचं वर्णन करतानाही वापरतात. एखाद्याचं चारित्र्यही फालतू असल्याचं म्हटलं जातं. पण, तुम्हाला माहीत आहे का? फालतू हा शब्द मराठी भाषेत आला कुठून? हा शब्द कशाप्रकारे तयार झाला? चला तर, आज हे आपण जाणून घेऊ….
‘फालतू’ हा शब्द मराठी भाषेत आला कुठून?
मराठी भाषेतील अनेक शब्द हे संस्कृत भाषेतून तयार झाले आहेत. त्यातलाच एक शब्द म्हणजे फालतू. हा शब्द संस्कृत भाषेतून मराठी भाषेत आला आहे. `कहाणी शब्दांची : मराठी भाषेच्या जडणघडणीची’ या पुस्तकात लेखक सदानंद कदम यांनी हा अर्थ दिला आहे.
फालतू शब्दाचा मूळ अर्थ काय?
लेखक सदानंद कदम यांच्या माहितीनुसार, फालतू बडबड करू नकोस, असं आपण कधीतरी कुणाला तरी उद्देशून म्हणतो. अशी बडबड करणारे लोक प्रत्येक क्षेत्रात आणि सदासर्वकाळ असतातच आणि यापुढेही राहणारच. पण हा शब्द मात्र फालतू नाही बरं का. हा मराठीत आलाय तो चक्क देववाणीतून, म्हणजे संस्कृत भाषेतून. फल्गु या मूळ संस्कृत शब्दापासून फालतू हा शब्द तयार झाला आहे. त्याचा अर्थ निःसत्त्व, असार, क्षुल्लक किंवा कुचकामाचे. स्वल्प, खेल, असत्य आणि निरर्थ या अर्थानंही तो वापरला जातो. आजही हा शब्द आपण वापरतो तो बेकार, क्षुद्र, हलक्या प्रतीचा, वाईट या अर्थानं.
हा शब्द आपल्याला आजचा वाटत असला तरी तो फार पूर्वीपासून वापरला जात आहे. बेकार, वाईट हेदेखील फालतू शब्दाचेच समानार्थी शब्द आहेत.
आपण मित्र-परिवारात अनेकदा बोलतानाही फालतू शब्दाचा वापर करतो. इतकेच नाही तर अनेक राजकीय मंत्री विरोधकांवर टीका करतानाही फालतू हा शब्द सर्रास वापरताना दिसतात.