शाब्बास, शाब्बास पोरी, शाब्बास पठ्ठ्या, अरे वाहह शाब्बास. हे शब्द तुम्ही आतापर्यंत एकलेच असतीलच. शाब्बास सुनबाई हा चित्रपटही तुम्हाला आठवत असेल. तसेच तुम्हालाही तुमच्या आई-वडिलांकडून, नातेवाईकांकडून किंवा शिक्षकांकडून कधीतरी शाबासकी मिळालीच असेल. पण तुम्हाला माहित आहे का? शाब्बास हा शब्द मराठी भाषेतला नाही. हा शब्द मराठी भाषेत कुठून आला ? शाब्बास या शब्दासाठी वापरण्यात आलेला मूळ शब्द काय होता? चला तर आज हे आपण जाणून घेऊ.
शाब्बास हा शब्द मराठी भाषेत कुठून आला?
मराठी भाषेत अनेक शब्द हे फारसी भाषेतून आले आहेत. त्यातलाच एक शब्द म्हणजे शाब्बास. अरबी आणि फारसी या भाषेतून हा शब्द मराठी भाषेत आला. ‘कहाणी शब्दांची: मराठी भाषेच्या जडणघडणीची’ या पुस्तकात लेखक सदानंद कदम यांनी हा अर्थ दिला आहे.
शाब्बास शब्दाचा मूळ अर्थ काय?
लेखक सदानंद कदम यांच्या माहितीनुसार, कुणी तरी इराणचा ‘शाह अब्बास’ म्हणे हवामानाचे अंदाज अचूक वर्तवायचा. त्याचं सगळेच म्हणणं बरोबर यायचं म्हणे. तो इतका प्रसिद्ध झाला की कुणीही बरोबर उत्तरं दिली, की त्याला लोक म्हणत ‘अरे हा तर ‘शाह अब्बास!’ या शाह अब्बासचंच झालं म्हणे शाब्बास. पण ही एक दंतकथाच. फारसी भाषेमध्ये एक शब्द आहे शाब्दाश. म्हणजे वाहवा, धन्यता. त्यावरुन तयार झालेला शब्द म्हणजे शाबाशी-शाबासकी. मराठीतच सांगायचं तर, धन्यवाद. खरं सांगायचं तर हा शब्दही हल्ली लोक विसरले आहेत. कारण अशी शाब्बासकी ज्याला द्यावी असे लोकही कमी झालेत.
हेही वाचा >> वाढदिवसाला केक का कापतात? मेणबत्त्या विझवण्याची प्रथा कशी सुरू झाली? रंजक इतिहास जाणून घ्या
मागील शतकात ज्ञान, विज्ञान आणि इतर क्षेत्रातील प्रगती अमेरिकेसारख्या इंग्रजी भाषक, सधन देशात घडल्याने ती आत्मसात करण्यासाठी जगभरातील इतर भाषकांना इंग्रजी शिकणे भाग पडले. गेल्या काही दशकात प्रसार आणि संपर्क माध्यमांची झपाट्याने वाढ झाल्याने जगभरातील श्रोत्यांपर्यंत आपले विचार पोहोचविण्यासाठी इंग्रजी भाषेचा आश्रय घेणे भाग पडले. त्यामुळे इंग्रजी मातृभाषा नसलेल्या समाजातही व्यवहारामध्ये इंग्रजीचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. त्यामुळे इंग्रजी शब्दांची मिसळ जवळजवळ प्रत्येक भाषेत होत आहे. विविध भाषांच्या भाषकांना आपल्या भाषेचे वैशिष्ट्य हरविणार का? अशी शंका येणे स्वाभाविकच आहे. आपल्यालाही मराठीच्या बाबतीत हा प्रश्न पडतो. म्हणजे बघा ना हल्ली मराठीचे शिक्षकही शाबासकी द्यायची म्हंटलं की ‘वा’ किंवा….गुड! म्हणून टाकतात.