What Is The Meaning Of ‘Pahalgam’? पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात २६ पर्यंटकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे देशभर खळबळ उडाली आहे. या घटनेला सात दिवस उलटले असून यादरम्यान भारत व पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. पहलगाम हे जम्मू आणि काश्मीरमधील एक अतिशय सुंदर, हिरव्यागार डोंगररांगांमध्ये वसलेलं ठिकाण आहे. हे ठिकाण केवळ निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध नाही, तर अमरनाथ यात्रेच्या दृष्टीनेही अत्यंत पवित्र मानलं जातं. पहलगाम या गावाच्या नावामागेही एक जुनी आणि रोचक कथा आहे.
‘पहलगाम’ नावाचा अर्थ
पहलगाम नावाचे दोन प्रमुख अर्थ सांगितले जातात. पहिला अर्थ काश्मिरी भाषेतील आहे. पहलगाम हा शब्द दोन काश्मिरी शब्दांपासून तयार झाला आहे. ‘पुहेल’ किंवा ‘पहेल’ म्हणजे मेंढपाळ आणि ‘गाम’ म्हणजे गाव. पहलगामचा एकत्रित अर्थ मेंढपाळांचे गाव असा होतो. दुसरा अर्थ फारसी भाषेतील आहे. ‘पहलगाम’ हा शब्द दोन फारसी-उर्दू शब्दांपासून तयार झाला आहे. ‘पहला’ (Pahla) म्हणजे पहिला किंवा प्रथम आणि ‘गाम’ (Gam किंवा Gaon) म्हणजे गाव. पहिलं गाव किंवा प्रथम वसलेलं गाव असा थोडक्यात अर्थ असा होतो.
ऐतिहासिक संदर्भ
परंपरागत कथेनुसार, प्राचीन काळात अमरनाथ गुहेकडे जाणाऱ्या यात्रेकरूंना पहिला स्थायिक पडाव ‘पहलगाम’ येथे असे. म्हणून या जागेला ‘पहिलं गाव’ किंवा ‘यात्रेचा पहिला पडाव’ असं मानलं गेलं.
अमरनाथ यात्रेची दंतकथा
भगवान शंकर जेव्हा पार्वतीला अमरकथेचा (अमरत्वाचे रहस्य) उपदेश करण्यासाठी अमरनाथ गुहेकडे नेत होते, तेव्हा त्यांनी आपले वाहन नंदी आणि इतर साथीदार पहलगाममध्ये सोडले होते. त्यामुळेही या जागेला बैलगाव असंही म्हटलं जात होतं. म्हणूनच हे महत्त्वाचं धार्मिक स्थान मानलं जातं.
पहलगामचं आधीचं नाव
काही स्थानिक लोककथांमध्ये पहलगामचा प्राचीन उल्लेख ‘बैलगाम’ किंवा ‘भल्गाम’ असा झालेला आहे. ‘भल’ म्हणजे देखील ‘पहिला’ असा अर्थ होतो. नंतर भाषिक बदलांमुळे ‘भल्गाम’चा अपभ्रंश ‘पहलगाम’ झाल्याचं काही विद्वान मानतात.
आजचं पहलगाम
आज पहलगाम केवळ अमरनाथ यात्रेचा प्रारंभबिंदू म्हणून नाही, तर एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणूनही ओळखलं जातं. येथील हिरव्यागार दऱ्या, लिद्दर नदीच्या निळसर पाण्याचे प्रवाह, थंड हवामान आणि बर्फाच्छादित डोंगरशिखरे हे सगळं पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येथे येतात. थोडक्यात पहलगाम म्हणजे पहिलं + गाम = पहिलं गाव/ अर्थ : अमरनाथ यात्रेचा पहिला थांबा, धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व, सांस्कृतिक संदर्भ; भगवान शंकराने इथे नंदी (बैल) आणि इतर साथीदार सोडले होते.
पहलगाम हे केवळ एक सुंदर गाव नाही, तर तिथे अमरनाथ यात्रेचा प्रारंभ होतो. इथे प्रत्येक वारा, प्रत्येक झरा, प्रत्येक दरी, काही ना काही पवित्रता आणि इतिहास सांगतो.