बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला नुकतंच अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने ड्रग्स प्रकरणात अटक केली. मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एका क्रूझवर रेव्ह पार्टी सुरू होती. यावर छापा टाकत एनसीबीने ही मोठी कारवाई केली. हाय प्रोफाईल रेव्ह पार्टीतलं गुपित या निमित्तानं समोर आलं. या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्जसाठाही जप्त करण्यात आला आहे. यानिमित्ताने जाणून घ्या या रेव्हपार्टीबद्दल काही गोष्टी…
हेही वाचा – Mumbai Rave Party : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला NCB कडून अटक
रेव्ह पार्टी म्हणजे काय?
दारू, ड्रग्ज, नशेचे इतर पदार्थ आणि नाच- गाण्याची सोय या पार्टीमध्ये केलेली असते. कुणालाही सुगावा लागणार नाही, अशाच पद्धतीनं अशा पार्टीचं आयोजन करण्यात येतं, सहसा गर्दीच्या ठिकाणाहून दूर अशा पार्टी होतात.
गेल्या काही वर्षांमध्ये रेव्ह पार्टीचं प्रमाण झपाट्यानं वाढताना दिसत आहे. ८०- ९० च्या दशकात या पार्टींना सुरुवात झाली होती. या पार्टीमध्ये कशाचीही तमा न बाळगता बेकायदेशीररित्या ड्रग्जचा वापर करण्यात येतो. श्रीमंत आणि सेलिब्रिटी कुटुंबांतील अनेक चेहरे या पार्टीमध्ये दिसतात. मद्य आणि ड्रग्जच्या नशेत असणाऱे अनेकजण या पार्टीत बेधुंद अवस्थेत असतात. ड्रग्ज विक्री करणाऱ्यांसाठी ही पार्टी पैसे कमवण्याची मोठी संधी असते.
कोणकोणत्या ड्रग्जचा वापर या पार्टीदरम्यान केला जातो?
रेव्ह पार्टीमध्ये प्रत्येकजण सहभागी होऊ शकत नाही. यासाठी मोठी रक्कमही मोजावी लागते. या पार्टीमध्ये मारिजुआना, गांजा, चरस, कोकेन, हशीश, एलएसडी, मेफेड्रोन यांसारखे ड्रग्ज वापरात आणले जातात. यापैकी काही ड्रग्जचा परिणाम ७ ते ८ तासांपर्यंत राहतो. पार्टीच्या आयोजकांकडूनच ड्रग्ज उपलब्ध करुन देण्यात येतात. फक्त मुलंच नव्हे, तर मुलींचाही या पार्टीमध्ये सहभाग असतो.