आपण अनेक प्रकारच्या औषधांची पाकिटं पाहतो, त्यामधील काही पाकिटांवर लाल रंगाची रेष असते. तर काही औषधांच्या पाकिटांवर अशी रेष नसते. या लाल रंगाच्या रेषेचा अर्थ काय असतो? ती एखाद्या औषधाच्या पाकिटावर असेल तर त्या औषधामध्ये काही वेगळेपण असते का? असे बरेच प्रश्न आपल्याला त्याबद्दल पडतात. पण त्याचा अर्थ काय हे बऱ्याच जणांना माहित नसते. या रेषेचा नेमका अर्थ काय असतो जाणून घ्या.
औषधांच्या पाकिटांवर असणाऱ्या लाल रेषेचा अर्थ:
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेणे टाळावे असा सल्ला नेहमी दिला जातो. कारण आपण एखादे अयोग्य औषध खाल्ले तर त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. पण तरीही बरेचजण आजारी पडल्यानंतर मागच्या वेळी कोणती औषधं खाऊन बरं वाटलं होतं त्यानुसार औषधं खातात आणि स्वतःचेच नुकसान करून घेतात. हे टाळण्यासाठीच औषधांच्या पाकिटावर याबाबत सुचना देण्यात येतात.
औषधांच्या पाकिटावर असणाऱ्या लाल रंगाच्या रेषेचा अर्थ हा असतो की ते औषध केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावे. म्हणजेच एखाद्या औषधाच्या पाकिटावर जर लाल रंगाची रेष असेल तर त्याचा अर्थ ते औषध स्वतः न घेता केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यावे.