आज २७ फेब्रुवारी. आजचा दिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जन्मदिनी हा दिवस साजरा केला जातो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचं योगदान दिलं आहे. आपण रोज असे अनेक शब्द वापरतो जे मूळ मराठी नाहीयेत पण आपल्याला वाटतं हे मराठीच आहेत. उदा. निवडणुका आल्या, की हमखास कानांवर पडणारा शब्द म्हणजे उमेदवार. आपल्या समस्या सोडवण्यासाठी किंबहुना जनसामान्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आपल्यातीलच कोणीतरी उमेदवार म्हणून पुढाकार घेतो. या उमेदावाराला जनतेच्या कामांसाठी विशिष्ठ पदांवर निवडून दिले जाते. मात्र आतपर्यंत राजकारणात चर्चीला जाणारा उमेदवार हा शब्द नेमका आला कुठून हे तुम्हाला माहिती आहे का? चला याची रंजक माहिती जाणून घेऊयात..

‘कहाणी शब्दांची: मराठी भाषेच्या जडणघडणीची’ या पुस्तकात लेखक सदानंद कदम यांनी हा अर्थ दिला आहे.

उमेदवार हा शब्द तयार झाला तो फारसी भाषेमधल्या उमेद या शब्दापासून. ‘उम्मीद’ या शब्दाचं ते मराठी रूप. आशा, आकांक्षा, धीर आणि हिम्मत हे जरी याचे अर्थ असले तरी आणखीही एक अर्थ आहे. तो म्हणजे वय. ‘आबाजी आपले उमेदीत आलियावरी तर्फ मजकुरी देशमुखी करावयास आले’ या वाक्यात या शब्दाचा अर्थ आहे ‘बय’. तर ‘अब्दालीची बोलावणी बहुत उमेद लाऊन गेली’ इथं तो अर्थ आहे ‘आशा’. तर ‘उमेदवार’ या शब्दाचा अर्थ आहे आशावान, इच्छुक, पदान्वेषी आणि ‘पसंत पडल्यास कायम करू’ या अटीवर ठेवलेला नोकर, म्हणूनच, अण्णा हजारे म्हणतात, ‘उमेदवार पसंत पडला नाही तर त्याला परत पाठवण्याचा हक हवाच.’

हेही वाचा >> दोस्त दोस्त ना रहा! ‘दोस्त’ शब्दाचा मूळ अर्थ काय? मराठी भाषेत हा शब्द आला कुठून? जाणून घ्या रंजक गोष्ट 

राजकारणातील पूर्वपारस्थिती पाहता सुशिक्षित उमेदवारांची कमतरता जाणवते. अनेकदा शिक्षणाची गरज ही अनुभवाच्या शीर्षकाखाली दुर्लक्षित केली जाते.शिक्षण हा एकमेव निकष न ठेवता उमेदवाराची संपूर्ण बौद्धिक क्षमता तपासणे गरजेचे आहे. अनेकदा अशिक्षित उमेदवारही त्याच्या नागरिक समस्यांचा प्रत्यक्ष ज्ञानामुळे सुशिक्षित उमेदवारापेक्षा अधिक चांगला विचार करू शकतो. अशावेळी केवळ पदवीअभावी कल्पना फेटाळून लावणे योग्य ठरणार नाही. उमेदवार निवडताना त्याला राजकारणाची समज व जनतेच्या समस्यांची महिती आहे का, हे जाणून घ्यायला हवं.

तुम्हालाही ही माहिती नव्यानं कळली असेल तर तुमच्या ओळखीच्या एखाद्या उमेदवाराला नक्की शेअर करा.