ओढ लावती अशी जिवाला गावाकडची माती, साद घालती पुन्हा नव्याने ही रक्ताची नाती..”गाव” प्रत्येक शहरवासी/चाकरमानी यांच्या मनातील एक हळवा कोपरा. कौलारू घर, सारवलेलं अंगण, अंगणातील रांगोळ्या, तुळशी वृंदावन, गावाशेजारी खळाळत वाहणारी नदी, चारही बाजुंनी डोंगर आणि मध्ये वसलेले छोटेसे गाव. आपल्यापैकी अनेकांचं बालपण खेडेगाव गेलंय..आपले आई-वडील तर खेड्यातच जन्मले लहाणाचे मोठे झाले. या खेडेगावानं आपल्या पिढीचंही बालपण अस्मरणीय केलं. मात्र तुम्हाला माहितीये का “खेडे” या शब्दाचा खरा अर्थ काय आहे? खेडेगाव हा शब्द नेमका कुठून आला. चला तर मग जाणून घेऊयात.
‘कहाणी शब्दांची: मराठी भाषेच्या जडणघडणीची’ या पुस्तकात लेखक सदानंद कदम यांनी हा अर्थ दिला आहे.
खेडे हा ग्रामसंस्कृतीमधून आलेला एक अस्सल मराठी शब्द. खेडणे म्हणजे जमीन करणे किंवा कसणे. अशी जमीन कसणाऱ्याला म्हटले जाते खेडू किंवा खेडूत. असे अनेक खेडू जिथं समूहाने एकत्र नांदतात त्याला म्हणतात खेडे. खेडूंची किंवा खेडुतांची वस्ती ते खेडे. जुन्या काळात अलुतेबलुतेदारांसह जो गावगाडा चालला तो अशाच खेड्यांमधून, या गावगाड्यातला गाव हा शब्द या खेड्यांना चिकटला आणि ते झाले खेडेगाव. खेडे आणि गाव हे शब्द आजही एकाच अथनि वापरले जातात. संस्कृत भाषेमधील खेटक म्हणजेही लहान गावच.
हेही वाचा >> सासूराला जाता जाता उंबरठ्यामध्ये…! मंडळी “उंबरठा” शब्दाचा खरा अर्थ माहितीये का? जाणून घ्या
काय सांगू राणी मला गाव सुटना…ही प्रसिद्ध कविता तुम्ही एकलीच असेल. सुख, आत्मसमाधान, मन:शांती हे सारं काही बाजूला ठेवून आपण कोठे जातोय, याची माणसालाच खबर राहिलेली नाही. याच पार्श्वभूमीवर शहर आणि गावाच्या संस्कृतीमधील मोठी दरी दाखवणारी ही कविता आहे. नोकरीनिमित्त शहरामध्ये स्थायिक झालेल्या गावाकडच्या तरुणांनी तर ही कविता अक्षरश: डोक्यावर घेतली आहे.