लग्न म्हणजे दोन व्यक्तींना, दोन कुटुंबाना जोडणारा प्रसंग. सगळ्यांसाठी हा आनंदाचा सोहळा असला तरी तिच्यासाठी आणि तिच्या बाबांसाठी तो दिवस मात्र घालमेलीचा असतो. समाजव्यवस्थेने दिलेलं ‘मुलीचा बाप’ हे नातं तो ओझ्यासारखं वाहताना दिसतो. भारतात मुलीचं लग्न हे सगळ्यात मोठं कर्तव्य समजतात. अर्थात ते खरंच आहे. या काळात अनेक बाप आपल्या वयात आलेल्या मुला-मुलींच्या लग्नाचा सोहळा मनोमन सजवतायेत. तर काही आजही आपल्या मुलीचं लग्न कसं करावं या विचारात आहेत. मुलीच्या लग्नात काही कमी पडायला नको हा अनेक वडिलांचा पहिला विचार असतो. यामध्ये सरते शेवटी “सासूराला जाता जाता उंबरठ्यामध्ये येईल का बाबासाठी पाणी डोळ्यामध्ये….” असं प्रत्येक बाप लेकिला विचारतो. एका घराचा उंबरठा ओलांडून ती दुसऱ्या घराच्या उंबरठ्यात प्रवेश करणार असते. मात्र मंडळी तुम्हाला उंबरठा हा शब्द कुठून आला हे माहिती आहे का?

उंबरठ्यावरचं माप ओलांडून प्रवेश करणारी नववधू आपण नेहमीच पाहतो. उंबरठा म्हटलं की आणखी एक आठवतं ते म्हणजे…स्मिता पाटील आणि गिरीश कर्नाड यांची मुख्य भूमिका असलेला ‘उंबरठा’ हा सिनेमा १९८२ प्रदर्शित झाला होता. आजकाल चौकटीला कडाप्पाची पट्टी असली, तरी हा रिवाज काही चुकत नाही. आता ती कडाप्पाची पट्टी हाच आपला उंबरा. पूर्वीच्या काळी मात्र लाकडी चौकटीला खाली जी पट्टी असे ती होती उंबराच्या लाकडाची. यज्ञकाळापासूनच उंबराचं लाकूड पवित्र मानलं गेलेलं. हे औदुंबराचं लाकूड टणक आणि टिकाऊही; पवित्र आणि अरिष्ट निवारकही समजलं जातं. म्हणून मग त्याची पट्टी चौकटीच्या तळाला वापरली जाई. उंबराच्या लाकडाची ती पट्टी म्हणून तिला म्हणत उंबरा… उंबरठा. प्रत्येक घराला अशी चौकट आणि उंबरा असेच. म्हणून मग गावाची ओळखही तशाच शब्दांत सांगितली जाऊ लागली… शंभर उंबऱ्यांचं गाव.

हेही वाचा >> उमेदवारी पक्की! पण ‘उमेदवार’ शब्दाचा मूळ अर्थ काय? मराठी भाषेत हा शब्द आला कुठून? जाणून घ्या रंजक गोष्ट 

घराला घरपण मुली देतात, आई बाप मेल्यावर हंबरडा फोडून कान उघडणाऱ्या मुली असतात. त्यामुळे प्रत्येक मुलीचा पहिला हिरो हा तिचा बाप असतो आणि प्रत्येक बापाची आई ही आपल्या मुलीत असते. जी त्या बापाची काळजी घेते, रडते, ओरडते आणि शेवटी बापाच्या कुशीतच आपलं विश्व शोधते. त्यामुळे मुलगा झाला की वंश वाढण्याचा अभिमान बाळगणाऱ्या बापलोकांच्या विश्वात हळव्या बाप माणसाच्या नावाचं एक पान असतंच..