भारतात लग्नाच्या हंगामाला जोरदार सुरुवात झाली आहे. मोठ्या प्रमाणात लग्नाचे बार उडत आहेत. यातच विवाह समारंभामध्ये वधू-वराला जेवढा मान असतो, तेवढीच मानाची असते ती करवली. नवरदेवाची आणि नवरीच्या बहिणीला करवलीचा खास मान असतो. मात्र, तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की, नवरदेवाच्या किंवा नवरीच्या बहिणीला ‘करवली’ का म्हणतात? चला तर आज हे आपण जाणून घेऊ. ‘कहाणी शब्दांची: मराठी भाषेच्या जडणघडणीची’ या पुस्तकात लेखक सदानंद कदम यांनी हा अर्थ दिला आहे.
‘करवली’ का म्हणतात?
घरात लग्नकार्य निघालं की सतत कानांवर पडणारा शब्द म्हणजे करवली. मुलाची किंवा मुलीची बहीण म्हणजे करवली, एवढं तर आपल्याला माहीतच असतं. पण, तिला करवलीच का म्हणतात हे कळत नसतं. तर, ती मुलगी हातात कळशी घेऊन उभी असते. छोट्या कळशीला म्हणतात ‘करा.’ मातीची लहान घागर म्हणजेही करा, असा लीळाचरित्रातही उल्लेख आहे. असा करा हातात घेऊन उभं राहणारी ती करवली. काळ बदलला तसं ती कळशीही गेली. तिची जागा आता सजवलेल्या छोट्या तांब्यानं घेतली, पण तो असतो पाण्यानं भरलेला. सजवलेल्या कळसाचा तांब्या असला, तरी तो हातात घेणारी करवलीच राहिली. तिचा रुसवाफुगवा आणि मानमरातबही तसाच टिकून राहिला.
करवलीचा मान महत्त्वाचा
करवली म्हणजे “पाठराखीण, राखण करणारी असा ढोबळ अर्थ लावायला हरकत नसावी. मुलीच्या बघण्याच्या कार्यक्रमापासून ते तांदूळ पडेपर्यंत तिचं सगळं बघणारी, करणारी तिची मैत्रीण, सखी किंवा नात्यातली बहिणीसामान असणारी स्त्री किंवा मुलगी हिला करवली म्हणतात. विवाह समारंभात अवखळपणा, खट्याळपणा दिसून येतो, थट्टा-मस्करीचा सूर लागला की, नवऱ्याकडील मंडळींना नवरीकडच्या करवलींना चिडवण्याची लहर येते. विवाह सोहळ्यात वर-वधू पक्षाकडील गर्दी बघून कधी कधी प्रश्न पडतो, वर पक्षाकडील कोण आणि वधू पक्षाकडील कोण? कधी कुणी वधू पक्षाला नावं ठेवली, तर ती वर पक्षाकडील मंडळींपेक्षा वधू पक्षाकडील मंडळींच्या कानावर पडतात, तर कधी कुणी वर पक्षाला बोलले, तर त्यांचीही माणसं आजूबाजूला वावरत असतात. यामध्ये नटून-सजून वावरणाऱ्या करवल्यांचाही समावेश असतोच असतो. त्यात खास करवली असते ती वधू-वरासोबत वावरणारी, हळदी समारंभापासून अगदी विवाहाचे विधी पार पाडताना या करवलीचा मान महत्त्वाचा असतो.
हेही वाचा >> ‘शाब्बास’ या शब्दाचा मूळ अर्थ काय? मराठी भाषेत कुठून आला हा शब्द? जाणून घ्या रंजक गोष्ट
लग्नाची विविध गीतं आपल्या कानावर पडतात. खास करून नवरीसाठी रचलेल्या विवाह समारंभाच्या गीतांमध्ये आपल्या कानावर नकळतच करवलीवरील खट्याळ गीतही ऐकायला येतंच. कारण करवलीचा मान या सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो. किंबहुना करवलीचा मान चुकला तर यावेळी राग, रुसवे-फुगवे आदी प्रकारही विवाह सोहळ्यामध्ये घडण्याची शक्यता असते. एकंदरीतच करवली म्हटली की, वधूची सोबतीण, मैत्रीण आणि एक सावलीच मानावी लागेल. कारण विवाह सोहळ्यात ती सावलीप्रमाणेच वधूसोबत वावरत असते.