Panchkroshi Word History : पंचक्रोशीत आमच्या नावाचा दबदबा आहे, साऱ्या पंचक्रोशीत माझं कौतुक झालं, पंचक्रोशीत तुझी बातमी पसरली, अशी अनेक वाक्यं तुम्ही आतापर्यंत अनेकदा अनेकांच्या तोंडून ऐकली असतीलच. विशेषत: खेडेगावात पंचक्रोशी शब्दाचा सर्रास वापर केला जातो. साधारणत: आपल्या गावाच्या आसपास असणाऱ्या परिसराला पंचक्रोशी, असं म्हटलं जातं. उदा. आमच्या गावातील याच्यासारखा कष्टाळू शेतकरी अख्ख्या पंचक्रोशीत शोधून सापडणार नाही. अशी पंचक्रोशी शब्दाचा वापर केलेली वाक्यं लक्षात घेतली, तर आपल्यापैकी अनेकांना असं वाटत असेल की, पंचक्रोशी म्हणजे पाच गावांचा एक समूह. तुम्हीच काय बहुतेकांचा असाच समज आहे. पण, तुम्हाला माहीत आहे का पंचक्रोशी हा शब्द मराठी भाषेत आला कुठून? हा शब्द कशा प्रकारे तयार झाला आणि याचा नेमका अर्थ काय? चला तर मग पंचक्रोशी या शब्दाबाबत जाणून घेऊ.
‘फालतू’ शब्दाचा मूळ अर्थ काय? मराठी भाषेत हा शब्द आला कुठून? जाणून घ्या रंजक गोष्ट
पंचक्रोशी हा शब्द मराठी भाषेत आला कुठून?
मराठी भाषेतील अनेक शब्द हे संस्कृत भाषेतून मराठीत आले आहेत. त्यातलाच एक शब्द म्हणजे पंचक्रोशी. दरम्यान, `कहाणी शब्दांची : मराठी भाषेच्या जडणघडणीची’ या पुस्तकात लेखक सदानंद कदम यांनी पंचक्रोशी या शब्दाचा अर्थ दिला आहे.
पंचक्रोशी शब्दाचा मूळ अर्थ काय?
‘हिंदकेसरी मारुती मानेंसारखा मल्ल इथल्या पंचक्रोशीत नव्हता… असं येथील लोक आजही सांगतात, अशा स्वरूपाची वाक्यं अधूनमधून आपल्या कानी पडतात. पूर्वीच्या काळी प्रवासासाठी वाहनांची सुविधा नव्हती, तेव्हा लोक चालतच सगळीकडे प्रवास करायचे. त्यावेळी ‘दोन कोसांवर तर जायचंय!’ असं म्हणत. जाण्यायेण्याचं हे ठिकाण हाकेच्या अंतरावर आहे असंही म्हणायचे. पण हा कोस शब्द आला कुठून? तर, तो आला संस्कृत भाषेमधून. ओरडणे या अर्थाचा संस्कृतमधला शब्द आहे क्रोश, याचंच रूपांतर कोस या शब्दात झालं. म्हणजे मोठ्यानं ओरडलं तर ऐकू जाईल एवढं अंतर म्हणजे कोस. अशा पाच कोसांचा परिसर म्हणजे पंचक्रोश. त्या परिसराचे क्षेत्र म्हणजे पंचक्रोशी. अशा प्रकारे पंचक्रोशी हा शब्द तयार झाला; जो आजही अनेक गाव-खेड्यांमध्ये सर्रास वापरला जातो.