‘आम्ही राजीनामे खिशात बाळगले आहेत.’ हे वाक्य आपण युती सरकारच्या काळात अनेकदा मंत्र्यांच्या तोंडून ऐकलं आहे. अमक्याने तमक्या गोष्टींच्या आरोपांची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशाही मागण्या विरोधकांकडून होत असतात. बड्या नेत्याने राजीनामा दिला आणि सरकार गडगडलं. राजीनामासत्र, सामूहिक राजीनामा असे शब्द आपण मराठी भाषेत अनेकदा ऐकतो. मात्र राजीनामा या शब्दाचा अर्थ काय आणि हा शब्द मराठी भाषेत कसा आला तुम्हाला माहीत आहे का?
राजीनामा शब्दाचा मूळ अर्थ काय?
मराठी भाषेत अनेक शब्द हे फारसी भाषेतून आले आहेत. त्यातलाच एक शब्द म्हणजे राजीनामा. अरबी आणि फारसी या भाषेतून हा शब्द मराठी भाषेत आला. राजी या शब्दाचे मूळ अर्थ खुश असणे, प्रसन्न, आनंदी असणे, मान्य असणे असे आहेत. फारसी भाषेत राजीनामा लिहून देणं म्हणजे तहनामा किंवा तडजोडपत्र लिहून देणं. अमुक नियम आणि अटी मला मान्य असून मी आपले हे पद किंवा नोकरी, करार स्वीकारण्यास तयार आहे या अर्थाने हा शब्द आहे.
राजीनामा या शब्दाचा मूळ अर्थ आणि प्रचलित अर्थ एकमेकांच्या उलट
राजीनामा शब्दाचा अर्थ आपण सध्याच्या घडीला बरोबर उलट वापरत आहोत. आजच्या घडीला नोकरी सोडणं, पद सोडणं, पदावरुन मुक्त होण्यासाठी लिहून दिलेलं पत्र यासाठी आपण राजीनामा हा शब्द वापरतो. काळानुरुप हा अर्थ बदलला आहे. मूळ अर्थाच्या बरोबर उलटा अर्थ सध्या प्रचलित आहे. मराठीत आत्ता जो अर्थ राजीनामा या शब्दासाठी अभिप्रेत आहे त्याला खूप सुंदर शब्द आहे जो शब्द आहे त्यागपत्र. त्यागपत्र देणं म्हणजे अमुक नोकरी, व्यवसाय सोडणं या अर्थाने वापरला जातो.
सध्याच्या घडीला मराठी भाषेत फारसी आणि अरबी मधून आलेला हा शब्द आपण त्याच्या अर्थाच्या अगदी उलट अर्थाने वापरतो. ‘कहाणी शब्दांची’ मराठी भाषेच्या जडणघडणीची या सदानंद कदम लिखित पुस्तकात हा उल्लेख करण्यात आला आहे. राजीनामा हा शब्द सध्या ज्या अर्थाने वापरला जातो म्हणजे नोकरी सोडणे, पद सोडणे या अर्थाने तोच अर्थ प्रचलित आहे, तसंच तो योग्यही आहे. मात्र या शब्दाचा मूळ अर्थ स्वीकारणे, मान्य करणे, खुशीने मान्य करणे असा होतो.