मराठा क्रांती मोर्चा किंवा मराठा क्रांती मूक मोर्चा. मराठा समाजाचे मोर्चे, ओबीसी जनमोर्चा, सकल मराठा समाज क्रांती मोर्चा किंवा दिल्लीकडे कूच करणारा शेतकरी मोर्चा असेल. असे अनेक मोर्चे निघाले असतील, वेगवेगळ्या मागण्यांसाठी, निषेध व्यक्त करण्यासाठी मोर्चे काढले जातात. एखाद्या गोष्टीचा विरोध म्हणून रस्त्यावर एकत्रित आलेला जनसमूह, न्याय मिळवण्यासाठी काढलेला मोर्चा, अथवा मुक्ती च्या उद्देशाने काढलेला मोर्चा उदाहरणार्थ लाँग मार्च. मोर्चाचा उद्देश वेगवेगळा असु शकतो, तुम्हीही आतापर्यंत कोणत्या ना कोणत्या मोर्चामध्ये सामिल झाला असाल, मात्र “मोर्चा” हा शब्द नेमका आला कुठून? त्याचा नेमका अर्थ काय? हे तुम्हाला माहितीये का? चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
‘कहाणी शब्दांची: मराठी भाषेच्या जडणघडणीची’ या पुस्तकात लेखक सदानंद कदम यांनी हा अर्थ दिला आहे.
‘मोर्चा’ शब्दाचा मूळ अर्थ काय? ‘मोर्चा’ हा शब्द नेमका आला कुठून?
“अलीकडच्या काळात निघालेल्या मूक मोर्चानी नवा इतिहास घडवला, पण मोर्चा आणि तोही मूक हे जरा विचित्रच. या शब्दाच्या मूळ अर्थाशी विसंगतच. मध्ययुगीन कालखंडानं मराठीला दिलेला हा शब्द. युद्धात तोफांचा वापर नुकताच सुरू झाल्याचा तो कालखंड. तोफांचा मारा करावयाचा तर त्या उंचावर ठेवणे आवश्यक. मग त्यासाठी उंचवटा तयार करावा लागे. त्याला दमदमा, लकडकोट, टप्पागुजरा किंवा मोर्चा म्हणत. ‘मूर्चाल’ हे त्या शब्दाचं मूळ फारसी रूप. तोफा लावणे, संरक्षक तट उभारणे याला म्हणतात मोर्चेबांधणी किंवा मोर्चेबंदी.तोफांचा मारा जसा होत असे तसे एखाद्यावर जाऊन धडकणे याला आपण म्हणू लागलो मोर्चा. तोफांच्या आवाजाची कमतरता आपण घोषणांनी भरुन कढली आणि पुढच्या काळात मोर्चा हे अन्यायाविरुद्ध दाद मागण्याचं एक हत्यार झालं.”
हेही वाचा >> “अण्णा” आणि “आप्पा” यांच्यामध्ये फरक काय? कोण थोरलं, कोण धाकटं? जाणून घ्या
मोर्चा आणि निषेध हे दोन्ही सार्वजनिक निदर्शनाचे प्रकार आहेत, परंतु त्यांची वैशिष्ट्ये भिन्न आहेत. मोर्चा म्हणजे लोकांची मिरवणूक एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी, अनेकदा संघटित आणि व्यवस्थितपणे हे विविध कारणांसाठी केले जाऊ शकते. जसे की उत्सव, स्मरणार्थ किंवा एखाद्या कारणाकडे किंवा समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी. दुसरीकडे, निषेध ही एखाद्या विशिष्ट कल्पना, धोरण किंवा कृतीबद्दल आक्षेप, नापसंती किंवा असहमत यांची सार्वजनिक अभिव्यक्ती आहे. रॅली, बसणे आणि निदर्शने यासह त्याचे अनेक प्रकार असू शकतात आणि त्यात मोर्चाचा समावेश असू शकतो किंवा नसू शकतो. मोर्चा हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा एक विशिष्ट प्रकार आहे, तर निषेध हा एक व्यापक शब्द आहे ज्यामध्ये विविध प्रकारचे सार्वजनिक आक्षेप किंवा मतभेद समाविष्ट आहेत.