रमणबाग हे नाव पुणेकरांसाठी काही नवीन नाही. पण, रमणबाग या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही म्हणाल, पेशवाईंच्या काळात त्यांचं मन रमवण्याची जागा म्हणजे रमणबाग. शब्दश: असा अर्थ होत असला तरी इतिहासाचे काही दाखले असे सांगतात की, रमणबागेचा वापर पेशवाईच्या काळामध्ये वेगळ्याच कारणासाठी केला जात होता. कोणते होते हे कारण? पेशवाईच्या काळात रमणबागेचा वापर नेमका कशासाठी केला जात होता हे जाणून घेऊ या.
रमणबाग आणि पेशवाईचा काय आहे संबंध?
पेशवाईच्या काळात ब्राम्हण समाजाचा प्रमुख व्यवसाय होता भिक्षुकी, म्हणजेच पूजा-पाठ करणे. त्या काळामध्ये ब्राम्हणांना दानधर्म करण्याची परंपरादेखील होती. सामान्य लोक आपल्या क्षमतेनुसार दानधर्म करत असत, तर राजे लोक आपल्या प्रतिष्ठेनुसार दानधर्म करत असत. त्या काळात बहुतेक राजे आपल्या राज्यकारभारामध्ये ब्राम्हणांना राजपुरोहित, कुलाचार्य म्हणून घेत असत. अर्थात, अशा ब्राम्हणांचे उत्पन्न तितकेच जास्त होते. अशा परिस्थितीमध्ये इतर ब्राम्हणांवर अन्याय होऊ नये, यासाठी त्या काळातील राजे त्यांच्यासाठी श्रावण महिन्यात दानधर्म आयोजित करत असत. ही दक्षिणा वाटपाची प्रथा सरकार दाभाड्यांनी सुरू केली, अशी इतिहासामध्ये नोंद आहे. पुढील काळात पेशव्यांनी शनिवारवाड्यावर ही प्रथा सुरू ठेवली. पण, ब्राम्हणांची एवढी गर्दी वाढू लागली की, शनिवार वाड्यातील जागा अपुरी पडू लागली. तसेच बाहेरच्या लोकांचे शनिवारवाड्यात येणे-जाणे सुरू झाले, त्यामुळे पेशव्यांनी ही दक्षिणा वाटपाची जागा बदलण्याचा निर्णय घेतला. त्या काळात शनिवार पेठेत पेशव्यांची एक बाग होती ती म्हणजे रमणबाग. या रमणबागेत श्रावण महिन्यात दक्षिणा वाटप करण्याची प्रथा सुरू झाली.
रमणबागेतील नानासाहेबांचा किस्सा
हरवलेले पुणे पुस्तकात रमणबागेतील किस्सा सांगितला आहे. एके वर्षी रमणबागेत दक्षिणा वाटपासाठी ४० हजार ब्राम्हण जमले होते. नानासाहेबांनी दक्षिणा वाटपाला सुरुवात करताच मुसळधार पाऊस सुरू झाला, ज्यामुळे सर्व ब्राम्हण मंडळी पावसात भिजले आणि पेशव्यांच्या नावाने ओरडू लागले, कारण त्यावेळीची रमणबागेची रचना तशी होती. तिथे कोणताही अडोसा नव्हता. रमणबाग मोकळी आणि मोठी होती, त्यामुळे सर्व ब्राम्हण भिजणे सहाजिक होते. नानासाहेबांना ही गोष्ट समजताच ते तडक उठून बाहेर आले आणि पावसात भिजत दानधर्म करू लागले. नानासाहेबांच्या या कृतीचे सर्वांनाच आश्चर्य वाटले. कदाचित आपण दानधर्मासाठी बोलावलेले ब्राम्हण पावसात भिजत असताना आपण अडोश्यामध्ये थांबणे चुकीचे वाटले असावे. नानासाहेबांनी आपल्या छोट्याश्या कृतीतून प्रशासकाचे मन किती मोठं असावं हे दाखवून दिलं.
कशी होती रमणबागेची रचना?
शनिवार पेठेत ओंकारेश्वर मंदिराच्या बाजूला बंदिस्त आवार होते, ज्याला रमणा म्हणत. त्याला पूर्वेला तीन आणि पश्चिमेला दोन असे पाच दरवाजे होते. त्यावेळी ओंकारेश्वर ते रमणबाग हा सर्वच परिसर मोकळा होता आणि मुख्यत: अंबिल ओढ्यापलीकडे होता, त्यामुळे वाढत्या गर्दीचा येथे उपद्रव होत नव्हता.
त्यानंतर जसजसे पेशव्यांचे प्रस्थ वाढत राहिले तसे दक्षिणा वाटपाचे काम जोरात होऊ लागले. त्यामुळे शनिवारवाड्यातील जागेप्रमाणे रमणबागेतील जागाही अपुरी पडू लागली. त्यामुळे पर्वतीच्या पायथ्याशी दक्षिणा वाटपासाठी नवीन जागा बांधण्यात आली. पूर्वी रमणबागेत जात आहे हे सांगताना बोली भाषेत लोक रमण्यात जातो आहे, म्हणत असत. त्यामुळे नव्या जागेला पर्वतीचा रमणा असे नाव पडले.
पर्वतीच्या रमण्याची रचना
पर्वतीच्या पायथ्याशी प्रशस्त जागेत बांधण्यात आलेल्या या रमण्याला पूर्वेकडे दोन दरवाजे आणि उत्तर आणि दक्षिणेला एक दरवाजा होता त्याच्या पूर्वेला अंबिल ओढा वाहत होता.
विशेष म्हणजे दोन्ही रमण्याच्या पूर्वेला अंबिल ओढा आणि देवाचे स्थान होते. रमणबागेच्या बाजूला ओंकारेश्वर मंदिर होते, तर पर्वतीच्या येथील रमण्याजवळ साक्षात गणपतीचं स्थान होते. पर्वतीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या शेवटी तटबंदी सदृश्य अवशेष आढळतात. स्थानिक लोक याला पर्वती गावाच्या वेशीचे तट म्हणत असले तरी हे रमण्याच्या तटाचे भाग आहे, असे इतिहास सांगतो. अर्थात, याला निश्चित पुरावा देता येत नाही.
आज पर्वतीच्या रमण्याची आठवण म्हणजे रमणा गणपती मंदिर करून देते. या गणपतीला रमणा गणपती का म्हणतात हे तुमच्या लक्षात आले असेल. रमणबाग प्रशालेमुळे जुन्या रमणबागेची आठवण टिकून आहे, तर रमणा गणपतीमुळे पर्वतीच्या रमण्याची आठवण टिकून आहे. रमणबागेचा वापर पेशवाई काळात दक्षिणा वाटपासाठी केला असेल याची कल्पनाही कोणी केली नसेल. शनिवार पेठेत राहणार्या किंवा पर्वतीच्या भागात राहणार्या लोकांना कदाचित कल्पनाही नसेल की, ते पेशव्यांच्या काळातील दक्षिणा वाटपाच्या जागेत राहात आहेत.