World Turtle Day२०२३ : सर्वसाधारणपणे हिंदू मंदिरांमध्ये प्रवेशद्वाराजवळ कासवाचे चिन्ह किंवा संगमरवरी कासव असते. काही मंदिरांमध्ये जिवंत कासव पाळलेले दिसते. याच्यामागे आध्यात्मिक तत्त्वज्ञान आहे.


हेही वाचा : विश्लेषण : भारतातील चलनबंदीची गाथा…

मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ कासव का असते ?

हिंदू तत्त्वज्ञानानुसार श्रीविष्णूंनी घेतलेल्या दहा अवतारांमध्ये द्वितीय अवतार हा कूर्मावतार होता. यामध्ये बुडणाऱ्या पृथ्वीला कासवरूपी विष्णूंनी आपल्या पाठीवर तोलून धरले होते, असे सांगितले जाते. कासव हे शांततेचे तसेच दीर्घायुष्याचे प्रतीक आहे. कासव ज्याप्रमाणे आपले सर्व अवयव आत घेऊन बाह्य गोष्टींपासून स्वत:चे रक्षण करते, त्याप्रमाणे मानवाने काम, क्रोध, मोह, मत्सर, लोभ या दुर्गुणांचा त्याग करून, त्यांच्यापासून आपले रक्षण करून मगच देवतेचे दर्शन घ्यावे, असे सांगितले जाते.
श्रीमद् भगवद्गीतेमध्ये दुसऱ्या अध्यायात श्रीकृष्ण सांगतात,
यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः ।
इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ २-५८॥
कासव ज्याप्रमाणे आपली इंद्रिये आतमध्ये ओढून बाह्यजगतापासून अलिप्त होते, त्याप्रमाणे ज्ञान प्राप्त करण्यासाठी मनुष्याने इंद्रियांवर नियंत्रण मिळवणे आवश्यक असते.

कासव हे शांत राहते. मंद गतीने श्वसन करते म्हणून दीर्घकाळ जगते. कासवाची नजर ही तीक्ष्ण असते. ते जमीन, पाणी दोन्ही ठिकाणी राहू शकते. कमी खाऊन जास्त काळ जगण्याची ताकद कासवामध्ये असते. कासवाची ही वैशिष्ट्ये मानवी जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहेत. योगशास्त्रात कूर्मासन हे मनःशांतीसाठी सांगितलेले आहे.

हेही वाचा : विश्लेषण : रविवारनंतर सोमवारच का येतो ? आठवड्याची रचना कोणी केली ?

वास्तुशास्त्रातील कासवाचे महत्त्व

वास्तुशास्त्रामध्ये घरामध्ये जिवंत कासव ठेवावे, असे सांगितले आहे. एका आख्यायिकेनुसार कासव हे समृद्धीचे प्रतीक समजले जाते. त्यामुळे कासव घरी ठेवल्यावर घरात शांतता आणि समृद्धी येते असे मानले जाते. परंतु, घरात कासव ठेवताना त्याला कोणतीही दुखापत होणार नाही ना, याची काळजी घ्यावी. तसेच कोपिष्ट व्यक्तींना कासवाचे चिन्ह असणारी अंगठी घालण्यास सांगितले जाते. त्याचे कारण म्हणजे, त्यांनी कासवाप्रमाणे शांत व्हावे, हेच असते.

हिंदू धर्मात कासवाला महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे मंदिरात प्रवेश करताना प्रथम कासवाचे दर्शन घेऊन त्याला नमस्कार करून मग देवतेचे दर्शन घेतले जाते.