Baba Siddique Y Category Security: te: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर शनिवारी रात्री (दि. १२ ऑक्टोबर) गोळीबार झाला. छातीत आणि पोटात गोळ्या लागल्यामुळे बाबा सिद्दीकी यांचे निधन झाले. त्यानंतर आता एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. बाबा सिद्दीकी यांना १५ दिवसांपूर्वीच जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकी मिळाल्यानंतर बाबा सिद्दीकी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. आज सकाळपर्यंत त्यांना वाय दर्जाची सुरक्षा प्रदान केल्याचे सांगितले जात होते. मात्र मुंबईच्या गुन्हे शाखेचे उपायुक्त दत्ता नलावडे यांनी धक्कादायक खुलासा करताना त्यांना वाय दर्जाची सुरक्षा नसल्याचे सांगितले आहे. या प्रकारच्या सुरक्षा प्रकारात किती पोलीस बरोबर असतात? त्यांच्याकडे शस्त्र असतात का? जर विशेष दर्जाची सुरक्षा असती तर सिद्दीकींवर सहज गोळ्या झाडणे शक्य झाले असते का? असे प्रश्न निर्माण होत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विशेष सुरक्षा कुणाला मिळते?

विशेष सुरक्षा देण्यासाठी काही नियम आहेत. एक्स, वाय, वाय प्लस, झेड आणि झेड प्लस अशा दर्जांची सुरक्षा आवश्यकतेनुसार पुरविली जात असते. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना ‘झेड प्लस’(Z+), एएसएल (ASL), झेड (Z), वाय प्लस (Y+), वाय (Y) आणि एक्स (X) अशा दर्जाची सुरक्षा दिली जाते. यामध्ये राजकीय नेते, सेलिब्रेटी, उद्योगपती यांच्यासह देशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्ती आणि ज्यांच्या जीवाला धोका असतो अशा व्यक्तींना ही व्हीव्हीआयपी सुरक्षा पुरवली जाते.

हे वाचा >> बाबा सिद्दीकींची हत्या कशी झाली? पोलिसांनी सांगितला सगळा घटनाक्रम

वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था कशी असते?

वाय दर्जाच्या सुरक्षा प्रकारात ८ ते ११ सुरक्षा रक्षक एखाद्या व्यक्तीच्या बरोबर दिले जातात. यामध्ये पाच जवान (एक कमांडो आणि चार शिपाई) हे संबंधित व्यक्तीच्या निवासस्थानी पहारा देतात. तर तीन शस्त्रधारी पीएसओ हे तीन शिफ्टमध्ये संबंधित व्यक्तीच्या बरोबर असतात. भारतातील अनेक महत्त्वाच्या व्यक्तींना या प्रकारची सुरक्षा व्यवस्था पुरविली गेली आहे. राजकीय नेते, न्यायाधीश, सेलिब्रिटी, व्यावसायिक, पत्रकार आणि ज्यांच्या जीवाला धोका आहे, अशा लोकांना वाय दर्जाची सुरक्षा पुरविली जाते.

हे ही वाचा >> झेड प्लस, झेड, वाय प्लस, वाय आणि एक्स दर्जाच्या सुरक्षेत काय फरक असतो? जाणून घ्या!

बाबा सिद्दीकी यांना सुरक्षा का पुरविली होती?

१५ दिवसांपूर्वी बाबा सिद्दीकी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानुसार त्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर त्यांना सुरक्षा दिली गेली असे सांगितले गेले. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा तपास करणारे मुंबई गुन्हे शाखेचे उपायुक्त दत्ता नलावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन हत्येच्या वेळी सिद्दीकी यांच्याबरोबर किती पोलीस होते, याची माहिती दिली आहे.

आणखी वाचा >> समजून घ्या : X, Y, Z दर्जाची सुरक्षा कोणाला, कशासाठी आणि कशी दिली जाते?; यासाठीचा खर्च कोण करतं?

दत्ता नलावडे यांनी सांगितले की, बाबा सिद्दीकी यांना कोणतीही विशेष दर्जाची सुरक्षा पुरविली गेली नव्हती. तसेच त्यांच्याबरोबर तीन पोलीस सुरक्षेसाठी तैनात असतात. मात्र हत्येच्या वेळी यापैकी किती पोलीस त्यांच्यासह उपस्थित होते, याची नेमकी माहिती त्यांनी दिली नाही.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is y category security cover how baba siddique shot dead despite having this type of security kvg