RBI currency exchange rule अनेकदा एटीएममधून पैसे काढताना फाटक्या किंवा खराब नोटा येतात. या फाटलेल्या नोटांचे नक्की काय करायचे, याचा वापर कसा करायचा, असे प्रश्नही लोकांना पडतात. कारण या खराब झालेल्या नोटांचा उपयोग होत नाही आणि दुकानदारही त्या घेण्यास नकार देऊ शकतात. ही बाब तुमच्यासाठी चिंतेची असली तरी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) नियमात असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की, या नोटा तुम्ही सहजपणे नवीन नोटांसह बदलू शकता. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार फाटलेल्या किंवा खराब झालेल्या चलनी नोटा बँकेद्वारे बदलल्या जाऊ शकतात आणि या नोटा बदलण्यास कोणीही नकार देऊ शकत नाही. या नोटांबद्दल आरबीआय नक्की काय सांगते? या नोटा बदलायच्या कश्या? त्याविषयी जाणून घेऊ.

खराब झालेल्या नोटांबद्दल आरबीआय काय सांगते?

खराब नोटा म्हणजे किंचित कापलेल्या किंवा कुजलेल्या नोटा, ज्या नोटांच्या दोन टोकांवर अंक आहेत, म्हणजेच १० रुपयांच्या आणि त्याहून अधिक किमतीच्या नोटा खराब समजल्या जातात. परंतु, अशा नोटांमधील कट नंबर पॅनलमधून गेलेला नसावा. त्यांचा नंबर पॅनल ठीक असेल तर १० रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या नोटा बदलून घेता येतात, असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमात सांगण्यात आले आहे.

नोटा बदलून घ्यायच्या कशा?

या सर्व नोटा कोणत्याही सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या शाखेच्या काउंटरवर, खाजगी क्षेत्रातील बँकेच्या कोणत्याही करन्सी चेस्ट शाखेत किंवा आरबीआयच्या कोणत्याही इश्यू ऑफिसमध्ये बदलल्या जाऊ शकतात. यासाठी कोणताही फॉर्म भरण्याची गरज नाही, असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे. एखादी व्यक्ती एकावेळी जास्तीत जास्त २० नोटा बदलू शकते. या नोटांचे एकूण कमाल मूल्य पाच हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे. बँकांनी त्या काउंटरवर विनामूल्य बदलल्या पाहिजेत, असेही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमात नमूद आहे. कोणत्याही बँकेने तुमच्या फाटलेल्या किंवा कुजलेल्या नोटा बदलून देण्यास नकार दिल्यास तुम्ही आरबीआयकडे तक्रार करू शकता. २० पेक्षा जास्त नोटा असल्यास त्या बँकेत पावतीच्या बदल्यात स्वीकारल्या जाऊ शकतात. परंतु, याचे देय नंतर दिले जाते आणि मुख्य म्हणजे यासाठी बँक आरबीआयने ठरवलेले शुल्क आकारू शकते.

अत्यंत ठिसूळ, जळालेल्या नोटांबद्दल आरबीआय काय म्हणते?

ज्या नोटा अत्यंत ठिसूळ झाल्या आहेत किंवा वाईटरित्या जळलेल्या किंवा तुकडे झालेल्या आहेत आणि त्या नोटा हाताळणे अवघड आहे, अशा नोटा बदलण्यासाठी बँक शाखेत स्वीकारल्या जाणार नाहीत, असे आरबीआयने म्हटले आहे. त्याऐवजी धारकांना या नोट्स संबंधित इश्यू ऑफिसमध्ये टेंडर करण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो. त्या ठिकाणी या नोटांचा विशेष प्रक्रियेनुसार निर्णय घेतला जातो.

नोटा बदलण्यासाठी इतर सुविधा

सार्वजनिक सोयीसाठ ट्रिपल लॉक रिसेप्टॅकल (TLR) कव्हरद्वारे फाटलेल्या नोटांसाठी एक्स्चेंज सुविधादेखील दिली जाते, असे ‘आरबीआय’ने सांगितले. सार्वजनिक सदस्य चौकशी काउंटरवरून टीएलआर कव्हर मिळवू शकतात आणि त्यांच्या नोट्स कव्हरमध्ये तपशिलांसह ठेवू शकतात, जसे की, नाव, पत्ता, जमा केलेल्या नोटांचे मूल्य इत्यादी. हा बॉक्स आरबीआयच्या प्रत्येक इश्यू ऑफिसमध्ये चौकशी काउंटरवर ठेवला जातो. फाटलेल्या नोटांचे स्वीकार्य विनिमय मूल्य बँक ड्राफ्ट किंवा पे ऑर्डरद्वारे पाठवले जाते. फाटलेल्या नोटा नोंदणीकृत पोस्टाने कोणत्याही आरबीआय कार्यालयात पाठवल्या जाऊ शकतात.

Story img Loader