नव्या संसद भवनाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यासाठी राजधानी दिल्ली सजली आहे. नवं संसद भवन हे गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. कारण या कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना बोलवण्यात आलं नाही हा मुद्दा पुढे करुन १९ विरोधी पक्षांनी नव्या संसदेच्या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार घातला आहे. नवी संसद अत्यंत अत्याधुनिक आणि नव्या यंत्रणांनी सजलेली आहे. मात्र आता प्रश्न उरतो तो जुन्या संसद भवनाचं काय होणार? जाणून घेऊया या प्रश्नाचं उत्तर .

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संसदेची वास्तू अनेक ऐतिहासिक घटनांची साक्षीदार

जुनं संसद भवन ही वास्तू देशाच्या अनेक मोठमोठ्या घटनांची साक्षीदार आहे. देशाचं स्वातंत्र्य अनेक वाद-प्रतिवाद या वास्तूने पाहिले आहेत. तसंच देशाची रचना कशी झाली ते देखील पाहिलं आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीपासून ही वास्तू दिमाखात उभी आहे. ही जुनी वास्तू जमीनदोस्त केली जाईल का? जुन्या इमारतीचं नेमकं काय होणार? मोदी सरकार जुन्या संसदेविषयी काय निर्णय घेणार? अशा सगळ्या गोष्टी गुगलवर सर्च केल्या जात आहेत. आम्ही याच भवनाशी निगडीत प्रश्नांची उत्तरं तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

जुनी संसद कधी बांधली गेली?

उत्तर: जुन्या संसदेची रचना ब्रिटीश वास्तुविशारद सर एडविन ल्युटेन्स आणि हर्बर्ट बेकर यांनी केली होती. ही इमारत उभी करण्यासाठी १९२१ ते १९२७ असा सहा वर्षांचा कालावधी लागला होता. या इमारतीला काऊन्सिल हाऊस असं नाव होतं. ब्रिटिश सरकारची विधान परिषद या इमारतीतून काम करत होती.

जुन्या संसदेला किती वर्षे झाली आहेत?

उत्तर : जुन्या संसदेला ९६ वर्षे झाली आहेत.

जुन्या संसदेचं उद्घाटन कुणी केलं आहे?

उत्तर : १८ जानेवारी १९२७ या दिवशी भारताचे तत्कालीन व्हॉईसरॉय लॉर्ड आयर्विन यांच्या हस्ते या भवनाचे उद्घाटन केलं होतं.

ब्रिटिश काळात बांधल्या गेलेल्या संसद भवनासाठी किती खर्च आला होता?

उत्तर : जुनं संसद तयार करण्यासाठी सुमारे ८३ लाखांचा खर्च झाला होता.

संसद भवन हे नाव कधी पडलं?

उत्तर: ब्रिटिशांनी ही इमारत १९२७ मध्ये बांधून पूर्ण केली. त्या इमारतीला काऊन्सिल हाऊस म्हटलं जात होतं. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर म्हणजेच १९४७ नंतर काऊन्सिल हे संसद भवन म्हणून स्वीकारलं गेलं.

जुनं संसद भवन पाडलं जाणार का?

उत्तर : जुनं संसद भवन पाडलं जाणार नाही. ही वास्तू जतन केली जाईल. या संसद भवनाची दुरुस्ती केली जाईल. या ठिकाणी संसदीय कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येईल. मार्च २०२१ मध्येच केंद्रीय मंत्री हरदीप सिंह यांनी राज्यसभेत ही बाब सांगितली होती की नव्या संसदेचं काम पूर्ण झाल्यानंतर जुन्या संसद भवनाची डागडुजी केली जाईल. संसदीय कामांसाठी या भवनाचा उपयोग केला जाईल. बीबीसीने दिलेल्या एका वृत्तानुसार जुन्या संसद भवनात संग्रहालय उभारलं जाणार आहे आणि ते जतन केलं जाणार आहे. येणाऱ्या पिढ्यांसाठी लोकशाहीचा प्रवास कसा झाला ते दाखवणारी ही वास्तू ठरणार आहे.

सध्याच्या संसद भवनातील चित्रं, शिल्प, हस्तलिखिते कुठे आहेत?

उत्तर : सध्याच्या संसदेतील सगळी चित्रं, शिल्पं, हस्तलिखितं आणि महत्त्वपूर्ण कलाकृती या राष्ट्रीय संग्रहालय, राष्ट्रीय अभिलेखागार आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रात ठेवण्यात आल्या आहेत.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What will happen to the old parliament building today pm modi will inaugurate the new parliament building scj
Show comments