जर तुम्ही भारतामध्ये रहात असाल तर तुम्ही कधीना कधी ‘महाराजां’च्या हातच्या स्वयंपाकाची चव नक्कीच चाखली असेल. आपल्या देशाच्या अनेक भागांमध्ये स्वयंपाकी यांना ‘महाराज’ असे म्हटले जाते. ‘महान राजा’ किंवा ‘रॉयल शेफ’ या अनुषंगाने ‘महाराज’ या शब्दाचा वापर केला जातो. पाककला तज्ज्ञांबद्दल आणि त्यांच्या प्रति असणारा आदर दर्शविण्यासाठी भारतामध्ये शेफला हा मान दिला जातो.
इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरील क्रिश अशोक या कंटेन्ट क्रिएटरने या विषयासंबंधी माहिती देणारा एक व्हिडीओ शेअर केला होता, त्यामध्ये महाराज हा शब्द कसा निर्माण झाला असेल याची माहिती देण्यात आली आहे. त्या व्हिडीओला, “पौराणिक कथांमध्ये, अनेकदा खाद्यसंस्कृतीचा / पदार्थांचा समावेश केला जातो, ज्यात विविध अर्थ दडलेले असतात”, असे कॅप्शनदेखील देण्यात आले आहे.
मात्र, स्वयंपाकीला ही पदवी का बरं दिली जाते? असा प्रश्न पडला असल्यास त्याचे उत्तर आपल्याला पौराणिक गोष्टींमध्ये सापडतात. अशा गोष्टीत ऐतिहासिक परंपरा, सांस्कृतिक प्रभाव आणि भारतीय संस्कृतीतील खाद्यपदार्थांच्या खास भूमिका दडलेल्या असतात.
“मुघलांच्या काळात, भारतातील राजेशाही घराण्यातील स्वयंपाक करणाऱ्यांना महाराज म्हणून संबोधले जायचे. मुघलांच्या संरक्षाणाखाली राहणाऱ्या या शेफना ‘बावर्ची’ आणि ‘रकबदार’ म्हणूनही ओळखले जायचे. बावर्ची, रकबदार म्हणजेच पाककलेमध्ये तरबेज आणि त्यांच्या पाककौशल्यात परिपूर्ण असणारी व्यक्ती.” अशी माहिती सल्लागार आहारतज्ज्ञ आणि मधुमेह एज्युकेटर, कनिक्का मल्होत्रा यांनी दिली असल्याचे द इंडियन एक्स्प्रेसच्या लेखातून समजते.
साधारण अठराशे ते एकोणीसशेच्या काळात, अवधच्या नवाबांनी लखनवी खाद्यसंस्कृतींना खास पद्धतीने घडवत, विकसित करत, शेफना अधिक उच्च दर्जा देण्यास हातभार लावला होता. असे असले तरीही शेफना महाराज का म्हटले जाते, याबद्दल कुठलेही कागदी पुरावे नसल्याचे कनिक्का म्हणतात.
तरीही आचारी, राजघराणी / रॉयल्टी आणि मुबलकता या सर्व गोष्टींचा आपापसात एक खास संबंध अस्तित्त्वात होता. शाही घराणी अशा आचाऱ्यांना कामावर ठेवत, जे त्यांच्या क्षेत्रात कुशल असून, सतत विविध सामग्रीचा आणि जिन्नसांचा वापर व प्रयोग करीत असे. सर्वोत्कृष्ट दर्जाचा भाजीपाला हमखास मिळत असल्याने शाही जेवण हे पोषक मूल्यांनी भरपूर असे.
शाही स्वयंपाकातील अगणित विविधता आणि त्यांची समृद्धता यामुळे कदाचित आचाऱ्यांसाठी महाराज या नावाचा संबंध जोडला गेला असावा; जो अन्नपदार्थांमधील भव्यता आणि विपुलता दर्शवतो.
आचाऱ्यांना ‘महाराज’ पदवी देण्यामागचा सांस्कृतिक आणि धार्मिक प्रभाव
आहारातील पोषणाला, पौष्टिकतेला हिंदू धर्मातील दैवी स्थानाच्या भावनेतून, आचारी किंवा स्वयंपाकी यांना ‘महाराज’ म्हणण्याच्या परंपरेला हातभार लावला असू शकतो. हिंदू धर्मात देवांना अन्नपदार्थ हे प्रसाद म्हणून अर्पण केले जातात. कुशल आचारी जे हे अन्नपदार्थ तयार करतात, ते या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होत असल्याने त्यांना विशेष मान दिला जात असे.
इतकेच नाही तर आयुर्वेदात म्हणजे भारताची प्राचीन पारंपरिक औषधी प्रणाली हीदेखील आहार आणि आरोग्य यांच्यातील संबंधावर भर देते. जे आचारी संतुलित आहार तयार करतात, त्यांना आरोग्याची काळजी घेता येते अशा दृष्टीने त्यांच्याकडे पहिले जात असून, या कारणामुळेदेखील त्यांना अधिक मान दिला जातो.
आजही भारतातील शेफना ‘महाराज’ म्हटले जाते का?
अजूनही भारतामध्ये महाराज हा शब्द वापरला जातो; खास करून पारंपरिक आणि सांस्कृतिक पाककृतींसाठी, असे कनिक्का यांनी सांगितले आहे. केवळ उच्च दर्जाच्या रेस्टॉरंटमध्ये पारंपरिक खाद्यपदार्थ देणाऱ्या ठिकाणी महाराज हा शब्द वापरात असला, तरीही आता तो आधीसारखा सर्वत्र वापरला जात नाही.”
शेफला महाराज म्हटल्याने सामाजिक महत्त्व वाढते का?
“महाराज म्हटल्यावर आचाऱ्याला / शेफला ऐतिहासिक महत्त्व असणारी पदवी / दर्जा बहाल केला जातो, ज्याचे पाकविश्वात अनन्यसाधारण महत्त्व आहे. इतकेच नाही, तर या पदवीमुळे ते शेफ पाककलेचे रक्षक म्हणून आणि स्वतःच्या कौशल्यांवर भर देत स्वतःची व्यावसायिक ओळख निर्माण करतात.
एखाद्यास महाराज म्हणून संबोधण्याने, त्या व्यक्तीच्या स्वयंपाकाची पद्धत, पुरातन कृती आणि प्रादेशिक खाद्यसंस्कृतींच्या गुंतागुंतीबद्दल आदर दर्शवला जातो. सध्याच्या पाकक्षेत्रात, शेफ त्यांची व्यावसायिक ओळख वाढवण्याकडे भर देत आहेत. जे पाकसंस्कृतीमधील कलाकार आणि नवनवीन गोष्टींचे निर्माण करण्यासाठी ओळखले जातात, अशी माहिती द इंडियन एक्स्प्रेसच्या एका लेखावरून समजते.