What is the story behind Shakti Peeth: हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाला खूप महत्त्वपूर्ण मानले जाते, ज्यात नवरात्री हा अनेकांच्या आवडीचा सण आहे. आश्विन महिन्यातील नवरात्र भारतामध्ये मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. या नवरात्रीत आदिशक्तीच्या आराधनेसह गरबा, दांडियादेखील खेळला जातो. परंतु, आश्विन नवरात्रीव्यतिरिक्त एका वर्षात आणखी तीन नवरात्री साजऱ्या केल्या जातात. म्हणजे वर्षात एकूण चार नवरात्री असतात. त्यातील दोन नवरात्री प्रत्यक्ष असतात आणि इतर दोन नवरात्री गुप्त असतात. चैत्र आणि आश्विन महिन्यातील नवरात्रींना प्रत्यक्ष नवरात्री मानले जाते. या दोन्ही नवरात्री संपूर्ण भारतातील लोक उत्साहाने साजऱ्या करतात. तसेच माघ आणि आषाढ महिन्यातील नवरात्रींना गुप्त नवरात्री, असे मानले जाते. या दोन्ही नवरात्रींमध्ये साधनेला अधिक महत्त्व दिले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या माघ नवरात्र सुरू असून, ही नवरात्र (३० जानेवारी २०२५ ते ७ फेब्रुवारी २०२५ पर्यंत असेल.) या काळात देवीच्या मंदिरांमध्ये नवरात्रीचे मोठमोठे उत्सव साजरे केले जातील. भारतामध्ये देवीची लाखो मंदिरे असतील; परंतु त्यातील काही मंदिरांकडे शक्तिपीठ म्हणून पाहिले जाते. मान्यतेनुसार, भारतात देवीची ५१ शक्तिपीठे आहेत. जिथे देवी सूक्ष्म स्वरूपात विराजमान असते. परंतु, ही शक्तिपीठे नक्की कोणती? हे या बातमीच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ

५१ शक्तिपीठे कशी निर्माण झाली?

पौराणिक कथेनुसार, आदिशक्तीचा जन्म प्रजापती दक्ष राजाच्या घरी झाला; जिथे तिचे नाव सती असे ठेवण्यात आले. तरुणपणी सतीने भगवान महादेव यांच्याशी स्वइच्छेने विवाह केला. हा विवाह प्रजापती दक्ष राजाला मान्य नव्हता. हा राग मनात धरून सती आणि महादेवांना हिणवण्यासाठी दक्ष राजाने एका मोठ्या यज्ञाचे आयोजन केले. त्यात मोठमोठे राजे, देवी-देवता, यक्ष, गंधर्व, ऋषी, सतीच्या सर्व बहिणी व त्यांचे पती या सर्वांना आमंत्रित करण्यात आले होते. परंतु, सती आणि महादेव यांना आमंत्रण मिळाले नाही. ही गोष्ट सतीला कळताच ती संतापली आणि सरळ दक्षाच्या महालात गेली. तिथे आप्तेष्टांसमोर दक्षाने सती आणि महादेव यांचा अपमान केला. महादेवाचा केलेला अपमान सतीला सहन झाला नाही. त्यामुळे तिने समोर सुरू असलेल्या यज्ञाकुंडामध्ये आत्मदहन केले. जेव्हा कैलासात ध्यानस्थ बसलेल्या भगवान महादेवांना ही गोष्ट कळली, तेव्हा त्यांचा तिसरा डोळा क्रोधाने उघडला. त्यानंतर आपल्या प्रिय पत्नीच्या मृत्यूचे दुःख व्यक्त करीत आणि तिचा मृतदेह हातामध्ये घेऊन महादेव तांडव करू लागले. विश्वाचे रक्षण करण्यासाठी आणि शिवाचे पावित्र्य परत आणण्यासाठी भगवान विष्णूने सुदर्शन चक्र वापरून सतीच्या शरीराचे ५१ तुकडे केले. हे तुकडे पृथ्वीवर अनेक ठिकाणी पडले. हे ५१ तुकडे ज्या ज्या ठिकाणी पडले, त्या त्या ठिकाणाला शक्तिपीठाचे स्वरूप प्राप्त झाले. कालांतराने प्रत्येक शक्तिपीठाचा महिमा आणि देवीचे त्या शक्तिपीठाशी संबंधित अवतार कार्य सुरू झाले. ही सर्व ५१ ठिकाणे पवित्र भूमी आणि तीर्थक्षेत्रे मानली जातात.

देवीची ५१ शक्तिपीठे कोणती?

१) कामाख्या : आसाममधील गुवाहाटी येथे असलेल्या या मंदिरात देवी सतीच्या योनीची पूजा केली जाते .

२) अवंती / महाकाली देवी : मध्य प्रदेशातील उज्जैन शहरातील शिप्रा नदीच्या काठाजवळील भैरव पर्वतावर हे तीर्थक्षत्र आहे.

३) ललिता / प्रयाग शक्तिपीठ : अलाहाबाद शहरातील संगम समुद्रकिनाऱ्यावर हे तीर्थक्षत्र आहे. या शक्तिपीठाला ललिता आणि प्रयाग मंदिर, असेही म्हणतात.

४) विशालाक्षी / मणिकर्णिका : उत्तर प्रदेशातील काशी येथील मणिकर्णिका घाटावर हे तीर्थक्षत्र आहे. विशालाक्षी गौरी मंदिर म्हणूनही ते ओळखले जाते.

५) भबानीपूर शक्तिपीठ / अपर्णा : बांगलादेशमध्ये असलेले भबानीपूर शक्तिपीठ हे देवी अपर्णेला समर्पित आहे.

६) करवीरनिवासिनी महालक्ष्मी : महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात हे शक्तिपीठ आहे.

७) भवानी – चंद्रनाथ मंदिर : बांगलादेशातील हे शक्तिपीठ डोंगरावर वसलेले आहे.

८) त्रिस्रोता भ्रामरी शक्तिपीठ : बंगालमधील सालबारी गावातील त्रिस्रोता भ्रामरी शक्तिपीठ आहे.

९) सप्तशृंगी : महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात वणी येथे सप्तश्रृंगी देवीचे शक्तिपीठ आहे.

१०) प्रभास – चंद्रभागा : गुजरातमधील जुनागढ जिल्ह्यातील सोमनाथ मंदिराजवळ हे शक्तिपीठ आहे.

११) छिन्नमस्तिका : हिमाचल प्रदेशातील उना जिल्ह्यात स्थित हे शक्तिपीठ आहे.

१२) दक्षायणी : तिबेटमध्ये असलेल्या मानसरोवराजवळ मातेचे हे शक्तिपीठ स्थित आहे.

१३) गंडकी चंडी – मुक्तिनाथ मंदिर : मुक्तिनाथ शक्तिपीठ नेपाळमध्ये गंडकी नदीच्या काठावर पोखरा नावाच्या ठिकाणी आहे.

१४) मणिबंध शक्तिपीठ : मणिबंध, ज्याला मणिवेदिका शक्तिपीठ आणि गायत्री मंदिर म्हणूनही ओळखले जाते, हे राजस्थानातील अजमेरपासून ११ किमी अंतरावर आहे.

१५) इंद्रक्षी/ नागपूशनी /भुवनेश्वरी : श्रीलंकेतील त्रिंकोमाली येथे हे शक्तिपीठ आहे.

१६) यशोरेश्वरी / जेशोरेश्वरी : बांगलादेशातील खुलना जिल्ह्यातील ईश्वरीपूर येथील यशोर येथे हे शक्तिपीठ आहे.

१७) तुळजापूर भवानी : महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात हे शक्तिपीठ आहे.

१८) ब्रजेश्वरी देवी मंदिर /जयदुर्गा : ब्रजेश्वरी देवी मंदिर हिमाचल प्रदेशातील कांगडा येथे हे शक्तिपीठ आहे. येथे देवीची जयदुर्गा म्हणून आणि भगवान शिवाची अभिरू म्हणून पूजा केली जाते.

१९) नारटियांग दुर्गा मंदिर : मेघालयातील जैंतिया टेकडीवर नारटियांग शक्तिपीठ आहे. येथे देवी माता सतीची जयंती म्हणून आणि भगवान शिव यांची कृमाशिश्वर म्हणून पूजा केली जाते.

२०) युगंड्य मंदिर / क्षीरग्राम : पश्चिम बंगालमधील वर्धमान जिल्ह्यात शक्तिपीठ आहे. त्याला क्षीरग्राम शक्तिपीठ, असेही म्हणतात.

२१) कलमाधव / देवी काली : मध्य प्रदेशातील अमरकंटक येथील कलामाधव मंदिरात शोन नदीजवळ हे शक्तिपीठ आहे.

२२) कालीघाट काली मंदिर / कालिका : पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरातील कालीघाट येथे हे शक्तिपीठ आहे.

२३) कंकालेश्वरी : पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील बोलपूर स्टेशनपासून १० किमी ईशान्येस असलेल्या कंकलीतला, कोप्पई नदीच्या काठावर देवीला स्थानिक पातळीवर कंकलेश्वरी म्हणून ओळखले जाते.

२४) विभाश / कपालिनी : पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यात हे शक्तिपीठ आहे. हे कोलकात्यापासून सुमारे ९० किलोमीटर अंतरावर आहे आणि बंगालच्या उपसागराजवळ रूपनारायण नदीच्या काठावर वसलेले आहे.

२५) हिंगलाज – कोट्टारी : हिंगला किंवा हिंगलाज शक्तिपीठ हे पाकिस्तानातील बलुचिस्तान येथे आहे. येथे माता सतीचे डोके पडले होते.

२६) रत्नावली – कुमारी : बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील खानकुल-कृष्णनगर हे शक्तिपीठ आहे.

२७) श्री शैल – महालक्ष्मी/ भैरब ग्रीबा शक्तिपीठ : बांगलादेशातील सिल्हेट जिल्ह्याजवळील शैल नावाच्या ठिकाणी हे शक्तिपीठ आहे, जे शहरापासून २० किमी अंतरावर आहे.

२८) अमरनाथ/ महामाया : काश्मीरमधील पहलगाम जिल्ह्याजवळ हे आहे. या शक्तिपीठाला महामाया म्हणून ओळखले जाते.

२९) महाशिरा शक्तिपीठ/कपाली/ गुह्येश्वरी मंदिर : नेपाळमधील पशुपतिनाथ हे शक्तिपीठ आहे. हे गुह्येश्वरी मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे.

३०) बकरेश्वर मंदिर, बीरभूम : हे मंदिर बांगलादेशातील बीरभूम जिल्ह्यात पाफ्रा नदीच्या काठावर आहे.

३१) महिषमर्दिनी शिवहरकरय (करवीपूर) : पाकिस्तानातील सुक्कुर स्टेशनजवळ कराची येथे हे आहे.

३२) उजनी शक्तिपीठ श्री मंगलचंडी मंदिर: बंगालमधील वर्धमान जिल्ह्यातील उजनी येथे हे शक्तिपीठ आहे.

३३) नंदिकेश्वरी मंदिर, सैंथिया : पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यात हे शक्तिपीठ आहे. स्थानिक रेल्वेस्थानकापासून ते फक्त १० मिनिटांच्या अंतरावर आहे.

३४) सुचिंद्रम मंदिर /शुची / नारायणी : तमिळनाडूमधील कन्याकुमारी-तिरुवनंतपुरम मार्गावर हे शक्तिपीठ आहे.

३५) अट्टाहास, फुल्लरा देवी: पश्चिम बंगालमधील अट्टाहास ठिकाणी हे शक्तिपीठ आहे.

३६) रकिणी / गोदावरी तीर : आंध्र प्रदेशातील राजमुंद्री प्रदेशात गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या कोटीलिंगेश्वरावर हे शक्तिपीठ आहे.

३७) सर्वाणी-कन्याश्रम : तमिळनाडूतील शक्तिपीठाला कन्याश्रम याला कालिकाश्रम किंवा कन्याकुमारी शक्तिपीठ, असेही म्हणतात.

३८) सावित्री/ भद्रकाली शक्तिपीठ : हे शक्तिपीठ हरियाणातील कुरुक्षेत्र जिल्ह्यात आहे.

३९) रामगिरी – शिवानी शक्तिपीठ : उत्तर प्रदेशातील चित्रकूटजवळील रामगिरी येथे आहे.

४०) श्रीपर्वत – श्रीसुंदरी : काश्मीरच्या लडाख प्रदेशात हे शक्तिपीठ आहे. जुलै ते सप्टेंबर हा रस्तामार्गे जाण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो.

४१) ज्वालाजी / सिद्धिदा (अंबिका) : हिमाचल प्रदेशातील या शक्तिपीठाला ज्वालाजी स्थान म्हणतात. हे हिमाचल प्रदेशातील कांगडा खोऱ्यापासून ३० किमी दक्षिणेस, धर्मशाळेपासून ६० किमी अंतरावर आहे .

४२) सुगंधा शक्तिपीठ / सुनंदा: सुगंधा शक्तिपीठ हे देवी सुनंदा यांना समर्पित मंदिर आहे. ते बांगलादेशच्या उत्तरेस १० किमी अंतरावर असलेल्या बुलिसालच्या शिखरपूर गावात आहे.

४३) त्रिपुरा सुंदरी मंदिर / त्रिपुरेश्वरी मंदिर : त्रिपुरातील उदयपूरजवळील राधाकिशोरपूर येथे हे शक्तिपीठ आहे.

४४) त्रिपुरमालिनी / श्री देवी तालाब मंदिर : देवी तालाब हे पंजाबमधील जालंधर छावणीजवळ आहे.

४५) कात्यायनी शक्तिपीठ: उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील वृंदावन तहसीलमध्ये हे शक्तिपीठ आहे.

४६) मिथिला शक्तिपीठ : बिहार, भारत-नेपाळच्या सीमेवर जनकपूर रेल्वेस्थानक दरभंगाजवळ स्थित आहे.

४७) रेणुका मंदिर, माहूर – महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात हे शक्तिपीठ आहे.

४८) विमला / किरीटेश्वरी मंदिर पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील किरीटकोना गावाजवळ हे शक्तिपीठ आहे.

४९) बिराजा मंदिर / बिरीजा क्षेत्र : हे भारताच्या ओडिशा राज्यातील जाजपूर येथील सुंदर मंदिरांपैकी एक आहे.

५०) श्री अंबिका शक्तिपीठ /विराट : राजस्थानातील भरतपूर येथील विराट येथे हे शक्तिपीठ आहे.

५१) माँ नर्मदा मंदिर / शोणा शक्तिपीठ : मध्य प्रदेशातील अमरकंटक जिल्ह्यात असलेल्या नर्मदेच्या उगमस्थानी हे शक्तिपीठ आहे.