शाळा, कॉलेज असो किंवा नोकरी त्या एका दिवसाच्या रजेची सगळेच जण आवर्जून वाट बघत असतात. सुटीच्या दिवशी थोडं उशिरा उठणं, कुटुंबातील सदस्य किंवा मित्र-मैत्रिणींबरोबर वेळ घालवणं, असा पूर्ण सुटीचा दिवस आपण हवा तसा घालवतो. शाळा, कॉलेजपर्यंत ठीक आहे; पण एकदा नोकरी लागली की, हक्काची रजा घेणं किंवा मागणंही थोडं कठीणच जातं. काहींना तर काम पूर्ण करून सुट्टी घ्यावी लागते. तर काही जणांना सुटीसाठी मेल (Mail ) करून परवानगी घ्यावी लागते.
पण, तुम्हाला माहिती आहे का? आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करणारा रजा हा शब्द नेमका कुठून आला? तर आज आपण या लेखातून याबद्दल अधिक जाणून घेणार आहोत. ‘कहाणी शब्दांची : मराठी भाषेच्या जडणघडणीची’ या पुस्तकात लेखक सदानंद कदम यांनी रजा हा शब्द मराठी भाषेत कुठून आला हे थोडक्यात सांगितले आहे.
लेखक सदानंद कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार- माणूस नोकरीला लागला की, रजा या शब्दाशी त्याचं अनोखं नातं जुळतं आणि दिवसेंदिवस ते अधिकच घट्ट होत जातं. तर, मराठी भाषेत रजा हा शब्द अरबी भाषेमधून आला. रजा या शब्दाचं ‘रिझा’ असं मूळ रूप होतं. आज्ञा, संमती, परवानगी, कामावर न येण्याची सवलत,असा या शब्दाचा खरा अर्थ आहे. रिझा या मूळ शब्दाला पुढे रजा म्हणून संबोधलं जाऊ लागलं.
हेही वाचा…स्त्रियांच्या पोशाखातही होते ‘ठुशी’ला महत्त्व; ‘हा’ शब्द नेमका कशासाठी वापरला जायचा? घ्या जाणून…
‘किल्ला त्याच्या हवाली करणे म्हणोन रजा फर्मावली’ हे वाक्य वाचलं तेव्हा सदानंद कदम यांच्या ध्यानी आलं की, इतिहासकाळातील लोकही रजा मागत असत किंवा रजा घेत असत. असं त्यांनी या पुस्तकात म्हटलं आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांना खासगी क्षेत्रापेक्षा जास्त रजा मिळतात. आता प्रत्येक कंपनीमध्ये अनेक प्रकारच्या रजा उपलब्ध आहेत. प्रासंगिक रजा, आजारपणाची रजा, कायद्याप्रमाणे स्त्री कर्मचाऱ्यांना प्रसूतीसाठी रजा इत्यादी. पण, या रजा किती असाव्यात हे प्रत्येक कंपनीचे नियम ठरवतात. अनियोजित रजा घेतानासुद्धा वरिष्ठांची (सीनियर) पूर्वसंमती घेणं किंवा त्यांना वेळीच मेलद्वारे सूचित करणं महत्त्वाचं असतं. तर, आज आपण या लेखातून रजा हा शब्द मराठी भाषेत कसा आला ते पाहिलं.