जेव्हा आपण प्राण्यांच्या साम्राज्याचा विचार करतो तेव्हा आपल्याला निसर्गातील तेजस्वी रंगांची कल्पना येते. तथापि, सर्व प्राणी आपल्यासारखे जग पाहत नाहीत. अनेक प्राण्यांची रंगदृष्टी मर्यादित असते किंवा ते पूर्णपणे रंगांधळे असतात, ते त्यांच्या सभोवतालची दिशा समजून घेण्यासाठी इतर संवेदना जसे की गती ओळखणे, विरोधाभास, किंवा अगदी इन्फ्रारेड हीट सिग्नल्सचा वापर करतात.
श्वान आणि मांजरींसारख्या घरगुती पाळीव प्राण्यांपासून ते शार्कसारख्या खोल समुद्रातील शिकारी प्राण्यांपर्यंत, हे प्राणी जीवनाचा अनुभव एका अनोख्या पद्धतीने घेतात. चला अशा १० आकर्षक प्राण्यांचा शोध घेऊया, जे रंग पाहू शकत नाहीत – किंवा किमान आपल्यासारखे नाहीत!
१. श्वान
श्वानांना जग निळ्या आणि पिवळ्या रंगांत दिसते. कारण- त्यांची द्विरंगी दृष्टी (dichromatic vision) असते. मानवांप्रमाणे त्यांना लाल-हिरव्या रंगाची समज नसते.
२. मांजर
मांजरींनादेखील द्विरंगी दृष्टी (dichromatic vision) असते, ती प्रामुख्याने निळ्या आणि हिरव्या रंगछटांना ओळखते. त्यांचे डोळे रंगांपेक्षा हालचाल आणि कमी प्रकाशासाठी अधिक संवेदनशील असतात.
३. व्हेल
बहुतेक व्हेल पूर्णपणे रंगांधळे असतात. त्यांच्याकडे फक्त एकाच प्रकारची शंकू पेशी असते म्हणजेच ते राखाडी आणि निळ्या रंगाच्या छटांमध्ये पाहतात.
४. डॉल्फिन
व्हेल माशांप्रमाणे, डॉल्फिनची दृष्टी एका रंगाची असते. ते त्यांच्या सभोवतालच्या परिस्थितीचे आकलन करण्यासाठी डोळ्यांपेक्षा प्रतिध्वनी स्थानावर (echolocation) जास्त अवलंबून असतात.
५. बैल
लोकप्रिय समजुतीच्या विरुद्ध, बैल लाल रंगाच्या बाबतीत खरं तर रंगांधळे असतात. ते रंगापेक्षा हालचालींवर प्रतिक्रिया देतात. म्हणूनच त्यांच्यासमोर जर कापड हलवलं तर ते आक्रमक होतात.
६. शार्क
शार्क पूर्णपणे रंगांधळे असल्याचे आढळून आले आहे. ते रंगछटांऐवजी विरोधाभास आणि हालचाली ओळखतात. त्यांची दृष्टी त्यांना गढूळ पाण्यात शिकार ओळखण्यास मदत करते.
७. उंदीर
उंदरांची रंगदृष्टी मर्यादित असते, त्यांना प्रामुख्याने निळे आणि हिरवे रंग दिसतात; परंतु लाल रंग ओळखण्यात त्यांना अडचण येते.
८. घुबड
घुबडांना रात्रीची दृष्टी उत्तम असते; परंतु त्यांना रंगांची समज कमी असते. त्यांचे डोळे रंग ओळखण्याऐवजी हालचाल आणि प्रकाशाची तीव्रता ओळखण्यासाठी अनुकूल असतात.
९. साप
अनेक सापांच्या प्रजाती जगाला इन्फ्रारेडमध्ये (infrared) पाहतात आणि रंगाच्या दृष्टीऐवजी ते उष्णतेद्वारे मार्ग व भक्ष्य शोधण्यावर अवलंबून असतात, ज्यामुळे त्यांना प्रभावीपणे रंगांधळेपणा येतो.
१०. कटलफिश
आश्चर्याची गोष्ट म्हणजे कटलफिश (माकूळ म्हणून प्रसिद्ध) रंग बदलण्याची क्षमता असूनही, रंगांधळे असतात. त्यांना वेगवेगळ्या रंगछटांऐवजी कॉन्ट्रास्ट आणि ब्राइटनेस जाणवतो.
जरी हे प्राणी जगाचा अनुभव मानवांपेक्षा वेगळ्या पद्धतीने घेतात. तरी त्यांच्या अद्वितीय दृष्टी अनुकूलनामुळे त्यांना त्यांच्या वातावरणात टिकून राहण्यास मदत होते.