first theatre in pune : पुणे हे ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. येथील ऐतिहासिक वास्तू, इतिहास, संस्कृती, अशी या शहराची खास ओळख आहे. नाट्यसृष्टीत पुण्याचे खूप महत्त्वाचे योगदान आहे. १९ व्या शतकाच्या सुरुवातीचा काळ हा मराठी नाट्यसृष्टीचा अत्यंत महत्त्वपूर्ण काळ होता. या काळात बालगंधर्वांसारखे कलाकार प्रेक्षकांच्या गळ्यातले ताईत होते; तर राम गणेश गडकरींसारखे अनेक लेखक प्रेक्षकांना खिळवून ठेवत होते. थोडक्यात काय तर पुण्यात नाट्यगृहांची रेलचेल होती; पण पुण्यात सिनेमागृह नव्हते. गजबजलेल्या व्यापारी परिसरात आणि नाट्यगृहांची श्रीमंती असलेल्या पुण्यात बापूसाहेब पाठक यांनी सिनेमागृह उभारण्याचे धाडस केले. त्यांनी पूर्णतः इंग्रजी वास्तुशैलीतील आर्यन सिनेमागृह उभारले. आज आपण पुण्यातील याच पहिल्या चित्रपटगृहाविषयी आपण जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘आर्यन सिनेमा’चे योगदान

बुधवार पेठ हे पुण्याचे सामाजिक, सांस्कृतिक व करमणुकीचे केंद्र समजले जाई. त्या काळचे ते खरेखुरे ‘सिटी सेंटर’ होते. येथेच बापूसाहेबांनी सिनेमागृह उभारले. आर्यन सिनेमागृह, असे त्याचे नाव होते. पुढील काळात ‘आर्यन सिनेमा’ हे पुण्यातील एक महत्त्वाचे करमणुकीचे स्थान होऊन गेले. सुरुवातीच्या काळात तेव्हा इथे मूकपट दाखविले जात होते.
‘आर्यन सिनेमा’ने मराठी चित्रपटाच्या सुवर्णकाळात सिंहाचा वाटा उचलला. एवढेच नाही, तर इ.स. १९३१ मध्ये प्रदर्शित झालेला बोलपट ‘आलम आरा’ पुण्यात प्रदर्शित करण्याच्या वेळी निर्मात्यांनी ‘आर्यन’चाच आश्रय घेतला होता. १९२० मध्ये बाबूराव पेंटर यांच्या कंपनीने तयार केलेला सैरंध्री हा चित्रपट आर्यन सिनेमा येथे प्रथम प्रदर्शित झाला होता. आचार्य अत्रे यांनी लिहिलेल्या ‘ब्रह्मचारी’ चित्रपटाने याच आर्यन सिनेमामध्ये ५० आठवड्यांचा विक्रम केला होता. एक गाव बारा भानगडी, केला इशारा जाता जाता, सवाल माझा ऐका, बोट लावीन तिथे गुदगुल्या, एकटा जीव सदाशिव, गनिमी कावा, मोलकरीण अशा लोकप्रिय चित्रपटांनीही इथेच विक्रम मोडले.

हेही वाचा : पुण्यातील ‘या’ देवीला चतु:श्रृंगी नाव कसं पडलं? जाणून घ्या या नावामागची रंजक गोष्ट

आर्यन सिनेमागृहाचा शेवट

आर्यन सिनेमागृहापासून पुण्यातील चित्रपटांच्या कारकिर्दीला सुरुवात तर झाली; पण एकच चित्रपटगृह पुरेसे नव्हते. खासगीवाल्यांच्या वाड्यातील मधल्या चौकामध्ये एक छोटेखानी चित्रपटगृह श्रीकृष्ण सिनेमा या नावाने चालू करण्यात आले आणि पुढे काळाच्या ओघात मंडईच्या आसपासचा भाग चित्रपटांचा भाग म्हणून ओळखला जाऊ लागला.
पुण्यातही पुढील काळात वसंत, न्यू श्रीकृष्ण, विजयानंद, राहुल, मिनर्व्हा, अप्सरा अशी अनेक चित्रपटगृहे उभी राहिली. पण, आर्यन व मिनर्व्हा या सिनेमागृहांच्या जागा महापालिकेच्या मालकीच्या होत्या. पुढील काळामध्ये मंडईच्या परिसरातील वाढत्या गर्दीच्या पसाऱ्यामुळे वाहनांना रस्ते अपुरे पडू लागले, असे म्हणत महापालिकेने त्या जागा परत मागितल्या.
असे म्हणतात की, ‘आर्यन’च्या मालकांनी त्यावेळी ‘आर्यन सिनेमा’ वाचविण्याचेही खूप प्रयत्न केले; पण ते सारेच निष्फळ ठरले. अखेर २५ ऑक्टोबर १९८२ रोजी ‘आर्यन’चा ताबा महानगरपालिकेने घेतला. पुढे या जागी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्याचे ठरवून, सप्टेंबर १९८३ मध्ये महानगरपालिकेने ‘आर्यन’ भुईसपाट करण्यास सुरुवात केले. आज पुण्यात अनेक मल्टिप्लेक्स उभे असले तरी चित्रपटांची चंदेरी दुनिया दाखविणारे ‘आर्यन सिनेमा’ पुणेकरांच्या कायम लक्षात राही

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Which is the first theatre in pune who built first movie theatre aryan cinema hall know history if oldest theater in pune city ndj