गेल्या वर्षभरामध्ये बॉलीवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती झाली. शाहरुख खानच्या ‘पठाण’पासून रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’पर्यंत चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. अनेक चित्रपटगृहांमध्ये हाऊसफुलचे बोर्ड लागलेले पाहायला मिळाले. आपल्या आवडत्या कलाकाराला बघण्यासाठी चाहत्यांनी चित्रपटगृहांमध्ये एकच गर्दी केली होती.
अॅडव्हान्स बुकिंगच्या माध्यमातून अनेकांनी चित्रपटगृहातील आपली आवडती सीटही (खुर्ची) बुक केली होती. आजकाल अॅपच्या माध्यमातून प्रेक्षक चित्रपटगृहामधील त्यांना हवी ती खुर्ची निवडू शकतात. काहींना पुढच्या रांगेतील खुर्ची आवडते; तर काहींना एकदम शेवटची खुर्ची हवी असते. पण, चित्रपटगृहामध्ये अशी कोणती खुर्ची असते; जिथून तुम्हाला चित्रपट चांगला दिसण्याबरोबरच आवाजही चांगला ऐकू येतो. तुम्हाला माहीत आहे का? नसेल, तर चला जाणून घेऊ चित्रपटगृहामधील खुर्च्यांचे गणित कसे काय असते ते…
चित्रपटगृहातील कोणती सीट आहे योग्य?
या प्रश्नाचे उत्तर प्रसिद्ध हॉलीवूड दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन यांनी त्यांच्या एका मुलाखतीत दिले आहे. ते म्हणाले होते की, जेव्हा तुम्ही चित्रपटगृहात बसून चांगला चित्रपट पाहत असता आणि जर तुमची सीट खराब असेल, तर तुम्ही चित्रपटाचा आनंद घेऊ शकत नाही. दुसरीकडे चित्रपट चांगला असेल आणि सिनेमागृहातही चांगली सीट मिळाली, तर चित्रपटाची मजा द्विगुणीत होते. पुढे ते म्हणाले, जेव्हा मी चित्रपटगृहामध्ये चित्रपट बघायला जातो तेव्हा मी तिसऱ्या रांगेच्या मधल्या सीटला प्राधान्य देतो.
हेही वाचा- ड्रॅक्युला पोपट खरेच रक्त पितात का? सामान्य पोपटांपेक्षा ते एवढे भयंकर का दिसतात?
चित्रपट बघताना काहींना मागची सीटही आवडते. मागच्या सीटवर आवाजाचा कमी त्रास होतो; पण काही चित्रपटगृहांमध्ये रिक्लीनर सीटची सोय असते. अशा चित्रपटगृहांमधील खुर्च्या तुम्ही तुमच्या सोईनुसार सेट करू शकता. उदाहरणार्थ- जर तुम्हाला पाय पसरून किंवा झोपून चित्रपट पाहायचा असेल, तर रिक्लीनर सीट तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे.
हेही वाचा- सापापेक्षा धोकादायक आहे ‘या’ विंचवाचे विष; एका थेंबाची किंमत लाखो रुपये
चित्रपटगृहामधील आवाजाबाबत बोलायचे झाले, तर चित्रपटगृह पूर्णपणे साउंडप्रूफ असते. म्हणजेच आवाज हॉलबाहेर जात नाही. याचा अर्थ तुम्ही हॉलमध्ये कुठेही बसलात तरी तुम्हाला तोच आवाज ऐकू येईल. त्यामुळे चित्रपट बघण्यासाठी जाण्याअगोदर तुम्ही तुमच्या आवडीची कोणतीही सीट बुक करू शकता.