आत्तापर्यंत आपण काळ्या रंगाचा कावळा पाहिला असेल, पण पुण्यातील एका भागात चक्क पांढऱ्या रंगाचा कावळा पाहायला मिळाला आहे. काळ्या कावळ्यांमध्ये हा पांढरा कावळा पाहून लोकंही आश्चर्यचकित झाले आहेत. सध्या सोशल मीडियावर या पांढऱ्या कावळ्याचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पुण्यातील लुल्ला नगरमधील असल्याचा दावा केला जात आहे. या घटनेची माहिती काही स्थानिक लोकांनी सोशल मीडियावर शेअर केली.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, काळ्या कावळ्यांच्या घोळक्यात एक पांढऱ्या रंगाचा कावळा रस्त्याच्या कडेला इकडे तिकडे फिरताना दिसत आहे. अशा प्रकारचा पांढरा कावळा पाहून पुणेकर आश्चर्यचकित झाले आहेत.या पांढऱ्या कावळ्याचे फोटो कॅमेऱ्यात टिपण्यासाठी रस्त्यावर नागरिकांनी गर्दी केली होती. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.
काही लोकांच्या मते, ज्यांनी अशाप्रकारचा कावळा आधीही पाहिला असेल, त्यांच्यासाठी ही एक सामान्य घटना असू शकते. परंतु ज्यांनी हे दृश्य पहिल्यांदा पाहिले ते थक्क झाले आहेत. दोन वर्षांपूर्वी असाच एक पांढऱ्या रंगाचा कावळा पुण्यातील शिरुर परिसरात दिसला होता. पांढऱ्या रंगाचा कावळा हा अत्यंत दुर्मिळ आहे. पक्षी तज्ज्ञांच्या मते, पांढरे कावळे फार दुर्मिळ असतात.
सामान्यत: कावळ्यांचा रंग काळा असतो. परंतु या पक्ष्याचा रंग पांढरा झाला त्यामागे अनुवंशिक विकार असावा. या विकारामुळे कावळ्याचे शरीर संपूर्ण पांढरे होते. या जनुकीय विकारामुळे कावळ्यांमध्ये अल्बिनिझम किंवा ल्यूसिझम म्हणजे पंखांमध्ये रंगद्रव्य साठवण्याची कमतरता कमी होते. ज्यामुळे असा पांढरा रंग दिसतो.
पण काही लोकांना पहिल्यांदाच पांढऱ्या रंगाचा कावळा पाहून खूप आश्चर्य वाटत आहे. हा दुर्मिळ पक्षी त्याच्या विशिष्ट रंगामुळे विशेष मानला जातो. पक्षी तज्ज्ञांच्या मते, 10,000 कावळ्यांपैकी फक्त एकच कावळा पांढरा असू शकतो. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून लोक या व्हिडिओवर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.