World’s first SMS : सध्याच्या या डिजिटल जगात अनेक सेवा घरबसल्या आपल्याला मिळतात. कॉल, एसएमएस, ईमेल, सोशल मीडियामुळे जग अगदी लहान वाटतं. आजच्या डिजिटल युगात एवढी प्रगती झाली आहे की, एसएमएस ही त्यातली अगदी छोटीशी गोष्ट वाटते. पण, पहिला एसएमएस कधी आणि कोणी पाठवला होता? आणि त्या एसएमएसमध्ये काय लिहिले होते? यासंबंधी तुम्हाला माहीत आहे का, आज आपण त्याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.
पहिला एसएमएस कोणी व कधी पाठवला होता? (Who and when was The First SMS Sent)
पहिला एसएमएस हा ३ डिसेंबर १९९२ मध्ये २२ वर्षीय नील पॅपवर्थ (Neil Papworth) नावाच्या एका इंजिनीयरने पाठवला होता आणि त्याने हा मेसेज त्या वेळचे व्होडाफोनचे संचालक रिचर्ड जॅर्विस (Richard Jarvis’) यांना पाठवला होता.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, जगातील त्या पहिल्या मेसेजमध्ये नेमके काय लिहिले होते? तर ‘मेरी ख्रिसमस’, असा शुभेच्छा संदेश देणारा हा पहिला मेसेज होता. विशेष म्हणजे हा मेसेज संगणकावरून मोबाईलवर पाठवला गेला होता. त्यावेळी मोबाईल फोनमध्ये मेसेज पाठवायचा पर्याय नव्हता. त्यामुळे हा एकमार्गी संवाद होता. तेव्हापासून टेस्क्ट मेसेज म्हणजेच एसएमएसची सेवा लोकप्रिय झाली.
आजच्या या जगात व्यवसायामध्ये एसएमएसचा वापर अभिप्राय सर्वेक्षण आणि अपॉइंटमेंट रिमाइंडर्सपासून ते डिलिव्हरी नोटिफिकेशन आणि प्रोमो कोडपर्यंत सर्व गोष्टींसाठी केला जातो. एसएमएसमुळे व्यावसायिकांना त्यांच्या ग्राहकांशी संवाद साधणे अगदी सोपे झाले आहे.
३२ वर्षांपूर्वी पाठवलेला तो पहिला मेसेज ते आजपर्यंतचा एसएमएस प्रवास – डिजिटल युगात झालेली क्रांती
आज आपण सहजच एका क्लिकवर कुणालाही मेसेज करतो; पण पहिल्या एसएमएसची ही रंजक कहाणी खूप कमी लोकांना माहीत असेल. आता आपल्याकडे फक्त टेस्क्ट मेसेजची सेचवा नाही, तर व्हॉट्सअप, इन्स्टाग्राम, फेसबुक, टेलिग्राम, एक्स असे कितीतरी पर्याय उपलब्ध आहेत; ज्याद्वारे आपण लोकांशी सहज संवाद साधू शकतो.
आज आपण दररोज लाखो मेसेज एका दिवसात एकमेकांना पाठवतो; पण या गोष्टीची सुरुवात अगदी एका साधारण मेसेजने झाली. ३२ वर्षांपूर्वी पाठवलेला तो पहिला मेसेज ते आजपर्यंतचा एसएमएस प्रवास डिजिटल युगात झालेल्या क्रांतीची साक्ष पटवून देतो.