Who Have To Pay Debt If Loan Borrower Dies: बँका आणि वित्तीय संस्था कर्जदाराने ठरवलेल्या कालावधीत कर्जाची परतफेड न केल्यास त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करू शकतात. मात्र समजा जर कर्जाची परतफेड करण्यापूर्वी प्राथमिक कर्जदाराचा मृत्यू झाला तर या परतफेडीची जबाबदारी कोणावर येते? बँक प्राथमिक कर्जदाराच्या मृत्यूपश्चात सह-कर्जदार, जामीनदार किंवा कायदेशीर वारसांकडून रक्कम वसूल करू शकते का? आज आपण या प्रश्नांवर कायद्यात काय तरतुदी आहेत हे जाणून घेणार आहोत.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे कर्जाच्या परतफेडीचे दायित्व बदलणे हे घेतलेल्या कर्जाच्या प्रकारावर आणि तारणांवर अवलंबून असते. वैयक्तिक कर्ज, जे एक असुरक्षित कर्ज मानले जाते. अशावेळी बँक किंवा कर्जदाता कर्जदाराच्या कायदेशीर वारसांना किंवा मृत कर्जदाराच्या कुटुंबातील हयात सदस्यांना थकबाकीची रक्कम भरण्यास सांगू शकत नाहीत.
अशा कर्जांमध्ये कोणत्याही तारणाचा समावेश नसतो. त्यामुळे, रक्कम वसूल करण्यासाठी बँक कर्जदाराची कोणतीही मालमत्ता जप्त करू शकत नाही किंवा विकू शकत नाही. थकबाकीची रक्कम शेवटी राइट ऑफ केली जाते आणि बँकेद्वारे NPA खात्यात जोडली जाते. मात्र, प्राथमिक कर्ज घेताना त्या व्यक्तीसह अन्य कुणी सह-अर्जदार किंवा सह- स्वाक्षरी केली असल्यास, बँक सदर व्यक्तीकडे दायित्व सोपवू शकते. हाच नियम अन्य असुरक्षित कर्ज जसे की, क्रेडिट कार्ड कर्जाला सुद्धा लागू होतो.
दरम्यान, अलीकडे अनेक असुरक्षित कर्जे प्राथमिक कर्जदारासाठी विम्यासह येतात. यामुळे बँकांचे नुकसान टळू शकते. या तरतुदीनुसार प्राथमिक कर्जदाराच्या मृत्यूच्या दुर्दैवी घटनेत, थकित कर्जाची रक्कम विम्याद्वारे वसूल केली जाऊ शकते. साधारणपणे, कर्जदार कर्जाचा लाभ घेत असताना अशा विम्यासाठी प्रीमियम भरतो त्यामुळे त्यातून कर्जाची परतफेड करणे हे वैध मानले जाते.
होम लोनबाबत काय आहेत नियम?
जेव्हा गृहकर्जाच्या प्राथमिक कर्जदाराचा कर्जाची परतफेड करण्यापूर्वी मृत्यू होतो तेव्हा कर्जदाता सह-अर्जदाराकडे दायित्व सोपवू शकतो. सह-अर्जदार कर्जाची परतफेड करू शकत नसल्यास, बँक कुटुंबातील सदस्य, कायदेशीर वारस किंवा जामीनदार यांच्याशी संपर्क साधते. यापैकी कोणीही गृहकर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी घेत असल्यास, सावकार सुरक्षित मालमत्ता त्याच्या मालकांना परत करतो. परंतु, जर कोणीही नियोजित वेळेत थकबाकीची रक्कम भरण्याचे आश्वासन दिले नाही, तर बँक कर्ज वसूल करण्यासाठी मालमत्ता जप्त करून विक्री करू शकते. अशा परिस्थितीत, कर्जदाराचा कायदेशीर वारस कर्जदात्याशी संपर्क साधून कर्जाची पुनर्रचना करण्यास सांगू शकतो.
हे ही वाचा<< एफडीवर ९.३६ टक्के व्याजदर देतेय ‘ही’ वित्त संस्था; महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना मिळणार मोठा लाभ, पाहा सोपा तक्ता
कार लोनबाबत नियम काय आहेत?
जेव्हा कर्जदाराच्या मृत्यूमुळे कार कर्जाची परतफेड केली जात नाही, तेव्हा बँकेकडून कायदेशीर वारसांना संपर्क केला जातो. कायदेशीर वारसाने नकार दिल्यास, कर्जदाता थकित रक्कम वसूल करण्यासाठी कार जप्त करून विक्री करू शकतो.