World Sandwich Day History Significance in Marathi : सँडविच हा पदार्थ आपल्यापैकी जवळपास सर्व जण आवडीने खातात. सँडविच खात नाही, अशी व्यक्ती क्वचितच कोणी असेल. सँडविच तयार करणे अत्यंत सोपे असल्यामुळेच ते लोकप्रिय झाले. रोजच्या धावपळीच्या जीवनशैलीत नाश्ता अन् जेवणासाठी झटपट तयार होणारा आणि पोट भरण्यासाठी अत्यंत सोपा पर्याय म्हणजे सँडविच. तुम्हाला माहिती आहे का की, दरवर्षी ३ नोव्हेंबरला जागतिक सँडविच दिवस साजरा केला जातो. यंदा २०२३ मध्ये शुक्रवारी जगभरात हा दिवस साजरा केला जात आहे. याचे वैशिष्ट्य हे की, तुम्ही तो विविध पद्धतीने तयार करू शकता. शाकाहारी असो की मांसाहारी, प्रत्येक व्यक्ती आपल्या आवडीचे सँडविच तयार करून खाऊ शकते. ब्रेडच्या दोन स्लाइसमध्ये तुम्हाला हव्या त्या भाज्या, पनीर, अंडी किंवा चिकनचे मिश्रण भरा. बस मग झाले तुमचे सँडविच तयार. एक सँडविच खाल्ले तरी बराच काळ पोट भरलेले राहते. हे सँडविच पहिल्यांदा नक्की कधी तयार झाले आणि ते कोणी तयार केले तुम्हाला माहीत आहे का? नसेल तर, आज आम्ही तुम्हाला सँडविचचा इतिहास सांगणार आहोत.
सँडविच हा मुळात पाश्चात्त्य पदार्थ आहे; जो ब्रिटिशांच्या काळात भारतात आला. ब्रिटिशांच्या शाही खाद्यपदार्थांमध्ये सँडविचचा समावेश केला जात असे. पण, मुळात सँडविच हे इंग्लंडमध्ये १७६२ मध्ये निर्माण झाले. अनेक प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ सांगतात की, सँडविचचा निर्माता हा जॉन मॉन्टेग्यु आहे. तुम्हाला असे वाटेल की, ही व्यक्ती म्हणजे कोणी शेफ किंवा खाद्यपदार्थांचा विक्रेता असेल; पण असे काही नाही. जॉन मॉन्टेग्यु (John Montagu) हा एक जुगारी होता; जो कित्येक तास पत्ते खेळण्यात घालवत होता. असाच एक दिवस बराच वेळ पत्ते खेळत असताना त्याला भूक लागली; पण त्याला टेबल सोडूनही जायचे नव्हते. तेव्हा त्याने सेवकाला दोन ब्रेडच्या स्लाइसमध्ये मीट (मांस) टाकून द्यायला सांगितले; जेणेकरून लोक ते खाताना त्यांचे हात खराब होणार नाहीत आणि तो आरामात पत्ते खेळू शकेल. मग ही संकल्पना अल्पावधीत लोकप्रिय ठरली. त्या दिवसापासून इंग्लंडमध्ये सर्वत्र सँडविच तयार करण्यास सुरुवात झाली. अमेरिकेमध्ये सँडविचला खूप उशिरा लोकप्रियता मिळाली. १८१५ मध्ये अमेरिकन कुकबूक (खाद्यपदार्थ) पुस्तकामध्ये सँडविच या पदार्थाचा पहिल्यांदा उल्लेख झाला.

हेही वाचा – तुम्ही तुमच्या घरात किती रोख रक्कम ठेवू शकता? जाणून घ्या काय सांगतो कायदा
या पदार्थाला सँडविच नाव कसे पडले?
‘अर्ल ऑफ सँडविच’ ही इंग्लंडच्या पीरेजमधील (Peerage of England) एक उदात्त पदवी आहे; ज्याची निर्मिती हाऊस ऑफ मॉन्टेग्यू केली आहे. चौथा अर्ल ऑफ सँडविच ( 4th Earl of Sandwich) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जॉन मॉन्टेग्यूला (John Montagu) सन्मानित करण्यासाठी या पदार्थाला ‘सँडविच’ असे नाव देण्यात आले आणि काही काळातच हे नाव लोकप्रियही झाले. १८ व्या शतकात युरोपमध्ये बहुतेक लोक स्वत:बरोबर घेऊन जाण्यासारखा पदार्थ आणि झटपट तयार होणारे जेवण म्हणून सँडविच वापरत होते. मग ही संकल्पना जगभरात लोकप्रिय झाली आणि लोकांनी त्यांच्या पद्धतीनुसार सँडविच तयार करण्यास सुरुवात केली.
हेही वाचा – कुल्फी विक्रेते बर्फामध्ये मीठ का टाकतात? काय आहे यामागील शास्त्रीय कारण, जाणून घ्या
आज विविध प्रकारचे सँडविच उपलब्ध आहेत. मग आता तुमच्या आवडीचे सँडविच ऑर्डर करा आणि आजचा जागतिक सँडविच दिवस साजरा करा.