Traffic Lights History: रस्त्यांवरील गर्दी, अपघात टाळण्यासाठी सिग्नलचा वापर केला जातो; ज्यात लाल, हिरवा आणि पिवळ्या दिव्यांच्या माध्यमातून ट्रॅफिक नियोजन केले जाते. पण, ट्रॅफिक लाइट्सचा शोध कोणी लावला तसेच लाल, हिरवे आणि पिवळे दिवे कोणी शोधले असा प्रश्न कधी तुमच्या मनात आला आहे का? या प्रश्नाचे उत्तर अनेकांना ठाऊक नसेल. आज आम्ही तुम्हाला ट्रॅफिक लाइट्सच्या इतिहासाबद्दल माहिती देणार आहोत.

ट्रॅफिक लाइट्सचा शोध कसा आणि कोणी लावला?

ब्रिटीश रेल्वे व्यवस्थापक जॉन पीक नाइट या व्यक्तीने वाहतूक नियंत्रित करण्यासाठी रेल्वेमार्गाची पद्धत स्वीकारण्याची सूचना केली होती. तसेच पहिल्या ट्रॅफिक सिग्नलचा शोध जेपी नाइट या रेल्वे सिग्नलिंग इंजिनिअरने लावला. रेल्वेमार्गाने ट्रेन जात आहे की नाही हे दाखवण्यासाठी खांबापासून लहान हात पसरलेल्या सेमाफोर प्रणालीचा वापर केला. नाइट यांच्या रुपांतरामध्ये सेमाफोर्स दिवसा “स्टॉप” आणि “गो” चे संकेत देत होते आणि रात्री लाल आणि हिरवे दिवे वापरले जायचे. तसेच सिग्नल संचलित करण्यासाठी सिग्नलशेजारी एक पोलिस अधिकारी तैनात केला जायचा.

डिसेंबर १८६८ रोजी जगातील पहिला ट्रॅफिक सिग्नल वेस्टमिन्स्टरच्या लंडन बरोमध्ये ब्रिज स्ट्रीट आणि ग्रेट जॉर्ज स्ट्रीटच्या चौकात संसदेच्या सभागृहाजवळ आणि वेस्टमिन्स्टर ब्रिजजवळ उभारण्यात आला आणि तो त्यावेळच्या रेल्वे सिग्नलसारखा दिसत होता. सेमाफोर आर्म्स आणि लाल-हिरवे दिवे रात्रीच्या वापरासाठी गॅसद्वारे चालवले जायचे. मात्र, यावेळी दुर्दैवाने त्याचा स्फोट होऊन एका पोलिसाचा मृत्यू झाला. कालांतराने या सिग्नल लाईट्समध्ये सुधारित बदल करण्यात आला.

ट्रॅफिक लाइट्सचा इतिहास

पहिली ट्रॅफिक लाइट १८६८ मध्ये संसदेच्या सभागृहांच्या बाहेर बसवण्यात आली आणि रात्रीच्या वापरासाठी त्यात गॅसद्वारे चालवल्या जाणाऱ्या सेमफोर आर्म्स आणि लाल-हिरव्या दिव्यांचा वापर केला जायचा. हे लाइट त्यावेळच्या कोणत्याही रेल्वे सिग्नलसारखे दिसत होते.

गार्डियनच्या संशोधनानुसार, आधुनिक ट्रॅफिक लाइट्स हा अमेरिकन शोध आहे. १९१४ मध्ये क्लीव्हलँडमध्ये लाल-हिरव्या प्रणाली सिस्टिम स्थापित केल्या गेल्या.

रस्त्याच्या मधोमध असलेल्या टॉवरमधून ३-रंग सिग्नल मॅन्युअली ऑपरेट केले गेले आणि १९१८ मध्ये न्यूयॉर्कमध्ये स्थापित केले गेले .

१९२५ मध्ये ब्रिटनमध्ये या प्रकारचे पहिले दिवे, लंडनमध्ये सेंट जेम्स स्ट्रीट आणि पिकाडिलीच्या जंक्शनवर दिसू लागले, ते स्वीच वापरून पोलिसांकडून हाताने चालवले जात होते.

१९२६ मध्ये वॉल्व्हरहॅम्प्टनमध्ये वेळेच्या अंतराने कार्य करणारे स्वयंचलित सिग्नल स्थापित केले गेले.

हेही वाचा: विमान प्रवासात कोणत्या गोष्टी घेऊन जाण्यास कठोर बंदी असते?

१९३२ मध्ये ब्रिटनमधील पहिले वाहन-ॲक्ट्युएटेड सिग्नल शहरातील ग्रेसचर्च स्ट्रीट आणि कॉर्नहिल दरम्यानच्या जंक्शनवर आले. मात्र, ते देखील गॅसच्या स्फोटाने नष्ट झाले.