घागर घुमू दे घुमू दे, रामा, पावा वाजू दे|
आला शंकरुबा शंकरुबा, गवर माझी लाजू दे||
रुणझुणत्या पाखरा, जा रे माझ्या माहेरा|
आली गौराई अंगणी, तिला लिंबलोण करा||

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या गाण्याच्या दोन ओळी प्रत्येक माहेरवाशिणीच्या हृदयाचा ठाव घेतात. काळ बदलला लग्नाच्या, संसाराच्या व्याख्याही बदलल्या.

आणखी वाचा: Ganesh Chaturthi 2023:रिद्धी-सिद्धी सोबतची गणरायाची दैवी प्रेमकथा !

आता लग्नाच्या माध्यमातून होणारी माय- लेकींची ताटातूट म्हणावी तितकी विरह प्रदान करणारी नसली तरी; त्या नात्यातील तो एक ऋणानुबंध, ओलावा या दोन ओळींच्या माध्यमातून जगदीश खेबूडकरांनी अचूक वेधला आहे. तर राम कदम यांच्या संगीताने आणि उषा मंगेशकर यांच्या स्वरांनी या गाण्याला वेगळ्याच उंचीवर पोहोचवले आहे. दूर लांबच्या गावी सासरी गेलेल्या आपल्या लाडक्या मुलीची आतुरतेने वाट पाहणारी माऊली… आणि वर्षातून एकदा माहेरपणासाठी येणारी गौरी यांची अचूक सांगड या गाण्यात घातली गेली आहे. ज्येष्ठागौरीच्या निमित्ताने सासरी गेलेल्या कन्यका आपल्या माहेरी येतात… म्हणूनच ‘आली गौराई अंगणी, तिला लिंबलोण करा…’ ही ओळ अधिकच हृदयस्पर्शी ठरते. या वर्षी गौरींचे आगमन २१ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजून ३४ मिनिटांनी होत आहे, म्हणजेच आजच्याच दिवशी गौरींचे आवाहन केले जाणार आहे. म्हणूनच याच दिवसाचे औचित्य साधून ज्येष्ठागौरीच्या ‘निर्ऋती’ रुपी मूळ तत्त्वाविषयी जाणून घेणे नक्कीच समयोचित ठरणारे आहे.

आणखी वाचा: Ganesh Chaturthi 2023: देवी पार्वतीची शिकवण… मुक्या प्राण्यांवर प्रेम करा !

स्थित्यंतराचा इतिहास

मूळ विषयाकडे जाण्यापूर्वी भारतीय संस्कृती, परंपरा आणि इतिहास यांच्या संदर्भात काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. भारतासारख्या प्राचीन संस्कृती असलेल्या देशाला हजारो वर्षांचा इतिहास आहे. त्यामुळेच हा इतिहास अनेक प्रकारच्या स्थित्यंतरातून गेला आहे, ज्या प्रमाणे परकीय आक्रमणे झालीत, त्याच प्रमाणे देशांतर्गतही वेगवेगळ्या धार्मिक संकल्पना उदयास आल्या, त्यांचाही एकमेकांवर परिणाम झाला. म्हणजेच त्या वेगवेगळ्या परंपराही आपल्याच आहेत आणि त्यांचा परिणामही. त्यामुळे आज ज्या काही पारंपारिक प्रथा आपल्याकडे आहेत, त्याचे उद्गाते आपल्याच संस्कृतीतील आहेत, हे विसरून चालणार नाही. अशाच स्वरुपाची आगळी वेगळी परंपरा आपल्याला ज्येष्ठागौरींच्या मुळाशी ही दिसते.

आणखी वाचा: श्रीकृष्णाच्या अष्टभार्या !

कधी आई, तर कधी सहचारिणी

ज्येष्ठागौरी नक्की कोण यावरून अनेक संदर्भ आपल्याला पौराणिक, लोककथांमध्ये सापडतात. गौरी म्हटलं की, आपल्या समोर उभे राहते ते देवी पार्वतीचे रूप आणि गजाननासोबत होणारे गौरीचे आगमन हे समीकरण देवी पार्वतीच्याच रुपाकडे बोट दाखविणारे ठरते. त्यामुळे सर्वसाधारण, समाजात ज्येष्ठा गौरींचे आगमन पार्वती आणि गणपती या आई- पुत्राच्या आगमनाचे प्रतिक मानले जाते. हे खरे असले तरी प्रांतपरत्त्वे ज्येष्ठा गौरीच्या जन्मकथेत वैविध्य आढळते. गणरायासोबत येणारी ज्येष्ठागौरी ही कधी गणरायाची आई असते, तर काही ठिकाणी ती सहचारिणी असते. आज तिने पार्वतीच्या स्वरूपाशी सहचार्य साधले तरी तिच्या रूपाचे एक सूत्र अलक्ष्मीच्या हातातदेखील आहे. त्यामुळेच अनेकदा लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असते. कोणाची परंपरा बरोबर यावरून वादही होताना दिसतात. परंतु लक्षात घेण्याचा मुद्दा असा की, दोन्ही परंपरा आपल्याच आणि बरोबरही आहेत. हा भेद स्थानपरत्त्वे आल्याचे आपल्याला विसरून चालणार नाही.

मत्यू, नाश, दु:खाची देवता

ज्येष्ठा गौरीचा प्राचीन उल्लेख वैदिक साहित्यात सापडतो. पौराणिक संदर्भानुसार ज्येष्ठागौरी ही विष्णू पत्नी लक्ष्मीची मोठी बहीण. समुद्रमंथनातून दोघींचा जन्म झाला, त्यांचा ज्येष्ठा आणि कनिष्ठा असा उल्लेख करण्यात येतो. कनिष्ठा म्हणजे विष्णूपत्नी उत्तमासाठी, चांगल्यासाठी ओळखली जाते तर ज्येष्ठा हिची ख्याती अनिष्ठासाठी होती. अनिष्ठ, वाईट ठिकाणी ज्येष्ठेचा वावर असल्याचे पुराणकथा सांगतात. काल किंवा मृत्यूची देवता याच्या भार्यांच्या यादीत ज्येष्ठालक्ष्मीचा/ गौरीचा आणि निर्ऋतीचा उल्लेख आहे. विशेष भाग म्हणजे प्राचीन वाङ्मयात अनेक ठिकाणी निर्ऋती व ज्येष्ठा लक्ष्मी या भिन्न नसून एकच असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. पौराणिक संदर्भानुसार निर्ऋती ही नैर्ऋत्य दिशेची अधिष्ठात्री देवता आहे तसेच मृत्यूची, नाशाची व दु:खाचीही देवता आहे. किंबहुना विष्णुपत्नी लक्ष्मीच्या कृपेमुळे भाद्रपद महिन्यात तिची घरी आणून यथासांग पूजा केली जाते, हे सांगणाऱ्या अनेक पौराणिक कथा उपलब्ध आहेत. याच पार्श्वभूमीवर ही निर्ऋती कोण जाणून घेणे गरजेचे ठरते.

वैदिक संदर्भ काय सांगतो?

निर्ऋती या देवतेचा उल्लेख वेदांमध्ये सापडतो. ऋग्वेदाच्या अनेक श्लोकांमध्ये तिला ‘मृत्यूची देवता’ असे संबोधले आहे. निर्ऋती या शब्दाचे अनेक अर्थ सांगण्यात येतात त्यात प्रामुख्याने अधर्म, अराजकता अशा काहींचा समावेश होतो. याशिवाय एक महत्त्वाचा संदर्भ निघण्टु या ग्रंथात सापडतो. या संदर्भानुसार निर्ऋती हा शब्द ‘ऋति’ या शब्दाला ‘निर’ हा उपसर्ग लावून झालेला आहे. निघण्टुमध्ये ‘ऋति’चा अर्थ पाणी असा दिलेला आहे. त्या वरूनच निर्ऋती ही जलदेवता असावी, असा कयास काही अभ्यासक मांडतात. एकूणच सध्याच्या जेष्ठागौरीच्या आगमनाची प्रथा पाहिल्यास हे आपल्या सहजच लक्षात येते. ज्येष्ठागौरीच्या परंपरांमध्ये स्थानपरत्त्वे भिन्नता असली तरी नदी, पाणवठ्याच्या ठिकाणाहून गौरीची मुळे आणण्याची परंपरा आजही अबाधित आहे. मानववंशशास्त्राच्या दृष्टीने म्हणूनच या प्रथा- परंपरांना संशोधनाच्या दृष्टीने महत्त्व प्राप्त झाले आहे.

असे असले तरी, ज्येष्ठागौरीच्या काही परंपरा तिच्या वेगळेपणाकडे लक्ष वेधतात, यात प्रामुख्याने तिला काही ठिकाणी दाखविण्यात येणारा मांसाहाराचा नैवेद्य आणि मद्य यांसारख्या गोष्टींचा समावेश असतो. या परंपरेचे मूळ शोधल्यास ते निर्ऋतीकडे घेवून जाणारे आहे. निर्ऋती हीच अलक्ष्मी असून तिचीच आज ज्येष्ठागौरी म्हणून पूजा केली जाते. दुर्गासप्तशती या ग्रंथात शुंभ आणि निशुंभ या असुरांच्या वधाची कथा आहे. या असुरांच्या नाशासाठी देवतांनी देवीची उपासना केली. देवतांनी केलेल्या प्रार्थनेत ते देवीचे वर्णन करताना म्हणतात, ‘राक्षसांची लक्ष्मी जी निर्ऋती ती तूच आहेस’ यावरूनच निर्ऋती आणि (अ)लक्ष्मी यांच्यातील संबंध समजण्यास मदत होते. पौराणिक संदर्भानुसार निर्ऋती ही भूत, पिशाच्च यांची देवता होती. कुत्रा हे तिचे वाहन तसेच कपोत, घुबड, कावळा हे तिचे दूत आहेत. विशेष म्हणजे लक्ष्मीचे वाहन घुबड आहे. त्यामुळे लक्ष्मी, अलक्ष्मी आणि निर्ऋती यांच्यातील दुवा साधण्यास मदतच होते. मध्ययुगीन काळातील शाक्त संप्रदायाच्या प्रभावाखाली घडविल्या गेलेल्या तत्कालीन मंदिर तसेच लेणी शिल्पांमध्ये निर्ऋती अलक्ष्मी आपल्याला काही ठिकाणी मनुष्य तर कधी मनुष्य- प्रेत (शव) या वाहनांसोबत आपले वेगळेपण दर्शविते.

संशोधक काय सांगतात? मूळ कशात?

प्रारंभीच्या धर्मग्रंथांमध्ये, निर्ऋती ही एक देवी आहे, जी मृतांच्या राज्यात राहते. नंतरच्या संदर्भांमध्ये निर्ऋती हा एक पुरुष देव आहे, ज्याला नैऋत्येकडील दिक्पाल मानले गेले आहे. यासंदर्भात म. म. डॉ. सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांनी निर्ऋतीच्या लिंग परिवर्तनाबद्दल भाष्य करताना नमूद केले की, ‘निर्ऋतीला निर्ऋत्य, भूत, राक्षस, दिक्पाल इत्यादींचे अधिपती मानले आहे. निर्ऋत्य हे तिच्या जनपदाचं नाव आहे.

प्रसिद्ध प्राच्यविद्या अभ्यासक कॉ. शरद पाटील यांनी आपल्या १९८२ साली प्रकाशित झालेल्या ‘दास शुद्रांची गुलामगिरी’ या ग्रंथात ‘भू माता’ प्रकरणामध्ये निर्ऋती या देवतेविषयी सखोल संशोधन मांडले आहे. त्यांनी नमूद केल्याप्रमाणे वैदिक काळात निर्ऋतीचे स्थान उन्नत होते. तिला भू माता म्हणजे पृथ्वी या अर्थाने संबोधले जात असे. निर्ऋती ही सुपिकतेची देवता होती. तिचा वर्ण कृष्ण, तर तिची पूजा आकारहीन दगडाच्या स्वरुपात होत असे, असे ‘शतपथ ब्राह्मणा’तील उल्लेखाच्या आधारे त्यांनी नमूद केलेले आहे. नंतरच्या काळात मात्र निर्ऋतीचे मूळ जावून तिला ‘दुरितांची देवता’ असे ओळखले जाऊ लागले. निर्ऋतीचे झालेले हे स्थित्यंतर कॉ. शरद पाटील यांनी धार्मिक, सामाजिक, राजकीय पार्श्वभूमीवर झालेल्या बदलाच्या माध्यमातून मांडले आहे.

एकूणच आज जी ज्येष्ठा गौरी म्हणून पुजली जाते ती देवी निर्ऋती, अलक्ष्मी, लक्ष्मी अशा अनेक स्थित्यंतरातून गेलेली आहे, या स्थित्यंतरातून जाताना तिने आपल्यासोबत काही परंपराही आणल्या ज्या वेगवेगळ्या रुपात आजही तग धरून आहेत. त्यामुळे इतरांच्या परंपरा वाईट असे म्हणण्यापेक्षा, भारत हा विविधतेत एकता जपणारा देश आहे हे ध्यानी ठेवून सण समारंभ साजरे करावेत, हेच उत्तम!

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is niruthi what is her connection with jyeshtha gauri who comes to home in ganpati festival ganesh celebration gauri pujan svs