सध्या डॉ. अमोल कोल्हे यांच्या एका ट्विटची चर्चा होत आहे. त्यांनी ट्विटमध्ये ‘मिठाचा खडा टाकणारे शकुनीमामा कोण? महाराष्ट्र त्यांना कदापि माफ करणार नाही’ असे म्हटले आहे. राजकारणामध्ये ‘शकुनीमामा’ अशी उपमा देण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही आमदार नितेश राणे यांनीही ‘शकुनीमामा कोण आहे, हे सगळ्यांना माहीत आहे’ असे म्हटले होते. ‘शकुनीमामा’ ही उपमा राजकारणात किंवा चांगल्या गोष्टींमध्ये विघ्न आणणाऱ्या व्यक्तीला सहज दिली जाते. सर्वांना ‘शकुनीमामा’ वाईट होता, एवढेच माहीत आहे. परंतु, मुळात शकुनीमामा कोण होता? त्याने वाईटपणा का घेतला? त्याचे महाभारतातील स्थान काय होते आणि आज शकुनीमामाला नकारात्मक वलय का मिळाले, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शकुनीमामा कोण होते ?

शकुनी हे गांधार प्रदेशाचे राजे सुबाला यांचे शंभरावे पुत्र होते. आता गांधार प्रदेश अफगाणिस्तानमध्ये येतो. शकुनी यांची बहीण गांधारी हिचा विवाह धृतराष्ट्र राजाशी झाला होता. १०० कौरवांचे ते मामा असल्यामुळे ‘शकुनीमामा’ असे त्यांना ओळखले जाते. शकुनी मामाने दुर्योधनाला अनेक कुटील डावपेच खेळण्यास उद्युक्त केले. कुरुक्षेत्रावर झालेले महाभारत युद्ध हे शकुनीमामामुळे घडले, असेही समजले जाते. परंतु, शकुनी राजा हा अत्यंत कुशल, बुद्धिमान, युद्धतंत्रामध्ये पारंगत होता. त्याने आपले डाव साध्य होण्यासाठी अनेक डावपेच खेळले आहेत.

हेही वाचा : राजकीय नेते ‘बडव्यां’चा उल्लेख करतात, हे ‘बडवे’ म्हणजे कोण ? काय आहे बडव्यांचा इतिहास

शकुनीमामांचे डावपेच

शकुनीमामा हे कौरवांसह असायचे. कौरवांचे हितैषी वाटणारे शकुनीमामा मुळात कौरवांचे विरोधक होते. यामागे काही कथा आहेत. पहिली कथा म्हणजे, गांधारीचा विवाह हा शकुनीच्या मनाविरुद्ध झाला होता. भीष्माने गांधार प्रदेश जिंकून घेतला. तेव्हा सुबाला राजाची मुलगी गांधारी हिचा विवाह धृतराष्ट्राशी करण्यास सांगितले. धृतराष्ट्र आंधळा असल्याने शकुनीला हा विवाह मान्य नव्हता. विवाहानंतर गांधारीनेही डोळ्यांवर पट्टी बांधून कायमचे अंधत्व स्वीकारले. आपल्या बहिणीची ही दशा बघून कुरुवंशाचा नाश करण्याचे शकुनीने ठरवले.
दुसरी एक कथा म्हणजे, आपल्या पित्याच्या अपमानाचा बदला शकुनीला घ्यायचा होता. गांधारीच्या पत्रिकेमध्ये तिचे लग्न झाल्यावर वैधव्य येण्याचा योग होता. म्हणून तिचे पहिले लग्न बकऱ्यासह लावून त्याचा बळी दिला. त्यानंतर गांधारीचा विवाह धृतराष्ट्राशी झाला. परंतु, लग्न होईपर्यंत धृतराष्ट्राला ही गोष्ट माहीत नव्हती. लग्नानंतर ही गोष्ट समजल्यावर फसवणूक झाल्याच्या भावनेने राजा सुबाला आणि त्याच्या १०० मुलांना त्याने कैदी बनवले. त्या सर्वांचा त्याने छळ केला. राजा सुबालाच्या विनंतीवरून ‘शकुनी हा कायम कौरवांसह राहील’ असे वचन देण्यात आले. शकुनी कायम कौरवांसह होते. परंतु, त्यांनी असे डावपेच खेळले की, त्यात कौरवांचा नाश झाला.
शकुनीमामाच्या कथांमध्ये त्याला गांधारीच्या विवाहाचा बदला घ्यायचा होता आणि पित्याच्या अपमानाचा बदला घ्यायचा होता, म्हणून त्याने कौरवांचे राज्य नष्ट होईल असे डावपेच खेळले.

हेही वाचा : जुलै आणि ऑगस्ट हे सलग ३१ दिवसांचे महिने का येतात ? पूर्वी का होती १० महिन्यांची दिनदर्शिका…

शकुनीमामाला नकारात्मक वलय का प्राप्त झाले ?

अपमानाचा बदला घेणे, ही सहजसाध्य मानवी वृत्ती आहे. शकुनीच्या बाबतीतही असेच घडले. आपल्या बहिणीच्या आयुष्याची दुर्दशा झाली, आपल्या पित्याचा मृत्यू धृतराष्ट्रामुळे झाला, या सगळ्या गोष्टी त्याच्या मनात होत्या. त्याने दुर्योधनाला द्यूत खेळण्यास सांगितले. शकुनी द्यूतामध्ये प्रवीण होता. पांडवांना द्यूतामध्ये पराभूत करण्यात शकुनीमामाचा हात आहे. दुर्योधनाच्या मनात मोह निर्माण करणे, पांडवांच्या विरुद्ध मत तयार करणे, हे काम शकुनीने केले. शकुनीमामाने कौरवांना विजयाच्या आशा दाखवल्या. त्यांना साम्राज्य, संपत्ती मिळवून देऊन विश्वास जिंकला. परंतु, या ऐहिक गोष्टींमध्ये कौरव स्वतःला नष्ट झाले. कुरुक्षेत्रावर युद्ध करण्यास शकुनीमामाने प्रोत्साहित केले. शकुनीमामा स्वतः या युद्धात मृत्युमुखी पडला, पण कुरुवंशाचा नाश त्याने पाहिला.
दुसऱ्याचे हिंतचिंतक आहे असे दाखवून त्याच्याविरुद्ध कारस्थाने करणाऱ्या, किंवा चांगल्या गोष्टींमध्ये विघ्न निर्माण करणाऱ्या व्यक्तीला शकुनीमामा म्हटले जाऊ लागले.

राजकारण आणि शकुनीमामा

महाभारत कथांमध्ये शकुनीमामा ने राजकारण केलेच होते. आताच्या काळात बंड करणे, पक्ष फोडणे, पक्षांतर करणे अशा घटना घडल्यावर ‘शकुनीमामा’ची आठवण लोकांना येते. साधारणतः हुशार, कुशाग्र नेत्याला शकुनीमामा म्हटले जाते. कधीकधी जे पक्ष फुटण्यास कारण ठरतात त्यांना शकुनीमामा म्हटले जाते. आमदार नितेश राणे, खासदार अमोल कोल्हे, सुजय विखे यांनी शकुनीमामाचा उल्लेख केला आहे. या आधीही दिग्गज नेत्यांनी राजकीय गोष्टींसाठी शकुनीमामाचा उल्लेख केला आहे.

हेही वाचा : ‘वर्कआऊट’ न करणारे ‘प्रोटीन पावडर’ घेऊ शकतात का ?

शकुनीमामा हे महाभारतातील खलनायक असणारे व्यक्तिमत्त्व आजच्या राजकारणातही अनेकांना दिसून येत आहे.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is shakunimama why did shakunimama get a negative meaning vvk
Show comments