देशभरात राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची उत्सुकता वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २२ जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराचे लोकार्पण होईल. देशभरातून हजारो लोकांना या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. कारसेवक आणि त्यांचे कुटुंबीय, हजारो साधू-संत, सेलिब्रिटी, क्रीडापटू आणि महत्त्वाच्या व्यक्तींना निमंत्रण गेले आहे. असे असले तरी भारतातील चार मठांच्या (पीठ) चार शंकराचार्यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले आहे. त्याची कारणे त्यांच्याकडून देण्यात आली आहेत. हिंदू धर्मात शंकराचार्य यांचे पद महत्त्वाचे मानले जाते. तरी शंकराचार्य म्हणजे नेमके कोण? याबाबत सविस्तर जाणून घेऊ.
आद्य शंकराचार्यांनी सुरू केली परंपरा
हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार आद्य शंकराचार्यांनी (इ.स. ७८८ ते ८२०) मठांची आणि मठाधिपती किंवा मठाधीश परंपरेला सुरुवात केली. सामान्यांना आध्यात्मिक मार्गदर्शन मिळावे आणि धर्म जोपासला जावा यासाठी आद्य शंकराचार्यांनी भारताच्या चार दिशांना चार पीठांची स्थापना केली. आद्य शंकराचार्यांनंतर या चार मठाधिपतींना शंकराचार्य संबोधले जाऊ लागले. माजी पंतप्रधान पंडित नेहरूंनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथात लिहिले, “आद्य शंकराचार्यांनी नाना प्रकारच्या मतमतांतरांनी त्रस्त झालेल्या भारतीय लोकांत समन्वय साधून भारतीय मनाला भेदामध्ये अभेद पाहण्याची शिकवण दिली. आपल्या अद्वैत सिद्धांताद्वारे ही शिकवण भारतीयांच्या अंगी बाणवण्याचा त्यांनी महान प्रयत्न केला.”
हे वाचा >> विश्लेषण : अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेला शंकराचार्यांचा विरोध का? चारही शंकराचार्य अनुपस्थित राहणार?
मठ किंवा पीठ म्हणजे काय?
आद्य शंकराचार्य यांना ते केवळ ३२ वर्षांचे आयुष्य लाभले होते. या अल्पकाळात त्यांनी हजारो वर्षे प्रभाव टाकणारे धर्मकार्य केले. देशभर भ्रमंती करून शंकराचार्यांनी उत्तर दिशेला ज्योर्तिमठ (जोशीमठ, उत्तराखंड), पश्चिम दिशेला द्वारका (गुजरात), दक्षिणेस शृंगेरी (कर्नाटक) व पूर्वेस गोवर्धन (पुरी, ओडिशा) या चार मठांची स्थापना केली. या पीठांच्या प्रमुखांना शंकराचार्य हे पद प्राप्त झाले; तसेच चार मठांना एकेक वेद विभागून देण्यात आला आहे.
या चार मठांव्यतिरिक्त काशीचा सुमेर मठ तथा कांचीचे कामकोटी पीठ यांचीही त्यांनी स्थापना केली. कांचीच्या कामकोटी पीठाचे ते स्वत: पीठाधीश झाले, अशीही एक परंपरा दिसते. कामकोटीचा मठ हा चारही वेदांच्या अध्ययनाला वाहिलेला मठ आहे आणि आद्य शंकराचार्यांचे देहावसान येथेच झाले, असेही एक मत हिरिरीने मांडले जाते.
संस्कृतमध्ये पीठ या शब्दाला मठ, असेही म्हटले जाते. हा शब्द लोकांमध्ये अधिक प्रचलित आहे. मठाद्वारे धार्मिक ज्ञान देणे, धर्माचा प्रचार-प्रसार करणे, हिंदू धर्मातील वेद, उपनिषदे, गीता, भक्तिसूत्रे यांचा प्रचार करणे इत्यादी कार्ये या मठाकडून करण्यात येतात. भारतात चार दिशांना चार मठ आहेत. चार मठांमध्ये चार वेद विभागून देण्यात आले आहेत. त्या वेदांचा अभ्यास आणि प्रचार मठाद्वारे केला जातो.
आणखी वाचा >> चारही शंकराचार्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत; मात्र तिघांचा सोहळ्याला पाठिंबा
शंकराचार्यांची निवड कशी होते?
शंकराचार्य होण्यासाठी संबंधित व्यक्तीने संसाराचा त्याग केलेला असावा लागतो. त्याला संस्कृत, चारही वेद, पुराण व धर्मग्रंथ यांचे ज्ञान असणे आवश्यक असते. त्याने मुंडन, पिंडदान करण्यासह रुद्राक्ष घालणे महत्त्वाचे मानले जाते. शंकराचार्य होण्यासाठी चारही वेदांचा अभ्यास आणि जानवे परिधान केलेले असणे आवश्यक आहे. ज्यांना शंकराचार्य हे पद दिले जाते, त्यांना महामंडलेश्वर, प्रतिष्ठित संतांच्या सभा आणि काशी विद्वत परिषदेची स्वीकृती मिळणे आवश्यक असते. त्यानंतर शंकराचार्य ही पदवी बहाल केली जाते.
आद्य शंकराचार्यांनी मठाधिपतींना काही विशेष नियम सांगितले आहेत. “सर्व पीठाधीशांनी आपली कार्ये पार पाडताना वृत्ती नि:स्पृह ठेवावी. इतरांच्या कार्यात ढवळाढवळ करू नये. वृत्ती सदैव क्षमाशील ठेवावी. ऐतिहासिक घटनांना मार्गदर्शक तत्त्व समजून व्यवहारांत शास्त्राधारे सुलभता आणण्याचा प्रयत्न करावा. दर कुंभमेळ्याच्या निमित्ताने एकत्र येऊन विचारांची देवाण-घेवाण करा”, अशी माहिती जगद्गुरू श्रीमद आद्य शंकराचार्य या छोटेखानी पुस्तिकेत लेखक अविनाश नगरकर यांनी दिली आहे.
सध्या चार शंकाराचार्य कोण आहेत?
बद्रीनाथ ज्योतिर्मठ (अथर्ववेद)– शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
शृंगेरी शारदा पीठ (यजुर्वेद)– शंकराचार्य स्वामी भारतीकृष्ण तीर्थ
द्वाराका पीठ (सामवेद)– शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती
पुरी गोवर्धन पीठ (ऋग्वेद)– शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती