नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेच नाव देण्यावर सरकार ठाम असतानाच या विमानतळाला रायगडमधील लोकप्रिय नेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्याची कृती समितीची मागणी कायम आहे. याच मागणीसाठी आजपासून मानवी साखळी करुन आंदोलन करण्यात आलं. पनवेल- बेलापूर,नवी मुंबई, दिघा, ठाणे आदी ठिकाणी हे मानवी साखळी आंदोलन सुरु करण्यात आलं आहे. राज्य सरकारने या विमानतळाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्याचा निर्णय घेतला असला तरी या विमानतळाचा दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यावर स्थानिक ठाम आहेत. मात्र बाळासाहेबांऐवजी ज्या दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी स्थानिक आंदोलन करत आहेत ते दि. बा. पाटील नक्की आहेत तरी कोण हे अनेकांना ठाऊक नाही. सध्या मुंबई विमानतळाच्या नामकरणाच्या विषयामुळे चर्चेत असणाऱ्या दि. बा. पाटील यांचा जीवनप्रवास सांगणारा हा विशेष लेख…

बालपण आणि शिक्षण

The Chief Minister dt. Met di Ba.Patil family in Panvel
मुख्यमंत्र्यांनी दि. बा .पाटील कुटूंबियांची पनवेलमध्ये भेट घेतली
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Iqbal Singh Chahal
मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांना पदावरून हटवले, बदली रोखण्याची राज्य सरकारची मागणी फेटाळली
Candidates struggle to get their name on the ballot paper in Nashik
नाशिकमध्ये मतपत्रिकेत नाव वरती येण्यासाठी उमेदवारांची धडपड
election 2024 fun of election symbols
निवडणूक चिन्हांची गंमत, अशीही व अशी ही चिन्हे…
Loksabha Election 2024 Last 72 hours most crucial during elections
मतदानापूर्वीचे ३ दिवस का महत्त्वाचे असतात? काय असते प्रक्रिया?

रायगड जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांचे अध्वर्यू अशी दि. बा. पाटील यांची ओळख सांगितली जाते. माजी खासदार, आमदार व पनवेल नगराध्यक्ष दिनकर बाळू पाटील हे रायगड जिल्ह्यासहीत संपूर्ण महाराष्ट्राला दि.बा. पाटील नावाने परिचित आहेत. दि. बा. हे महाराष्ट्रातील उत्तर कोकणातल्या शेतकरी कामकरी पक्षाचे नेते होते. त्यांच्या आईचं नाव माधूबाई तर वडीलांचं नाव बाळू गौरू पाटील होतं. ‘दिबां’चे वडील शेतकरी आणि शिक्षक होते. ‘दिबां’चा जन्म जासई गावामध्ये १३ जानेवारी १९२६ रोजी झाला.

‘दिबां’च्या वडिलांचा जासई गाव आणि आजूबाजूच्या गावांत शिक्षणाचे महत्त्व प्रस्थापित करण्यात मोठा वाटा होता. वडील शिक्षण प्रसाराचे काम करत असूनही दि. बा. पाटील यांचे शिक्षण अतिशय खडतर परिस्थितीत झाले. पुण्यामध्ये त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले. त्यांचे बंधू आत्माराम बाळू पाटील यांनी देखील ‘दिबां’च्या शिक्षणासाठी मोठा हातभार लावला. दि. बा. पाटील यांच्या पत्नी ऊर्मिला या पनवेल येथील के. व्ही. कन्या विद्यालयात शिक्षिका होत्या.

नक्की पाहा >> Photos: नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांऐवजी दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर

शेतकरी-कष्टकऱ्यांसाठी सारे आयुष्य झिजवले…

दि. बा. पाटील हे पनवेल पालिकेचे नगराध्यक्ष, महाराष्ट्राचे पनवेल-उरण विधानसभा मतदारसंघाचे चार वेळा आमदार, महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि रायगडचे दोन वेळा खासदार होते. सिडको (सिटी इंडस्ट्रियल डेव्हलपमेन्ट काॅर्पोरेशन) ही सरकारी संस्था त्यावेळी नवी मुंबईची बांधणी करत होती. त्या काळात दि. बा. पाटलांनी नवी मुंबई सिडको आणि जेएनपीटी (न्हावा शेवा बंदर) प्रकल्पग्रस्त जनतेचे खंबीर नेतृत्व केले. शेतकरी-कष्टकऱ्यांसाठी सारे आयुष्य झिजवले. पोलिसांचा लाठीमार सहन केला, तसेच कारावासही पत्करला. साधी राहणी, उच्च विचारसरणी असणाऱ्या या नेत्याच्या एका हाकेला हजारो, लाखोंच्या संख्येने ओ देणारे कार्यकर्ते होते.

‘दिबा’ उभे राहिले म्हणजे…

दि. बा. पाटलांची विधिमंडळातील अभ्यासपूर्ण भाषणे गाजली. ‘दिबा’ उभे राहिले म्हणजे सत्ताधारी पक्षांच्या गोटात शांतता पसरत असे. करारी आवाज आणि मुद्देसूद बोलणे हे त्यांच्या विरोधकांमध्ये त्यावेळी घबराहट पसरवी. शेतकरी कामकरी पक्षाला दि. बा. पाटील यांनी मोठे केले होते. जोपर्यंत पाटील शेतकरी कामकरी पक्षात होते, तोपर्यंत शेतकरी कामकरी पक्ष हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रमुख राजकीय विरोधी पक्ष होता. पण त्यांच्यानंतर रायगड जिल्हा सोडता या पक्षाचे अस्तित्व महाराष्ट्रात इतरत्र कुठेही जाणवत नाही.

जास्त भाव मिळवून दिला…

आज सिडकोने नवी मुंबई पूर्णपणे व्यापली आहे. याच नवी मुंबईसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या जात असताना त्या दहा-वीस हजार रुपये एकरी भावाने घेतल्या जाणार होत्या. महाराष्ट्रात स्वातंत्र्याच्या चळवळीत अष्टी किंवा चिरनेर येथे जे जोरदार लढे झाले त्या लढ्यासारखाच सिडकोविरोधातला शेतकऱ्यांच्या हिताचा लढा दि. बा. यांनी लढवला. जासई येथील लढाईत पाच शेतकरी मारले गेले, शंभर जखमी झाले. पोलिसांच्या गोळीबाराचा सामना करून शेतकऱ्यांनी ही लढाई जिंकली आणि सरकारकडून सिडको परिसरातील जमिनीचा जास्तीत जास्त भाव मिळवला. २०१२ साली अखेरचा लढा देत जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांच्या साडेबारा टक्के भूखंडाची मागणी सरकारकडून मान्य करून घेतली. रायगड आणि नवी मुंबईतील भूमीपूत्र असलेल्या आगरी जनतेबरोबर त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. ते शेवटपर्यंत कष्टकऱ्यांसाठी लढले.

शेतकरी आंदोलनात काय घडलं?

१६ आणि १७ जानेवारी १९८४ साली ‘दिबां’च्या नेतृत्वाखाली शेतकरी आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. याच दिवशी सध्या जेएनपीटी बंदरासाठी विस्थापित करण्यात आलेल्या नवीन शेवा गावात पोलिसांनी शेतकऱ्यांवर पहिला गोळीबार केला होता. त्यानंतर पेटलेल्या या आंदोलनाने उग्र रूप धारण केल्याने १६ जानेवारी रोजी दास्तान फाटा येथे झालेल्या आंदोलनात दोन शेतकऱ्यांनी हौतात्म्य पत्करले तर दुसऱ्या दिवशी १७ जानेवारी रोजी नवघर फाटा येथे झालेल्या गोळीबारात तीन शेतकऱ्यांनी आपले आत्मबलिदान केले होते.



शिवसेनेत प्रवेश

दि. बा. पाटील पुढे शेतकरी कामगार पक्षातून बाहेर पडले आणि १६ ऑगस्ट १९९९ रोजी शिवसेना पक्षात आले. मात्र, नंतर ते सक्रिय राजकारणातून निवृत्त झाले.

मृत्यू…

२५ जून २०१३ रोजी हृदयविकाराने ‘दिबां’चे निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्यामागे दोन मुले, दोन मुली, स्नुषा, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. पनवेल येथील अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आलेले. त्यांच्या अंत्यस्कारासाठी रायगड जिल्ह्य़ाचे तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे, आमदार विवेक पाटील, प्रशांत ठाकूर, माजी मंत्री रवीशेठ पाटील, जगन्नाथ पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर उपस्थित होते.

अंत्ययात्रेत हजारोच्या संख्येने गर्दी

मागील काही वर्षांपासून ‘दिबां’ना श्वसनाचा तसेच छातीतील कफाचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांच्यावर जवळच्या पॅरामाऊन्ट रुग्णालयात उपचार सुरू होते. येथेच उपचारादरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला व त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचा मृतदेह आधी त्यांच्या पनवेल येथील (संग्राम) घरी नेण्यात आलेला. रायगडमधील सर्वपक्षीय नेत्यांनाही ‘दिबां’च्या अंत्यदर्शनासाठी उपस्थित लावली होती. त्यानंतर त्यांचे पार्थिव दुपारी उरण-पनवेल आगरी समाजाच्या महात्मा फुले सभागृहात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठा जनसमुदाय लोटला होता. ठाणे जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री गणेश नाईक, महापौर सागर नाईक, आमदार संदीप नाईक यांनी या वेळी अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर महात्मा फुले सभागृह ते अमरधाम स्मशानभूमीपर्यंत त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. या अंत्ययात्रेत हजारोच्या संख्येने ‘दिबा’ समर्थक आणि स्थानिक सहभागी झालेले.

रायगड जिल्ह्यातील, नवी मुंबईमधील शेतकरी-कष्टकऱ्यांसाठी सारे आयुष्य झिजवणाऱ्या दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबईत होणाऱ्या विमानतळाची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

(संदर्भ : लोकसत्ताच्या बातम्या आणि विकिपिडीयावरुन साभार)

Story img Loader