मुंबई-पुणे दरम्यान रेल्वेने दररोजचा प्रवास करणाऱ्या नोकरदार आणि व्यावसायिकांच्या लाडक्या ‘डेक्कन क्वीन’ला गेल्याच वर्षी ९३ वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्ताने जंगी सेलिब्रेशनही भारतीय रेल्वेकडून करण्यात आलं होतं. १ जून १९३० रोजी सुरू झालेला ‘डेक्कन क्वीन’चा प्रवास आजही अव्याहतपणे सुरू असून मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची ती आजही पहिली पसंती आहे.
इतकंच नव्हे तर या गाडीची लिम्का बुकमध्येही नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे तिला ‘आयएसओ’ हे गुणवत्तेचे प्रमाणपत्रही मिळाले आहे. एवढी उत्तम आणि सुपरफास्ट गाडी असून बऱ्याच लोकांना या गाडीचा आनंद घेता येत नाही त्यामागील कारण काही वेगळेच आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि दादर ही दोन स्थानकं वगळता या गाडीला थांबे देण्यात आले नसल्याने मधल्या लोकांना या गाडीचा आनंद घेताच येत नाही. ठाणे आणि खासकरून कल्याणला डेक्कन क्वीन थांबत नाही. रेल्वे संघटनांची आंदोलनं, पत्रव्यवहार आणि कित्येक मागण्या करूनही ही गाडी कल्याणला थांबत नाही, यामागचं नेमकं कारण आणि रेल्वेची भूमिका आपण जाणून घेऊयात.
आणखी वाचा : भारतीय रेल्वेच्या तिकिटावर तुम्हालाही मिळू शकते ५० ते ७५ टक्के सूट! निवांत झोपून प्रवासासाठी ‘हा’ तक्ता पाहा
पाहायला गेलं तर मुंबईला भारताच्या उत्तर आणि दक्षिण भागाला जोडणारे कल्याण हे अत्यंत महत्त्वाचे स्थानक आहे. शिवाय इथली प्रवासी संख्यादेखील अधिक आहे. कल्याण स्थानकात लांब पल्ल्याच्या आणि उपनगरीय मिळून अशा तब्बल ९०० गाड्या थांबतात. डेक्कन क्वीनची सुरुवात झाल्यावर ती गाडी कल्याण नगरपालिकेच्या हद्दीतून धावते यासाठी नगरपालिकेला एक विशिष्ट कर रेल्वेकडून दिला जात असे, पण काही वर्षं रेल्वेने हा कर थकवला आणि यामुळेच नगरपालिकेने रेल्वेविरुद्ध कोर्टात केस केली.
कोर्टाने नगरपालिकेच्या बाजूने निकाल दिला आणि त्यानंतर नगरपालिकेने डेक्कन क्वीनचे इंजिनच जप्त केले. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी तो थकलेला कर दुसऱ्या दिवशी भरून नगरपालिकेच्या ताब्यातून डेक्कन क्वीनचे इंजिन परत मिळवले. आपला झालेला आपमान हा रेल्वेच्या चांगलाच जिव्हारी लागला अन् डेक्कन क्वीन कधीच कल्याणला थांबणार नाही असा निर्णय घेतला गेला. या प्रकरणात कोर्टात नगरपालिकेची बाजू डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडली असल्याचं म्हंटलं जातं.
सध्याच्या काळात डेक्कन क्वीन मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मधून सुटल्यावर थेट कर्जतला थांबते, त्यानंतर फक्त लोणावळा आणि नंतर थेट पुणे असे या गाडीला थांबे देण्यात आले आहेत. डेक्कन क्वीनला सुपरफास्ट गाडीचा दर्जा देण्यात आला आहे. जर या गाडीचे थांबे वाढवले तर सुपरफास्ट हा दर्जा गाडीला देण्यात काहीच अर्थ नाही या गोष्टीचा विचार करूनच या गाडीला नवीन थांबे नाकारले जात आहेत. मुंबई-पुणे या दोन शहरांदरम्यान भरपूर गाड्या धावत असल्या तरी डेक्कन क्वीनचं यात विशेष स्थान आहे हे नाकारून चालणार नाही.