कोरोना काळात बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये मृतदेह नदीत तरंगतानाचे ह्रदयद्रावक फोटो, व्हिडीओ अनेकांनी पाहिले असतील. यानंतर अनेक मृतदेह अशाप्रकारे नदीच्या पाण्यावर तरंगत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. पण तुम्ही कधी विचार केला का की, जिवंत माणूस जेव्हा पाण्यात उडी मारतो तेव्हा तो बुडतो, पण मृत शरीर मात्र पाण्यावर सहज कसे तरंगत राहते.
एखाद्या व्यक्तीला नदीत, समुद्रात पोहायला येत नसेल तर त्या व्यक्तीने कितीही प्रयत्न केले तरी तो स्वत:ला पाण्यात बुडण्यापासून वाचवू शकत नाही. पण त्याच जागी जर एखादा मृतदेह असेल तर तो कोणत्याही प्रयत्नाशिवाय किती वेळही पाण्यावर सहज तरंगत राहतो. जिवंत व्यक्ती पाण्यात बुडतो पण मृतदेह पाण्यावर तरंगतो असे नेमके कशामुळे होत असावे जाणून घेऊया…
घनतेशी याचा काय संबंध आहे?
वस्तुत: एखादी वस्तू पाण्यावर तरंगते हे त्या वस्तूची घनता आणि ती वस्तू दूर सारलेल्या पाण्यावर अवलंबून असते. ज्या वस्तूची घनता जास्त असेल ती वस्तू पाण्यात बुडते. पण ज्या वस्तूची घनता पाण्यापेक्षा कमी असते ती वस्तू पाण्यावर सहज तरंगत राहते. त्यामुळे जेव्हा एखादी जिवंत व्यक्ती पाण्यात पडते किंवा उडी मारते तेव्हा मानवी शरीराची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त असल्याने ती पाण्यात बुडते. बुडल्यानंतर त्या व्यक्तीच्या फुफ्फुसात पाणी शिरते आणि तिचा मृत्यू होतो. पण एखाद्या व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर त्या व्यक्तीचे शरीर लगेच पाण्यात वरच्या दिशेने येत नाही, तर ते पाण्याच्या अगदी तळापर्यंत जाता येईल तितके जाते.
आर्किमिडीजच्या सिद्धांतानुसार, जेव्हा एखादी वस्तू आपल्या वजना इतके पाणी दूर करू शकत नाही, तेव्हा ती वस्तू पाण्यात बुडते. त्या वस्तूने विस्थापित केलेल्या पाण्याचे वजन जर कमी असेल तर ती वस्तू पाण्यावर तरंगते.
एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या शरीरात गॅस तयार होण्यास सुरुवात होते, ज्यामुळे शरीर फुगते. फुगलेल्या शरीराचा आकारामान वाढत जातो आणि शरीराची घनता कमी होते. यामुळे मृतदेह पाण्यावर तरंगत राहतो.
माणूस मेल्यानंतर त्याच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीचे काम करणे थांबते. यामुळे शरीराचे विघटन होऊ लागते. यानंतर मृत शरीरातील वेगवेगळे बॅक्टेरिया हे पेशी आणि ऊती नष्ट करण्यास सुरुवात करतात. या बॅक्टेरियांमुळे शरीरात मिथेन, अमोनिया, कार्बन डाय ऑक्साईड, हायड्रोजन असे विविध वायू तयार होऊ लागतात आणि ते शरीराच्या बाहेर पडतात. यामुळे शरीर पाण्यावर तरंगत राहते.
केवळ मृतदेहचं नाहीतर…
पाण्यावर अनेक गोष्टी सहज तरंगताना आपण पाहतो. यात लाकूड, कागद, पान, बर्फ अशा गोष्टी कधी पाण्यात बुडत नाही. यासाठी एक सोप्पा वैज्ञानिक नियम आहे तो म्हणजे, जड वस्तू पाण्यात सहज बुडते आणि हलकी वस्तू ही पाण्यावर तरंगत राहते.