पु. ल. देशपांडे यांनी त्यांच्या भाषणात एकदा म्हटले होते की, निम्म्या महाराष्ट्र जूनमध्ये जन्मास आला आहे. हे एका अर्थी खरे आहे. कारण, साधारण पन्नाशी ओलांडलेल्या बऱ्याच जणांचे वाढदिवस हे १ जूनला असतात. या मागचे कारण आणि १ जूनला घडलेल्या महत्त्वाच्या घटना जाणून घेणे उचित ठरेल.
बऱ्याच जणांचे वाढदिवस १ जूनला असण्याचे सर्वसाधारण कारण हे शाळेचे शिक्षक मानले जाते. साधारण १९८० पर्यंत भारतातील लोकांमध्ये मुलांच्या जन्माविषयी फारशी जागरूकता नव्हती. बऱ्याच जणांचे जन्मदेखील दवाखान्यातसुद्धा होत नसत. त्यामुळे मुलांच्या जन्माची नोंद नसे.
स्वातंत्र्यानंतर शिक्षणाविषयी भारतामध्ये जागृती निर्माण झाली. बरीच मुले शाळेत शिकायला जाऊ लागली. परंतु, शाळेत जन्मतारखेची नोंद करणे आवश्यक होते. तेव्हा मुलांच्या आईवडिलांना जन्मतारीख माहीत नव्हती. मग शाळेच्या शिक्षकांनी अशा मुलांची जन्मतारखी १ जून अशी नोंदवली. वडिलांची फिरतीची नोकरी, बदली अशा काही कारणांनी घरातील दस्तावेज गहाळ होत. त्या काळात घरात मुलांची असणारी अधिक संख्या आणि आईवडिलांच्या शिक्षणाचा अभाव यामुळे शाळेतील शिक्षकांनी मुलांची जन्मतारीख १ जून ठरवली.
हेही वाचा : ‘द केरला स्टोरी’मधील ‘त्या’ वाक्याला आहेत धार्मिक आधार; काय सांगतात प्रत्येक धर्मातील प्रथा
शाळा १० ते १५ जूनला सुरु होतात. शाळेत प्रवेश घेताना १ जूनपर्यंतचे वय गृहीत धरले जाते. उदा. १ जूनपर्यंत वयवर्षे ६ पूर्ण असतील तर ते मूल इयत्ता पहिलीला जाई. त्यामुळे अन्य कोणती तारीख न घेता शाळेतील शिक्षकांनी १ जून ही सर्वांना सोयीस्कर अशी तारीख निवडली.
१ जून रोजी वाढदिवस असणारी मंडळी
शिक्षकांनी ठरवून दिलेला १ जून हा वाढदिवस असला, तरी काही लोकांचा खरोखर वाढदिवस १ जूनला असतो. यामध्ये सुप्रसिध्द अभिनेत्री नर्गिस दत्त, समाजसेवक बाबा आढाव, शेतकरी नेते राजू शेट्टी, मंत्री दिलीप कांबळे, सिनेअभिनेता आर. माधवन, कवी बी, आमदार दत्ता भरणे,मर्लिन मनरो, मॉर्गन फ्रीमन आणि अँडी ग्रिफिथ यांचा वाढदिवस १ जून रोजी असतो.
हेही वाचा : गोवा राज्य का साजरे करते दोन राज्य दिन ? गोवा मुक्ती दिन आणि गोवा स्थापना दिन यांचा काय आहे इतिहास
१ जून रोजी महाराष्ट्रात घडलेलया दोन महत्त्वाच्या घटना
महाराष्ट्राची जीवनवाहिनी असणारी लालपरी पहिल्यांदा १ जून रोजी धावली. तसेच मुंबई आणि पुण्याला जोडणारी रेल्वे ‘दख्खनची राणी’ (डेक्कन क्वीन) पहिल्यांदा १ जून रोजी धावली.
१ जून हा या प्रकारे ‘राष्ट्रीय वाढदिवस दिन’, ‘सरकारी वाढदिवस’, ‘बड्डे डे’ म्हणून साजरा केला जातो.