आपल्यापैकी प्रत्येकजण आजारी पडल्यावर डॉक्टरांकडे जातो. डॉक्टरांकडे गेल्यानंतर आपणाला ते हमखास औषधे देतात. तर त्यांनी दिलेली अनेक औषधे खूप रंगीबेरंगी असतात. पॅरासिटामॉल वगळता, इतर औषधे वेगवेगळ्या रंगांची असतात. शिवाय औषधांमध्ये कॅप्सूल असेल तर ते दोन रंगांमध्ये उपलब्ध असतात. पण आपणाला दिली जाणारी औषधे विविध रंगांची का असतात? त्यांच्या रंगांचा रोगाशी काही संबंध असतो का? मेडिकल सायन्समध्ये औषधांचा रंग काही विशेष कोड म्हणून वापरला जातो का? असे अनेक प्रश्न तुमच्याही मनात येत असतील तर आज आम्ही तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहोत.
रंगीत औषधे बनवायला कधी सुरुवात झाली?
इंटरनेटवर उपलब्ध माहितीनुसार, रंगीत औषधे बनवण्याचे काम सर्वात पहिल्यांदा १९६० च्या दशकात सुरू झाले. पूर्वी बहुतेक औषधे पांढर्या रंगाची असायची. अहवालानुसार, आता कॅप्सूल तयार करण्यासाठी ७५ हजारांहून अधिक रंगांचे कॉन्बिनेशन वापरले जाते, तर कोटिंग टॅब्लेटसाठी अनेक वेगवेगळे रंगही वापरले जातात.
पण ही औषधे रंगीबेरंगी का बनवली जातात? हा प्रश्न अनेकांना पडतो. यावर तज्ञांचे असे मत आहे की, कंपन्यांनी औषधे रंगीत करण्याचा निर्णय घेतला कारण, लोकांना औषधांची नावे वाचून त्यामधील फरक ओळखता येत नाही, मात्र, ते औषधांच्या रंगावरून त्यांना त्यामधील फरक सहज जाणवतो आणि ते ती वेगळी करू शकतात. जर तुमच्या घरात कोणी वयस्कर लोक असतील ज्यांना वेगवेगळ्या प्रकारची औषधे सुरु आहेत, तर तुम्हाला समजेल की ते औषधे नावावरुन नव्हे तर रंगावरून ओळखतात आणि ती डॉक्टरांनी सांगितलेल्या वेळेनुसार बरोबर खातात. शिवाय रंग लहान मुलांना आकर्षित करतात, त्यामुळे अनेक वेळा लहान मुले रंगीबेरंगी औषधे खाण्यास तयार होतात.
गोळ्या आणि कॅप्सूल –
हेही वाचा- लिफ्टच्या आतमध्ये आरसा चेहरा पाहण्यासाठी नसतो तर…; कारण जाणून तुम्हीही व्हाल थक्क
माणसांनी जेव्हा विविध शोध लावले आणि आपली वाटचाल आधुनिकतेच्या दिशेने केली, तेव्हा त्याने अनेक गोष्टींसह विविध औषधी वनस्पती आणि औषधांचा शोध लावला. पण ही औषधे गोळ्या आणि कॅप्सूलच्या स्वरूपात नव्हती. गोळ्यांच्या स्वरूपात औषधांचा वापर प्रथम इजिप्शियन संस्कृतीच्या काळात सुरू झाला. त्या काळात चिकणमाती किंवा भाकरीमध्ये मिसळून औषधे बनवली जात होती. २० व्या शतकापर्यंत, औषधे आधुनिकपणे पांढऱ्या रंगामध्ये तयार केली गेली. हळूहळू माणसाने उच्च तंत्रज्ञान विकसित केले, तेव्हा औषधांच्या निर्मितीमध्ये बदल झाले आणि १९७५ च्या सुमारास सॉफ्टजेल कॅप्सूल तयार होऊ लागले. आज आपल्याकडे वेगवेगळ्या चमकदार रंगांमध्ये एकापेक्षा जास्त औषधे उपलब्ध आहेत.
औषधाच्या रंगाचा रोगाशी काही सबंध आहे का?
अमेरिकेत झालेल्या एका संशोधनात असे आढळून आले आहे की, आजारांचा औषधांच्या रंगाशीही थोडाफार संबंध असतो. कारण अमेरिकेतील बहुतांश रुग्णांना चांगली झोप येण्यासाठी हलक्या निळ्या रंगाची औषधे दिली जातात, तर एखाद्या रुग्णाला त्याच्या आजारातून लवकर आराम हवा असल्यास त्याला लाल रंगाची औषधे दिली जातात. औषधांचा रंगही चव आणि वासाच्या आधारे ठरवला जातो.