BlackBuck and Bishnoi Community Relation: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पावर) पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर बिश्नोई गँग, त्याचा म्होरक्या लॉरेन्स बिश्नोई, सलमान खान आणि काळवीट प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. १९९८ साली सलमान खानने राजस्थानमध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान काळवीटाची शिकार केली होती. तेव्हापासून तो या प्रकरणात वारंवार अडचणीत येत आहे. कायदेशीर कारवाईतून निर्दोष सुटल्यानंतर सलमान खानच्या पाठी बिश्नोई गँगचा ससेमिरा लागला आहे. ज्या काळवीटाच्या शिकारीमुळे हे सर्व सुरू झाले, ते काळवीट बिश्नोई समाजासाठी पवित्र मानले जाते. बिश्नोई समाज आणि काळवीट यांचे नाते काय? हे जाणून घेऊ.
‘हम साथ साथ है’, या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान काळवीट शिकार प्रकरण घडल्याचे सांगितले जाते. यानंतर बिश्नोई समाजाच्या वतीने सलमान खानच्या विरोधात आंदोलनही करण्यात आले होते. १९९८ रोजी लॉरेन्स बिश्नोई अवघ्या पाच वर्षांचा होता. मात्र मोठा झाल्यानंतर त्याने काळवीट शिकार प्रकरणाचा सूड उगविण्याचा निर्धार केला, असे त्यानेच अनेकदा सांगितले आहे. दरम्यान लॉरेन्स बिश्नोईचा सलमान खानवरील राग हा काळवीट प्रकरणाचा आहे की, तो स्वतःची प्रतिमा बनविण्याचा प्रयत्न करतोय? याबद्दल प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हे वाचा >> Lawrence Bishnoi : लॉरेन्स बिष्णोई सलमान खानच्या मागे हात धुवून का लागलाय? वाचा २६ वर्षांचा घटनाक्रम
फक्त काळवीटच नाही तर चिंकाराही बिश्नोई समाजासाठी पवित्र असल्याचे मानले जाते. या दोन्ही प्राण्यांचे शिकाऱ्यांपासून संरक्षण करण्याचा प्रयत्न समाजाकडून केला जातो. मागच्या ५०० ते ५५० वर्षांपासून बिश्नोई समाज आणि या प्राण्यात बंध असल्याचे बोलले जाते.
बिश्नोई समाजासाठी काळवीट पवित्र का?
बिष्णोई समाजाचा इतिहास अगदी १५ व्या शतकापासून उपलब्ध आहे. सध्याच्या राजस्थानमधील जोधपूर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये मागील काही शतकांपासून हा समाज राहतो. या समाजामधील लोक निसर्गाला देव मानतात. अगदी पानं, फुलं, झाडांपासून प्राण्यांपर्यंत अनेक गोष्टींच्या संवर्धनासाठी ते प्रयत्नशील असतात. त्यातही काळवीटाला त्यांच्याकडे फार महत्व आहे. याचं मुख्य कारण म्हणजे काळवीट हे त्यांच्या धर्मातील गुरु जांम्बेश्वर किंवा जांभाजी यांचं रुप असल्याचं मानलं जातं. त्यामुळेच काळवीटांना त्रास देणं किंवा त्यांची हत्या करणं हा या समाजाच्या दृष्टीने सर्वात मोठा गुन्हा आहे.
हे ही वाचा >> …तर सलमान खानला माफ करणार, बिश्नोई समाजाच्या नेत्याचं मोठं विधान; सोमी अलीच्या ‘त्या’ विधानावर दिली प्रतिक्रिया
बिश्नोई समाजाच्या वतीनेच सलमानविरोधात पहिल्यांदा या शिकार प्रकरणात तक्रार दाखल करण्यात आलेली. त्यानंतर सरकारी पक्ष या प्रकरणात बाजू मांडत होता.
गुरु जांम्बेश्वर किंवा जंम्बाजी हे या समाजाचे आद्यगुरु मानले जातात. काहीजण बिष्णोई हा शब्द विष्णू शब्दावरुन आल्याचं सांगतात. तर काहीजण हा शब्द राजस्थानमधील स्थानिक भाषेनुसार बिश म्हणजेच वीस आणि नोई म्हणजेच नऊ यावरुन आल्याचं सांगतात. गुरु जांम्बेश्वरांनी सांगितलेल्या २९ नियमांचं पालन करणारा समाज म्हणून या समाजाचं नाव बिष्णोई असं असल्याची एक मान्यता आहे. प्राण्यांच्या संवर्धानासाठी या समाजातील लोक अगदी स्वत:चा जीवही पणाला लावू शकतात.
आणखी वाचा >> “तुम्ही काळवीटाची शिकार करून त्याला शिजवून खाल्लं…”, भाजपा नेत्याची पोस्ट; सलमान खानला माफी मागण्याचा दिला सल्ला
काळवीट शिकार प्रकरणाचा घटनाक्रम
२ ऑक्टोबर १९९८ – वनविभागाकडून तक्रार दाखल करण्यात आली. एकूण ७ आरोपी – सलमान, सैफ, सोनाली बेंद्रे, नीलम, तब्बू, दुष्यंत सिंग आणि दिनेश गावरे.
९ नोव्हेंबर २००० – न्यायालयाने तक्रारीची दखल घेतली.
१९ फेब्रुवारी २००६ – आरोपींविरोधात आरोप निश्चित करण्यात आले.
२३ मार्च २०१३ – ट्रायल कोर्टाने सुधारणा आरोप निश्चित केले.
२३ मे २०१३ – मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात सुनावणीला सुरुवात फिर्यादी पक्षाने २८ साक्षीदारांची साक्ष नोंदवली.
१३ जानेवारी २०१७ – साक्षीदारांची साक्ष नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण.
२७ जानेवारी २०१७ – जबाब नोंदवण्यासाठी सर्व आरोपी न्यायालयात हजर झाले.
१३ सप्टेंबर २०१७ – फिर्यादी पक्षाकडून अखेरच्या युक्तिवादाला सुरुवात.
२८ ऑक्टोबर २०१७ – बचावपक्षाकडून अखेरच्या युक्तिवादाला सुरुवात.
२४ मार्च २०१८ – ट्रायल कोर्टातील युक्तिवाद संपला.
२८ मार्च २०१८ – ट्रायल कोर्टाने निर्णय राखून ठेवला.
५ एप्रिल २०१८ – सलमान खान दोषी, इतरांची निर्दोष मुक्तता.
११ फेब्रुवारी २०२१ – सलमानने खोटं प्रतिज्ञापत्र दिल्याचा राजस्थान सरकारची याचिका न्यायालयाने फेटाळली.
२१ मार्च २०२२ – सर्व खटल्यांची एकत्र सुनावणी करण्याचे राजस्थान उच्च न्यायालयाचे निर्देश.