Boarding on Plane: विमानाने प्रवास करण्यासाठी काही विशिष्ट नियम पाळावे लागतात. प्रवाश्यांनी या नियमांचे पालन न केल्यास त्यांना दंड भरावा लागू शकतो. फ्लाइटमध्ये चढण्यापूर्वी आणि चढल्यानंतर प्रवाश्यांना वेगवेगळ्या नियमांचे पालन करावे लागते. बऱ्याच प्रवाश्यांना या नियमांचे मूळ कारण ठाऊक नसते. फ्लाइट बोर्डिंग म्हणजेच विमानामध्ये प्रवेश करण्याबाबतचा एक नियम आहे.
प्रत्येक विमानामध्ये पुढच्या आणि मागच्या बाजूला प्रवेशद्वार असते. या दोन्ही बाजूंनी फ्लाइटमध्ये बोर्डिंग करता येत असले तरीही विमानामध्ये चढण्यासाठी कॉकपिटजवळ असणाऱ्या प्रवेशद्वाराचा वापर प्रामुख्याने केला जातो. मागच्या बाजूने विमानात प्रवेश करण्यास मनाई असते. पुढच्या बाजूने प्रवेश करणे सोपे असते. यामुळे प्रवाश्यांना व्यवस्थितपणे आपापल्या जागा शोधून त्यावर बसता येते. मागून प्रवेश केल्याने विमानातील गॅलरीमध्ये जास्त प्रवासी जमा झाल्याने गर्दी होऊन सर्वांची गैरसोय होऊ शकते. हा गोंधळ टाळण्यासाठी पुढच्या मार्गाने बोर्डिंग केले जाते असे विमान कंपन्यांचे मत आहे. तर विमानाच्या मागच्या भागात गर्दी झाल्याने त्याचे संतुलन बिघडू शकते असे काहींना वाटते.
फ्लाइट बोर्डिंगमुळे विमानांचे वेळापत्रक बदलू शकते का?
प्रवाश्यांना विमानामध्ये कमीत कमी कालावधीमध्ये आणि प्रभावी पद्धतीने प्रवेश करता यावा यावर प्रत्येक विमान कंपनी लक्ष देत असते. बोर्डिंग करताना उशीर झाल्याने ते विमान उशिराने टेक ऑफ करेल. त्यामुळे इतर विमानांच्या वेळापत्रकावरही परिणाम होईल. प्रवासी विमानात चढल्यावर ओव्हरहेड बिनमध्ये सामान ठेवतानाही फार वेळ लावतात. काही वेळेस यामुळे गॅलरीमध्ये गर्दी होते. परिणामी अन्य प्रवाश्यांना त्यांच्या जागेवर बसायला उशीर होतो. हा त्रास झाल्याने विमानाला टेक ऑफ करायला वेळ लागू शकते. मागच्या बाजूने बोर्डिंग केल्यास अधिकच्या समस्या उद्भवू शकतात.
विमानाच्या मागच्या प्रवेशद्वारातून बोर्डिंग करणे त्रासदायक आहे का?
विमानांच्या विशिष्ट मॉडलनुसार, बॅक-टू-फ्रंट बोर्डिंग त्रासदायक असते असे म्हटले जाते. प्रवाश्यांना जागेवर बसण्याआधी त्यांचे सामान ओव्हरहेड बिनमध्ये ठेवायचे असते. ही बिन आकाराने छोटी असल्याने त्यात फारसे सामान राहू शकत नाही. ओव्हरहेड बिनची जागा भरल्यास प्रवासी सामान मागच्या बाजूला ठेवायला जातात.अशा वेळी ते मागच्या बाजूने प्रवास करत असतील तर त्यामुळे विमानाच्या गॅलरीमध्ये सामान ठेवण्यासाठी प्रवासी गर्दी करतील. गर्दीमुळे टेक ऑफ करायला उशीर होईल.
बॅक-टू-फ्रंट बोर्डिंगमुळे विमानाचे संतुलन बिघडू शकते का?
फ्लाइटमध्ये बॅक-टू-फ्रंट बोर्डिंगमुळे मागच्या बाजूला जास्त गर्दी होऊन विमानाचे संतुलन बिघडू शकते असे काहीजणांना वाटते. टेक ऑफ घेण्यासाठी विमानाचा प्रत्येक भाग संतुलित असणे गरजेचे असते. उड्डान करताना विमान संतुलित राहावे यासाठी विमानामध्ये प्रवाश्यांच्या बसण्याची व्यवस्था विशिष्ट रचनेनुसार केलेली असते. रनवेवर उभे असलेल्या विमानामध्ये मागच्या बाजूने प्रवेश केल्यास विमान असंतुलित होण्याची शक्यता असते. यामुळे विमान मागच्या दिशेला झुकून अपघात होण्याचा धोका असतो.
पुढच्या बाजूने बोर्डिंग केल्याने फर्स्ट क्लास आणि बिझनस क्लास तिकीट असलेल्या प्रवाश्यांना सर्वात आधी त्यांच्या जागेवर बसता येते. हा एक प्रकारचा विशेषाधिकार असतो. अमेरिकेच्या जेटब्लू अशा काही विमान कंपन्यांमध्ये रियर बोर्डिंग सिस्टीम आहे. या कंपन्यांच्या विमानामध्ये तुम्ही मागच्या प्रवेशदाराने बोर्डिंग करु शकता.